जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारताचा संरक्षण उद्योग निर्णायक टप्प्यावर

0

भू-राजकीय अस्थिरता आणि तांत्रिक बदलांच्या युगात, भारत जागतिक संरक्षण भागीदारीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.

स्ट्रॅटन्यूज ग्लोबलेचे उपसंपादक अमिताभ रेवी, यांनी ‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ मध्ये आयोजित केलेल्या पॅनेल चर्चेचा हा केंद्रबिंदू होता, ज्याचे शीर्षक होते ‘जागतिक अनिश्चिततेमधील धोरणात्मक भागीदारी’. या चर्चासत्रात डॉ. विवेक लाल (जनरल अॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशन), रॉडरिक मॅकलीन (लॉकहीड मार्टिन), अँडलीब शादमन (हेन्सोल्ड इंडिया) आणि वेंकट कटकुरी (एअरबस डिफेन्स अँड स्पेस, भारत आणि दक्षिण आशिया) या औद्योगिक नेत्यांनी सहभाग घेतला होता.

चर्चेची मांडणी

रेवी यांनी चर्चेची सुरूवात करताना, जागतिक अस्थिरतेच्या काळात विश्वास आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

‘भारत हा केवळ संरक्षण प्रणाली खरेदी करणारा देश नसून, प्रगत क्षमतांचा सह-विकास करण्यास सक्षम असलेला एक धोरणात्मक भागीदार आहे’ असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. त्यांनी बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) याकडेही लक्ष वेधले आणि परदेशी IPR चा आदर करताना स्थानिक नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेची शाश्वती – डॉ. विवेक लाल

चर्चेदरम्यान, डॉ. लाल यांनी अधोरेखित केले की, “आजच्या अस्थिर वातावरणात विश्वसनीय तंत्रज्ञान हे एक धोरणात्मक संसाधन आहे. ते म्हणाले की, “मानवरहित विमाने, प्रगत सेन्सर्स आणि AI-सक्षम प्रणाली ही केवळ युद्ध साधने नाहीत, तर संरक्षण दलांना अधिक बळकटी देणारे हात आहेत.” ते म्हणाले की, “आता देशाने खरेदीदार-विक्रेता या नात्यापलीकडे जाऊन, सह-विकास आणि देशांतर्गत उत्पादन यावर भर देणे आवश्यक आहे, ज्यामुळे भारत नवोन्मेष साखळीत सक्रियपणे सहभागी राहू शकेल.”

विश्वासार्ह भागीदारी आणि परस्पर-सुसंगतता – रॉडरिक मॅकलिन

मॅकलीन यांनी, परस्पर-सुसंगतता (interoperability) आणि विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी लॉकहीड मार्टिन या कंपनीचा दृष्टिकोन स्पष्ट केला, ज्यामध्ये ते जागतिक ऑपरेशन्समध्ये सहजतेने एकत्रित काम करू शकणाऱ्या प्रणाली तयार करण्यासाठी, भारतीय भागीदारांसोबत जवळून काम करत आहेत. मॅकलीन यांनी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या आव्हानांवरबी प्रकाश टाकला, ज्यामध्ये सुरक्षा, व्यावसायिक हित आणि भारताला स्वदेशी क्षमता निर्माण करण्याची गरज यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक क्षमता आणि बौद्धिक संपदा हक्क (IPR) – अँडलीब शादमन

शादमन यांनी चर्चेदरम्यान, बौद्धिक संपदा हक्क (IPR) च्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “खऱ्या भागीदारीमध्ये तांत्रिक ज्ञान शेअर करणे, सह-विकास करणे, आणि भारतीय कंपन्यांना केवळ आयात केलेल्या घटकांची असेंब्ली न करता स्वतःचे IPR तयार करण्यास सक्षम करणे यांचा समावेश असतो.”

शादमन यांनी अधोरेखित केले की, “दीर्घकालीन औद्योगिक वाढ आणि नवोन्मेषासाठी IPR मधील स्पष्टता अनिवार्य आहे.”

युरोप-भारत सहकार्य आणि धोरणाचे संरेखन – वेंकट कटकुरी

कटकुरी यांनी, भारत एक धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून युरोपसोबत वाढवत असलेल्या सहकार्याचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, सेन्सर प्रणालींपासून ते एरोस्पेस सोल्यूशन्सपर्यंत, हे सहकार्य आता औद्योगिक एकत्रीकरण आणि संयुक्त विकासाच्या दिशेने विस्तारत आहे. त्यांनी धोरणात्मक स्पष्टता आणि मंजुरी प्रक्रियेतील वेग याचे महत्त्वही अधोरेखित केले, ज्यामुळे भारतीय आणि युरोपियन औद्योगिक परिसंस्थांना परस्पर सहकार्य  प्रभावीपणे पुढे नेता येईल.

चर्चेतील महत्वाचे निष्कर्ष

  • विश्वास आणि विश्वसनीयता: कार्यक्षमतेची खात्री आता एक धोरणात्मक संपत्ती म्हणून अधिक महत्त्वाची ठरत आहे.
  • खरेदीपेक्षा सह-विकासावर भर: भारत आता जागतिक संरक्षण प्रणालींमध्ये फक्त खरेदीदार नसून, सह-विकासक म्हणून पुढे येत आहे.
  • IPR चे महत्त्व: परदेशी बौद्धिक संपदा राखताना स्थानिक नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, हे टिकाऊ भागीदारीसाठी अनिवार्य आहे.
  • धोरण आणि परिसंस्था: नियमांतील स्पष्टता आणि सुलभ मंजुरी प्रक्रियेमुळे, अधिक सखोल सहकार्य करण्यास मदत मिळते.
  • जागतिक समाकलन: आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत परस्पर-सुसंगतता भारताच्या धोरणात्मक भूमिकेला बळकटी देते.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleदेशाला तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण परिवर्तनाची आवश्यकता: लष्करप्रमुख
Next articleभविष्यातील युद्धांसाठी एकात्मता आणि नवोन्मेष आवश्यक – CDS चौहान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here