पहिली स्वदेशी पाणबुडीरोधक नौका ‘INS Mahe’ भारतीय नौदलात दाखल

0

सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 रोजी, मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे, माहे-श्रेणीतील आठ पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौकांपैकी (ASW-SWC) – ‘INS Mahe‘ या पहिल्या स्वदेशी युद्धनौकेला भारतीय नौदलात कार्यान्वित केले गेले. याद्वारे, भारतीय नौदलाने सागरी क्षमतांमध्ये आत्मनिर्भर होण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग-इन-चीफ व्हाईस-ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी या समारंभाचे आयोजन केले होते आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याचे अध्यक्षपद भूषवले.

याप्रसंगी जनरल द्विवेदी म्हणाले की, “आजचा समारंभ हा केवळ सागरी युद्धसज्जतेत एका शक्तिशाली नव्या प्लॅटफॉर्मचा समावेश दर्शवत नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञानासह जटील लढाऊ जहाजांची रचना, त्यांची निर्मिती आणि त्यांच्या तैनातीविषयीच्या आपल्या वाढत्या क्षमतेला अधोरेखित करतो.”

ते पुढे म्हणाले की, ‘INS Mahe’चे कार्यान्वयन हे नौदलाच्या ‘बिल्डर्स’ नेव्ही’ मध्ये होत असलेल्या स्थिर परिवर्तनाची ग्वाही देते. भारतीय नौदल हे एक असे नौदल आहे, जे स्वतःच्या लढाऊ प्लॅटफॉर्म्सची संरचना करते, त्यांची निर्मिती करते आणि त्यांचे सातत्य टिकवून ठेवते.”

एकत्रीकरण आणि संयुक्ततेविषयी बोलताना लष्करप्रमुख म्हणाले की, “बहु-डोमेन ऑपरेशन्सच्या या युगात, महासागराच्या खोलीपासून ते सर्वोच्च सीमेपर्यंत समन्वय साधत कार्य करण्याची आपली क्षमता, ही आपल्या देशाची सुरक्षा आणि आपला प्रभाव निश्चित करेल. लडाखपासून ते हिंद महासागरापर्यंत, माहिती युद्धापासून ते सिंधूरच्या संयुक्त लॉजिस्टिक्सपर्यंत, आज आपण प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहोत, आणि हेच चांगल्या समन्वयाचे योग्य उदाहरण होते. भारतीय लष्कराने देखील, अनेक उपक्रमांची मालिका सुरू केली असून, सुमारे दहा वर्षांतील परिवर्तनाचा एक व्यापक आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये संयुक्तता आणि एकात्मता हे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत, कारण आधुनिक संघर्ष हे बहु-डोमेन, संमिश्र आणि एकत्रित राष्ट्रीय शक्तीची मागणी करणारे असतील, याची लष्कराला जाणीव आहे”

स्वदेशी बनावटीच्या ASW-SWC युद्धनौकांपैकी एक, जी नव्या पिढीचा चेहरा मानली जाते, अशा आकर्षक, वेगवान आणि पूर्णत: भारतीय असलेल्या ‘INS Mahe’ मधील 80 टक्क्यांहून अधिक घटक हे देशातच विकसीत केले गेले आहेत, ज्याद्वारे स्वदेशी युद्धनौकांची संरचना, बांधणी आणि प्रणाली एकत्रीकरणातील नौदलाची सातत्यूर्ण प्रगती अधोरेखित होते.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने तयार केलेले हे जहाज, नौदल जहाजबांधणीतील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाच्या महत्वाकांक्षांना मूर्त स्वरुप देते. आकाराने लहान पण क्षमतेने शक्तीशाली अशी ‘आयएनएस माहे’ चपळता, टिकाऊपणा आणि अचूकता या गुणांवर आधारित आहे, जे भारताच्या किनारपट्टी भागातील जलक्षेत्रात वर्चस्व राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे जहाज “सायलेंट हंटर” म्हणून कार्य करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे, जे पाणबुड्यांचा मागोवा घेण्यास आणि त्यांचा प्रतिकार करण्यास, तसेच किनारपट्टीवर गस्त घालण्यास आणि पश्चिम समुद्रकिनाऱ्यावरील महत्त्वपूर्ण सागरी मार्गांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे.

‘INS Mahe’ सांस्कृतिक आणि प्रादेशिक प्रतिकात्मकतेलाही अधोरेखित करते. मलबार किनारपट्टीवरील ऐतिहासिक किनारी शहर ‘माहे’च्या नावावरून या जहाजाचे नामकरण करण्यात आले आहे. जहाजाच्या बोधचिन्हावर ‘उरूमी’, ही कलरीपयट्टू मधील लवचिक तलवार दर्शविण्यात आली आहे, जी चपळता, घातक लयबद्धता आणि भारतीय युद्धकलेच्या वारशाचे प्रतिनिधित्व करते. गेल्या आठवड्यात अनावरण करण्यात आलेल्या या बोधचिन्हावर, उरूमी तलवार समुद्रातून वर येताना दर्शवली आहे, जी देशाच्या जलक्षेत्राचे संरक्षण करणाऱ्या वेगवान आणि घातक संरक्षकाची अर्थात जहाजाची भूमिका प्रतिबिंबित करते.

दरम्यान, भारतीय नौदलाने ‘नौदल दिन 2025’ च्या तयारीला सुरुवात केली आहे, जो ३ डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील शांगुमघम बीचवर, भव्या ऑपरेशनल प्रात्यक्षिकासह साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम, मूळ तारीख 4 डिसेंबरच्या एक दिवस आगोदर आयोजित केला जाईल, ज्यामध्ये नौदल क्षमता, अचूक कारवाया आणि वाढत्या सागरी शक्तीचे प्रदर्शन केले जाईल.

नौदल दिनाच्या सोहळ्याला, प्रमुख आणि ठरावीक नौदल तळांच्या पलीकडे नेण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून, याआधी ओडिशातील पुरी आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे तो साजरा करण्यात आला होता.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleपाकिस्तान: पेशावरच्या निमलष्करी मुख्यालयावर आत्मघाती हल्ला, तिघांचा मृत्यू
Next articleभारत आणि कॅनडाने पुन्हा एकदा व्यापार चर्चा सुरू करण्यावर सहमती दर्शवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here