घटत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, चीनकडून जन्मदरवाढीच्या धोरणांचा विस्तार

0
जन्मदर

चीन आपल्या लोकसंख्या धोरणाला आर्थिक धोरणाचा मुख्य आधार बनवत आहे, कारण 19 जानेवारी रोजी ते लोकसंख्येची नवीन आकडेवारी जाहीर करण्याच्या तयारीत असून, ही आकडेवारी सलग चौथ्या वर्षी लोकसंख्या घट झाल्याचे दर्शवेल अशी अपेक्षा आहे. वृद्ध होत जाणारा समाज आणि कमी होत जाणारे तरूण संख्याबळ, या प्रमुख आव्हानांचा सामना करत असताना, बीजिंग घसरलेला जन्मदर सावरण्यासाठी आतापर्यंतची सर्वात व्यापक पावले उचलत आहे.

रॉयटर्सच्या अंदाजानुसार, चीनचे सरकार 2026 मध्ये जन्मदराला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 180अब्ज युआन (25.8 अब्ज डॉलर्स) खर्च करू शकते. या आकडेवारीमध्ये, गेल्यावर्षी प्रथमच सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय बाल अनुदानाचा खर्च आणि अपेक्षित विमा प्रतिपूर्तीचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी वचन दिले आहे की, गर्भधारणेदरम्यान महिलांना खिशातून कोणताही खर्च करावा लागणार नाही, तसेच ‘इन विट्रो फर्टिलायझेशन’सह (IVF) सर्व वैद्यकीय खर्च पूर्णत: राष्ट्रीय वैद्यकीय विमा निधीद्वारे उचलला जाईल.

चीनच्या अर्थमंत्रालयाने याबाबत अद्याप भाष्य केलेले नाही, तरीही अर्थशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, हे अंदाज त्यांच्या अपेक्षांशी जुळणारे आहेत. सरकारच्या या नवीन धोरणात्मक निर्णयापूर्वी चीनमध्ये अनेक वर्षे कडक लोकसंख्या नियंत्रण धोरण राबवले गेले होते, ज्यामुळे गरिबी कमी झाली असली तरी देशातील कौटुंबिक संरचना पूर्णपणे बदलली आहे.

घटती लोकसंख्या आणि धोरणांचा मर्यादित प्रभाव

2022 पासून, चीनची लोकसंख्या सातत्याने घटते आहे, तर तिथला जन्मदर अंदाजे प्रती महिला—एक आपत्य, इतका खाली आहे, जो जन्मदर स्थिरतेसाठी आवश्यक असलेल्या 2.1 दरापेक्षा खूपच कमी आहे. लोकसंख्याशास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, कमी लोकसंख्येचा परिणाम उपभोग वाढ मंदावणे, कुटुंबांची संख्या घटणे आणि पेन्शन बजेटवरील वाढता ताण असा होऊ शकतो.

ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ पॉलिसी स्टडीजमधील वरिष्ठ संशोधन फेलो सिउजियन पेंग म्हणाल्या की, “या नव्या उपाययोजनांमुळे मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यांचा प्रभाव मर्यादितच राहील.” “घटता जन्मदर दर हे संपूर्ण पूर्व आशियातील एक व्यापक आव्हान आहे,” असे त्यांनी नमूद केले.

युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार, चीनमधील पुनरुत्पादक वयोगटातील महिलांची संख्या दोन-तृतीयांश पेक्षा जास्त कमी होईल आणि या शतकाच्या अखेरीस ती 100 दशलक्षच्या खाली जाईल. जपान, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरमध्ये जन्मदरवाढीच्या धोरणांमध्ये मोठी गुंतवणूक करूनही अशाच प्रकारची आव्हाने कायम आहेत, जी हे दर्शवतात की, एकदा का लोकसंख्येचा स्तर घसरू लागला की तो सुधारणे किती कठीण असते.

अनुदान आणि सामाजिक बदल

बीजिंगने 2025 मध्ये सुरू केलेल्या नवीन राष्ट्रीय बाल संगोपन भत्त्यांतर्गत, तीन वर्षांखालील मुलासाठी दरवर्षी 3,600 युआन (500 डॉरल्स) दिले जातात. सुमारे 3 कोटी पात्र मुलांसह, यावर्षी अनुदानाची रक्कम 108 अब्ज युआनपर्यंत पोहोचू शकते. दरम्यान, ‘ट्रिव्हियम चायना’ या संशोधन संस्थेचा अंदाज आहे की, गर्भधारणा आणि बाळंतपणाच्या खर्चाची प्रतिपूर्ती केल्यामुळे 2026 मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय विमा निधीवर आणखी ७० अब्ज युआनचा बोजा पडेल.

सरकारच्या 15व्या पंचवार्षिक योजनेत, “विवाह आणि मुले जन्माला घालण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन” वाढवण्याचे आणि अनुदान तसेच टॅक्स क्रेडिट्सच्या माध्यमातून शिक्षण, गृहनिर्माण आणि पालकत्वाचा खर्च कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, अनेक तरुण चिनी नागरिक आर्थिक अनिश्चितता, कामाचे जास्त तास आणि राहणीमानाचा वाढता खर्च या गोष्टींना कुटुंब सुरू करण्यातील अडथळे मानतात.

विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील लोकसंख्याशास्त्रज्ञ यी फुक्सियान म्हणाले की, चीनमध्ये ‘एक मूल’ धोरणाचा (One Child Policy) अनके दशके पगडा राहिल्यामुळे, सामाजिक दृष्टिकोन बदलला आहे. “अनेक लोकांसाठी एक मूल असणे किंवा मूल नसणे हेच आता सामान्य झाले आहे,” असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

गर्भनिरोधकांवरील करमुक्ती संपुष्टात

एका प्रतिकात्मक धोरणात्मक बदल म्हणून, चीनने 1 जानेवारीपसाून गर्भनिरोधकांवरील कर सवलत संपवली आणि कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर उत्पादनांवर 13% मूल्यवर्धित कर (VAT) लागू केला आहे. लोकसंख्याशास्त्रज्ञांच्या मते, हा बदल हे दर्शवतो की बीजिंगचा कल, जन्मदर मर्यादित करण्याकडून तो वाढण्याकडे वळला आहे.

रेकिटच्या मालकीच्या ‘ड्युरेक्स’ कंपनीने या निर्णयावर भाष्य करण्यास नकार दिला, तर चीनच्या ‘रेडनोट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युजर्सनी या धोरणाची खिल्ली उडवली. “लोकांना मुले जन्माला घालण्याचा आत्मविश्वास कधीच कंडोमच्या किमतीवरून मिळत नाही, तर भविष्याप्रती असलेल्या त्यांच्या विश्वासातून मिळतो,” असे एका युजरने लिहिले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचिनी हॅकर्सचा अमेरिकन अधिकाऱ्यांवर सायबर हल्ला, व्हेनेझुएला घटनेचा वापर
Next articleऑपरेशन सिंदूरने LeT चे मुख्यालय उद्ध्वस्त केले: सर्वोच्च कमांडरची कबुली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here