कोचीन शिपयार्डला LNG कंटेनरशिप्सची मोठी जागतिक ऑर्डर प्राप्त

0

शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक आघाडीचा समूह CMA CGM ग्रुपने, कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) सोबत सहा नवीन 1,700 TEU ड्युअल-फ्युएल LNG चालित कंटेनरशिप्स बांधण्यासाठी लेटर ऑफ इंटेंट (LOI) वर स्वाक्षरी केली आहे. यानिमित्ताने, प्रथमच भारतीय शिपयार्डला इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंटेनर कॅरियर कंपनीची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

प्रत्येक कंटेनर जहाज हे भारतीय नोंदणीअंतर्गत तयार केले जाईल, जे LNG (लिक्विफाईड नॅचरल गॅस) इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेले असेल आणि भविष्यातील कमी-कार्बन इंधनांसाठी सज्ज असेल. या ऑर्डरमुळे, CMA CGM च्या सुरळीत शिपिंग धोरणाला चालना मिळेल, तसेच 2050 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन (Net Zero) साध्य करण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाशी हे सुसंगत असेल.

ही जहाजे, दक्षिण कोरियातील ‘HD ह्युंडाई हेवी इंडस्ट्रीज’च्या सहकार्याने बांधली जाणार असून, या कंपनीकडून तांत्रिक कौशल्य आणि तज्ज्ञ सेवा पुरविली जाईल. सर्व जहाजांची डिलिव्हरी 2029 ते 2031 या कालावधीत होणे अपेक्षित आहे.

हा करार, CMA CGM च्या भारतातील सागरी क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूक वाढवण्याच्या धोरणाला बळकटी देतो, तसेच तो ‘मेक इन इंडिया‘ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या राष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगती साधतो.

2025 मध्ये, CMA CGM ने भारताच्या अख्त्यारित चार जहाजांची पुनर्नोंदणी केली. कंपनीचे उद्दिष्ट- वर्षाअखेरीपर्यंत 1,000 भारतीय सागरी कर्मचारी भरती करण्याचे आणि 2026 मध्ये आणखी 500 कर्मचारी नियुक्त करून भारतातील आपले सागरी कार्यबळ वाढविण्याचे आहे.

CMA CGM ग्रुपचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रॉडोल्फ साडे म्हणाले की, “भारतामध्ये बांधल्या जाणाऱ्या LNG जहाजांची ऑर्डर देणारी, CMA CGM ही पहिली आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनी असल्याचा मला अभिमान आहे. हा ऐतिहासिक टप्पा भारताच्या औद्योगिक आणि तांत्रिक क्षमतेवरील आमचा विश्वास दर्शवतो आणि भारताला जागतिक जहाजबांधणी केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनाला बळकटी देतो.”

तर, कोचीन शिपयार्डचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मधू एस. नायर यांनी सांगितले की, “या महत्त्वाच्या प्रकल्पावर CMA CGM सोबत भागीदारी करण्याची संधी मिळणे हे आमचे सौभाग्य आगे. हे, आमच्या जहाजबांधणी कौशल्याचे तसेच HD Hyundai सोबतच्या आमच्या सहयोगाचे प्रतीक आहे. शाश्वत सागरी वाहतुकीच्या भविष्यातील मानकांची पूर्तता करणारी जहाजे वितरित करणे, हे एकत्रित आमचे ध्येय आहे.”

भारतामध्ये तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या, CMA CGM च्या सध्या 19 साप्ताहिक सागरी सेवा सुरू आहेत, ज्याद्वारे भारताचे जागतिक व्यापार-मार्गांशी  जोडलेले आहे. भारतातील सुमारे 17,000 कर्मचारी या कंपनीत कार्यरत आहेत.

ही ऑर्डर, ‘Maritime India Vision 2030’ आणि ‘Maritime Amrit Kaal Vision 2047’ या राष्ट्रीय उद्दिष्टांतर्गत, CMA CGM आणि भारताच्या जहाजबांधणी क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरते. यामुळे कोचीन शिपयार्डची प्रगत, पर्यावरणपूरक जहाजे बांधण्याची वाढती क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होते.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभारत, ब्राझील व्यापार आणि धोरणात्मक सहकार्य वाढविण्याच्या दिशेने…
Next articleOperation Sindoor: Redefining India’s Deterrence and the Nuclear Threshold

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here