तीन अपाचे हेलिकॉप्टरची अंतिम तुकडी भारतीय लष्कराकडे सुपूर्द

0

भारतीय लष्कराला तीन बोईंग AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टरची अंतिम तुकडी प्राप्त झाली असून, यामुळे लष्करी विमान वाहतूक दलासाठी ऑर्डर करण्यात आलेल्या, सर्व सहा हेलिकॉप्टर्सची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे. ही हेलिकॉप्टर्स लवकरच जोधपूर येथील लष्कराच्या 451 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट केली जातील.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, ही हेलिकॉप्टर्स अँटोनोव्ह An-124 या अवजड मालवाहू विमानातून भारतात आणण्यात आली, आणि मंगळवारी दिल्लीजवळील हिंडन एअर बेसवर उतरली गेली. पुढील काही दिवसांत असेंब्ली, संयुक्त तपासणी आणि इतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ती जोधपूरमध्ये तैनात केली जातील.

यावर्षी जुलैमध्ये, लष्करासाठी पहिल्या तीन अपाचे हेलिकॉप्टरचे वितरण झाले होते, त्यानंतर मंगळवारी उर्वरित तीनचे वितरण पूर्ण झाले, ज्यासह यासह, अनेक विलंबांना सामोरे गेलेली आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, वितरण 2023 मध्ये सुरू होणार होते, ज्यामध्ये 2024 च्या सुरुवातीस बदल करण्यात आले होते, ज्यानंतर पहिली तुकडी फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास येणे अपेक्षित होते, परंतु अखेर जुलैमध्ये तिचे वितरण पूर्ण झाली.

लष्कराच्या अपाचे हेलिकॉप्टरनी, या वर्षाच्या सुरुवातीला ‘त्रिशूल’ या मोठ्या त्रि-सेवा सरावाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘एक्सरसाईज मरु ज्वाला’ या सरावादरम्यान, आपले ऑपरेशनल पदार्पण केले. सुरुवातीची तुकडी दाखल झाल्यानंतक लष्कराने अधिकृतपणे अपाचे हेलिकॉप्टर्सचा आपल्या विमान ताफ्यात समावेश केला.

‘X’ वरील एका पोस्टमध्ये भारतीय लष्कराने या समावेशाला “मैलचा दगड” म्हटले असून, या हेलिकॉप्टर्सच्या आगमनामुळे “भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतेत लक्षणीय वाढ होईल,” असे नमूद केले आहे.

अमेरिकेनेही या समावेशाचे स्वागत केले आहे. भारतातील अमेरिकन दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे की, “हे वितरण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताच्या पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातील वचनबद्धतेवर आधारित आहे.”

दूतावासाने म्हटले की, “POTUS (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय) आणि भारतीय पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या संयुक्त निवेदनाची पूर्तता करत, भारतीय लष्करातील नवीन बोईंग AH-64E अपाचे हेलिकॉप्टरचे आगमन, हे भारत-अमेरिका प्रमुख संरक्षण भागीदारीतील आणखी एक पाऊल आहे.” निवेदनात नमूद केले आहे की, “हा टप्पा विश्वसनीय आणि वाढती #USIndiaDefense भागीदारी प्रतिबिंबित करतो, तसेच अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करतो. आपल्या अत्याधुनिक क्षमतेसह, अपाचे प्रादेशिक सुरक्षेसाठीच्या आपल्या सामायिक दृष्टिकोनाला बळकट करते आणि सह-उत्पादन, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीमधील सहकार्य अधिक दृढ करते.”

अपाचेचा समावेश हा, लष्कराच्या आपल्या अटॅक हेलिकॉप्टर आणि हवाई मारक क्षमतेचा विस्तार करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. लष्कर 90 स्वदेशी बनावटीच्या ‘प्रचंड’ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स (LCH) समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे आणि आधीच शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले ‘रुद्र’ प्रगत हलक्या वजनाचे हेलिकॉप्टर (ALH) संचालित करत आहे.

आर्मी एव्हिएशन तुकडीच्या स्थापना दिनानिमित्त, जारी केलेल्या लष्कराच्या आधीच्या निवेदनात नमूद केले होते की, अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे तुकडीच्या हल्ला, टेहळणी आणि रणांगण समर्थन क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय हवाई दलाकडे आधीपासूनच 22 अपाचे हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे, जो प्रामुख्याने लडाख आणि पश्चिम क्षेत्रात तैनात आहे.

AH-64E अपाचे, हवेतून जमिनीवर मारा करणारी हेलफायर क्षेपणास्त्रे, 70 मिमी हायड्रा रॉकेट आणि हवेतून हवेत मारा करणारी स्टिंगर क्षेपणास्त्रे यांसह, 1,200 राउंड वाहून नेणारी 30 मिमीची चेन गन अशी विविध शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकते. हे हेलिकॉप्टर ‘लॉन्गबो’ फायर कंट्रोल रडारने सज्ज आहे, जे 360 डिग्री लक्ष्य शोधण्याची क्षमता देते, तसेच यामध्ये लक्ष्य निश्चितीसाठी आणि रात्रीच्या वेळी किंवा प्रतिकूल हवामानात ऑपरेशन्स करण्यासाठी नोज-माउंटेड सेन्सर प्रणाली देखील आहे.

AH-64E हे, अपाचे कुटुंबातील सर्वात प्रगत हेलिकॉप्टर आहे, ज्याच्या ‘व्हर्जन 6’ कॉन्फिगरेशनमध्ये सेन्सर, सॉफ्टवेअर आणि शस्त्रास्त्रांच्या कामगिरीत सुधारणांचा समावेश आहे आणि ते आधुनिक, नेटवर्कयुक्त ‘मल्टी-डोमेन ऑपरेशन्स’साठी डिझाइन केले आहे. बोईंगच्या मते, AH-64E v6 हे अत्यंत आव्हानात्मक युद्धपरिस्थितींसाठी अनुकूल आहे, ज्यात ऑन-बोर्ड आणि ऑफ-बोर्ड सेन्सर्स, लांब पल्ल्याची शस्त्रे आणि संयुक्त ऑपरेशन्सना समर्थन देण्यासाठी नेटवर्क कनेक्टिव्हिटी एकत्रित केली आहे.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleफुजियान चीनच्या तैवान धोरणाला कसा आकार देतो; वाचा तज्ज्ञांचे विश्लेषण
Next articleAviaIndra 2025: भारतीय हवाई दलाचा रशियासोबत संयुक्त हवाई सराव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here