ढाका JF-17 विमानांबाबत विचाराधीन; भारताला संयम राखण्याचे आवाहन

0
JF-17

पाकिस्तानकडून JF-17 लढाऊ विमाने खरेदी करण्याबाबत बांगलादेश विचाराधीन असून, भारताने याबाबत कुठलीही अतिशयोक्तीपूर्ण प्रतिक्रिया देऊ नये, असे मत ब्रिगेडियर अरुण सहगल (निवृत्त) यांनी व्यक्त केले. भारताने संयमित भूमिका घ्यावी आणि ढाकासोबत संवाद सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बांगलादेश JF-17 विमानांच्या खरेदीबाबत विचार करत असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना सहगल म्हणाले की, “भारताने या घडामोडीची दखल घेतली पाहिजे आणि नंतर त्याचा पाठपुरावा केला पाहिजे, परंतु याबाबत फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही.”

पाकिस्तानच्या लष्करी मीडिया विंग- इंटर-सर्विसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, हा संभाव्य करार बांगलादेश हवाई दलाच्या “जुन्या होत चाललेल्या विमान ताफ्याला बळकटी देईल आणि हवाई पाळत ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी हवाई संरक्षण रडार यंत्रणांच्या एकत्रीकरणाला” मदत करेल.

JF-17 थंडर हे हलक्या वजनाचे, एकाच इंजिनचे लढाऊ विमान असून, त्याला रशियन डिझाइनचे RD-93 टर्बोफॅन इंजिन आहे. हे विमान चीनच्या चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन आणि पाकिस्तान एरोनॉटिकल कॉम्प्लेक्स यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे आणि पाकिस्तान हवाई दलात सेवेत दाखल झाल्यापासून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. युरेशियन टाइम्सनुसार, सध्या ब्लॉक 2 आणि ब्लॉक 3 प्रकार निर्यातीसाठी प्रोत्साहित केले जात आहेत.

पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, इस्लामाबादने अलीकडच्या काही महिन्यांत शस्त्रास्त्रांची निर्यात वाढवण्यासाठी आणि आपल्या देशांतर्गत संरक्षण उद्योगातून कमाई करण्यासाठी संरक्षण क्षेत्रातील संपर्क वाढवला आहे. गेल्याच महिन्यात, पाकिस्तानने लिबियाच्या ‘लिबियन नॅशनल आर्मी’सोबत शस्त्रास्त्रांचा करार पूर्ण केला, ज्यामध्ये JF-17 जेट्स आणि प्रशिक्षण विमानांचा समावेश आहे. अशा खरेदीसाठी पाकिस्तानशी संपर्क साधणारा बांगलादेश हा अलीकडील देश आहे.

सहगल यांनी सांगितले की, “या घडामोडीमुळे भारताने विचलित होता कामा नये. आपण हे सहजतेने स्विकारले पाहिजे आणि फेब्रुवारीतील निवडणुकांनंतर, आपण नेहमीप्रमाणे केवळ (बांगलादेश) सरकारशीच संपर्क साधू नये, तर तिथल्या जनतेपर्यंत आणि जनमत तयार करणाऱ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

लढाऊ विमानांची मर्यादित विक्री ही स्वतःमध्ये फारशी चिंतेची बाब नसली, तरी व्यापक संबंधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सहगल यांनी सांगितले. “जे जे लगेच दिसून येत नाही ते म्हणजे बांगलादेशला नंतर थेट चीनकडून किंवा पाकिस्तानमार्फत मिळू शकणारी सहाय्य प्रणाली. परंतु, या विक्रीसाठी चिनी लोकांची संमती आहे.” असे त्यांना स्पष्ट केले.

भारत आणि बांगलादेशमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर सहगल म्हणाले की, “संयम आणि संवाद हाच योग्य धोरण ठरेल. भारत सरकारने शांत राहून, विविध स्तरांवर संवाद साधला पाहिजे आणि नंतर चर्चेला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जिथे त्यांना आपली अधिक गरज आहे, तिथे घाई न करता संयमाने पोहचले पाहिजे आणि हळूहळू आपले संबंध दृढ केले पाहिजेत,” असे ते म्हणाले.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleEurope Comes Courting, India Sets Terms
Next articleइराणमध्ये इंटरनेट सुरू करण्याबाबत ट्रम्प-मस्क यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here