बांगलादेशातील घटना पाकिस्तानच्या रणनीतीला पूरक

0
घटना
बांगलादेशची राजधानी ढाका येथे, 17 नोव्हेंबर, 2025 रोजी, पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचे घर पाडण्याची मागणी करणाऱ्या आंदोलनादरम्यान पोलीस अधिकारी आंदोलकांचा पाठलाग करत आहेत. हा निकाल शेख हसीना यांच्या खटल्यांसंदर्भात आला होता. (रॉयटर्स/फातिमा तुज जोहोरा) 

ढाकामध्ये विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर, अवघ्या काही दिवसांनी खुलनामध्ये मोतालेब शिकदर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रयत्नाने बांगलादेश एका परिचित पण धोकादायक टप्प्यावर येऊन उभा आहे: मोठा धक्का, अटकळी आणि राजकीय अनिश्चिततेची वाढती भावना. जेव्हा अनिश्चिततेच्या क्षणी हिंसाचार होतो, तेव्हा लक्ष स्वाभाविकपणे बाह्य घटकांकडे वळते.

याचा फायदा कोणाला होतो? यावर कोण लक्ष ठेवून आहे? आणि ही घटना जसजशी उलगडत आहे, तसतसे तिचे स्वरूप कोण ठरवत आहे? हे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. पण ते अनेकदा चुकीच्या क्रमाने विचारले जातात.

अलीकडील हल्ले कसे घडले हे स्पष्ट करण्यासाठी बाह्य नियोजनाची आवश्यकता नाही. बांगलादेश एका नाजूक राजकीय संक्रमणाच्या ऐन मध्यात आहे. सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. संस्थांवर ताण आहे. प्रतिस्पर्धी गट मर्यादांची चाचणी घेत आहेत.

अशा परिस्थितीत, लक्ष्यित हिंसाचार केवळ अंतर्गत शत्रुत्वामुळेच उद्भवू शकतो. बांगलादेश आणि इतरत्रही इतिहासात अशा उदाहरणांची कमतरता नाही. बाह्य पैलू महत्त्वाचा ठरतो तो कृतीच्या वेळी नाही, तर घटना घडून गेल्यानंतर.

आधुनिक भू-राजकारणात, प्रभाव क्वचितच कृतीतून सुरू होतो. तो अर्थ लावण्यापासून सुरू होतो. एकदा हिंसाचार घडला की, राजकीय वातावरण बदलते. भावना तीव्र होतात. विश्वास कमकुवत होतो. अपूर्ण माहितीमुळे निर्माण झालेल्या पोकळीत अफवा पसरतात. याच ठिकाणी अप्रत्यक्ष प्रभाव प्रभावी ठरतो ते घटना घडवून आणण्यासाठी नव्हे, तर त्या कशा प्रकारे इतरांना समजतील याला आकार देऊन.

बांगलादेशबाबत पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून हेच ​​तर्कशास्त्र दीर्घकाळापासून दिसून आले आहे. थेट हस्तक्षेपाचे काही तोटे आहेत: ज्यात जबाबदारी निश्चित होणे, राजनैतिक परिणाम आणि संघर्ष वाढण्याचा धोका असे मुद्दे समाविष्ट आहेत. याउलट, अप्रत्यक्ष प्रभाव लवचिकता देतो. तो जबाबदारी न घेता सहभाग आणि उत्तरदायित्वाशिवाय प्रासंगिकता साधण्याची संधी देतो. अलीकडील हत्यांमुळे नेमके असेच वातावरण निर्माण झाले आहे, जिथे ही पद्धत सर्वोत्तम काम करते.

बांगलादेशातील अंतर्गत वाद हेच याला आमंत्रण देणारे ठरले आहे. राष्ट्रीय ओळख, धर्मनिरपेक्षता आणि 1971च्या युद्धाचा वारसा यांसारखे प्रश्न कधीही पूर्णपणे नाहीसे झालेले नाहीत. तणावाच्या क्षणी ते पुन्हा समोर येतात, अनेकदा अधिक तीव्र स्वरूपात. हिंसाचार ही प्रक्रिया वेगवान करतो. तो राजकीय मतभेदांचे रूपांतर नैतिक संतापात करतो आणि सुज्ञपणे विचार करण्याच्या संधी मर्यादित करतो.

अशा परिस्थितीत, काही विशिष्ट कथा आपोआपच जोर धरतात. ऐतिहासिक तोडगे अजूनही अनिर्णित आहेत, असे दावे केले जातात. उत्तरदायित्वच अस्थिरतेला खतपाणी घालते, असे युक्तिवाद केले जातात. व्यापक वैचारिक किंवा धार्मिक ओळखीला आवाहन केले जाते.

हे विषय संपूर्णपणे बाहेरून आयात केलेले नाहीत. ते बांगलादेशच्या राजकीय व्यवस्थेत आधीपासूनच अस्तित्वात आहेत. फक्त बदलला आहे तो त्यांचा प्रभाव आणि व्याप्ती.

पाकिस्तानची भूमिका, जिथे ती अस्तित्वात आहे, तिथे ती दिशा देण्याऐवजी तीव्रता वाढवण्यापुरतीच मर्यादित आहे. सहानुभूती दर्शवणारे आवाज, समर्थक भाष्यकार, अनिवासी समुदायांमध्ये घडणाऱ्या चर्चा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म अशा कथांना बळकटी देतात, ज्या पाकिस्तानच्या स्वतःच्या राजकीय चर्चेतील दीर्घकाळापासूनच्या भूमिकांशी जुळतात. यासाठी समन्वयाची आवश्यकता नसते. केवळ संरेखन पुरेसे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पद्धतीमुळे कोणताही पुरावा मागे राहत नाही. शोध घेण्यासाठी कोणतेही आदेश दिले जात नाहीत, किंवा उघड करण्यासाठी कोणतेही कार्यात्मक दुवे नसतात. आव्हान दिल्यास, पुराव्याचा अभाव हाच बचावाचा मार्ग बनतो. दुर्लक्ष केले तरी या कथा पसरतच राहतात. दोन्ही प्रकारे, विश्वासार्ह इन्कार करण्याची शक्यता कायम राहते.

या दृष्टिकोनाची परिणामकारकता त्याच्या संयमामध्ये आहे. पाकिस्तानला बांगलादेशमध्ये संकटं निर्माण करण्याची गरज नाही. तो त्यांची केवळ वाट पाहतो. देशांतर्गत अस्थिरताच अशा संधी निर्माण करते, ज्या बाहेरून इतक्या सहजपणे तयार केल्या जाऊ शकत नाहीत. एकदा त्या संधी निर्माण झाल्या की, किमान प्रयत्नात त्यांचा प्रभाव पसरतो.

बांगलादेशसाठी बाह्यशक्तींकडून नियंत्रण ठेवले जात आहे हा धोका नसून धोका हा आहे की त्याच्या अंतर्गत असुरक्षिततेमुळे ते अशा खोट्या कथांच्या प्रभावाला बळी पडू शकते. तपास न लागलेला प्रत्येक हल्ला हा विश्वास कमी करतो आणि प्रत्येक विलंबित तपासामुळे अटकळींना वाव मिळतो. कालांतराने, राजकीय चर्चा तथ्यांऐवजी दृष्टिकोनांकडे, आणि जबाबदारीच्याऐवजी आरोपांकडे वळते.

या आव्हानाला सामोरे जाणे सोपे नाही. अतिप्रतिक्रियेमुळे बाह्य कथानकांना अधिक बळ मिळण्याचा धोका असतो. शांत राहिल्यास ती कथानके रुजतात. सर्वात प्रभावी, पण सर्वात कठीण उपाय म्हणजे यावर अंतर्गत उपाययोजना म्हणजे: विश्वासार्ह तपास, नजरेत भरणारी अंमलबजावणी आणि सर्व गटांमध्ये राजकीय संयम. अप्रत्यक्ष प्रभावाचा मुख्य शत्रू म्हणजे आत्मविश्वास.

चुकीचे निदान टाळणे देखील महत्त्वाचे आहे. अप्रत्यक्ष प्रभावाला थेट आक्रमण मानल्यास मूळ समस्या सोडवण्याऐवजी संघर्ष वाढतो. त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले तर माहितीचे अवकाश असुरक्षित राहते. हल्लीच्या काळात हा प्रभाव कशा प्रकारे शांतपणे, अप्रत्यक्षपणे आणि अनेकदा कोणत्याही एका ओळखता येईल अशा कर्त्याशिवाय कार्य करतो, हे समजून घेतले तरच समतोल साधता येईल.

हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleDefence Electronics OEM Tonbo Imaging Ready to Bring IPO
Next articleचीनकडून विकत घेतले जात आहेत सोशल मीडिया इन्फ्युएन्झर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here