अमेरिकेच्या कारवाईच्या भीतीमुळे बंद केलेले हवाई क्षेत्र, इराणने पुन्हा खुले केले

0
इराणने

अमेरिकच्या लष्करी कारवाईच्या भीतीमुळे, इराणने सुमारे पाच तास बंद ठेवलेले आपले हवाई क्षेत्र, बुधवारी रात्री पुन्हा एकदा खुले केले. या बंदीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास विस्कळीत झाला असून, तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यात संभाव्य लष्करी संघर्षाची शक्यता वाढली आहे. तसेच, यामुळे इराणी हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या अनेक विमान कंपन्यांना आपली उड्डाणे रद्द करावी लागली, मार्ग बदलावा लागला किंवा विलंब सहन करावा लागला.

अमेरिकेच्या ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ (FAA) च्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, इराणने स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 5:15 वाजता (2215 GMT) आपली हवाई हद्द बंद केली होती, ज्यामध्ये केवळ अधिकृत परवानगी असलेल्या इराणकडे येणाऱ्या आणि तिथून जाणाऱ्या विमानांनाच उड्डाणाची मुभा देण्यात आली होती. फ्लाइट ट्रॅकिंग सेवा ‘फ्लाइटराडर 24’ च्या आकडेवारीनुसार, रात्री 10 वाजताच्या (ET) सुमारास हे निर्बंध उठवण्यात आले. त्यानंतर उड्डाण केलेल्या पहिल्या काही विमानांमध्ये, इराणच्या महान एअर, यझद एअरवेज आणि एव्हा एअरलाईन्स या कंपन्यांची विमाने सामाविष्ट होती.

‘फ्लाइटराडर 24’ ने नमूद केले की, मागील आठवड्यात याच वेळेला डझनभर विमाने इराणच्या हवाई हद्दीतून प्रवास करत होती, ज्यावरून ही बंदी किती अचानक लादण्यात आली होती हे अधोरेखित होते.

वाढता प्रादेशिक तणाव

इराणमधील सरकारविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संभाव्य प्रतिसादाचा विचार करत असतानाच, ही तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. वॉशिंग्टनने हल्ला केल्यास तेहरान अमेरिकन तळांवर हल्ला करेल, असा इशारा एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने दिल्यानंतर, अमेरिकेने मध्यपूर्वेतील तळांवरून आपल्या काही कर्मचाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात केली आहे.

वारंवार होणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले यामुळे या प्रदेशात अस्थिरता वाढत असून, त्यामुळे व्यावसायिक विमान वाहतुकीचा धोका वाढवला असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

‘ओपीएसग्रुप’ (OPSGROUP) द्वारे संचालित ‘सेफ एअरस्पेस’ या माहिती प्लॅटफॉर्मने सांगतिले आहे की, “अनेक एअरलाईन्सनी इराणमधील त्यांच्या सेवा आधीच कमी केल्या आहेत किंवा स्थगित केल्या आहेत, तसेच बहुतेक विमान कंपन्या इराणची हवाई हद्द टाळत आहेत.” या परिस्थितीमुळे पुढील लष्करी हालचालींचे संकेत मिळू शकतात आणि नागरी विमानांची चुकीची ओळख होण्याचा धोका वाढू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.

2020 मध्ये, इराणने चुकून युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान पाडले होते, ज्यामध्ये उपस्थित सर्व 176 प्रवासी आणि कर्मचारी मारले गेले होते, या पार्श्वभूमीवर हा इशारा विशेष महत्त्वाचा ठरतो.

जागतिक विमान कंपन्यांच्या वाहतुकीत बदल

भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी ‘इंडिगो’ने, इराण हवाई हद्दीच्या बंदीमुळे त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाल्याची पुष्टी केली, तर ‘एअर इंडिया’ने जाहीर केले की, मार्ग बदलण्याच्या उपायांमुळे उड्डाणांना विलंब होऊ शकतो किंवा ती रद्द होऊ शकतात. रशियाच्या ‘एरोफ्लॉट’ एअरलाईन्सने तेहरानला जाणारे विमान, निर्बंध जाहीर झाल्यानंतर काही वेळातच मॉस्कोला परत फिरवले.

जर्मनीने देखील आपल्या विमान कंपन्यांना, इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश न करण्याबाबत नवीन निर्देश जारी केले आहेत. लुफ्थांसा एअरलाईन्सने मध्यपूर्वेतील आपल्या कामकाजात बदल केल्यानंतर लगेचच हे निर्देश जारी करण्यात आले. एअरलाईनने म्हटले आहे की, ते “पुढील सूचनेपर्यंत” इराण आणि इराकची हवाई हद्द टाळतील, तसेच तेल अवीव आणि अम्मानची उड्डाणे केवळ दिवसा सुरू ठेवतील, जेणेकरून कर्मचाऱ्यांना तिथे रात्रभर मुक्काम करावा लागणार नाही.

लुफ्थांसाने पुढे नमूद केले की, यामुळे काही उड्डाणे रद्दही होऊ शकतात. लुफ्थांसा समूहाचा भाग असलेल्या इटालियन कंपनी ‘आयटीए एअरवेज’ने देखील पुढील आठवड्यापर्यंत तेल अवीवची रात्रीची उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांना, इराणवरून उड्डाण करण्यास दीर्घकाळापासून बंदी घातली आहे आणि दोन्ही देशांदरम्यान थेट उड्डाणे देखील रोखली आहेत. तणाव वाढल्यामुळे ‘फ्लायदुबई’ आणि ‘तुर्की एअरलाईन्स’सह प्रादेशिक कंपन्यांनीही गेल्या आठवड्यात इराणची अनेक उड्डाणे रद्द केली आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleभारत-चीन संबंध: अविश्वासू प्रतिस्पर्ध्याशी कसे जुळवून घ्यावे, हा यक्ष प्रश्न
Next articleरशिया नव्हे, तर युक्रेनच संभाव्य शांतता करार टाळत आहे: ट्रम्प यांचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here