काबुलच्या चिनी रेस्टॉरंटवरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली

0
इस्लामिक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका सर्वोच्च सुरक्षा असलेल्या भागातल्या हॉटेलमधील चिनी-मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये सोमवारी झालेल्या स्फोटात एका चिनी नागरिकासह सहा अफगाणी नागरिक ठार झाले तर एका मुलासह अनेक जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे रेस्टॉरंट काबूलच्या शहर-ए-नव या व्यावसायिक परिसरात होते, जिथे कार्यालयीन इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि दूतावास आहेत, असे पोलीस प्रवक्ते खालिद झाद्रान यांनी सांगितले. हा परिसर शहराच्या सर्वात सुरक्षित भागांपैकी एक मानला जातो.

इस्लामिक स्टेटने जबाबदारी स्वीकारली

इस्लामिक स्टेटच्या अफगाण शाखेने सोमवारी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा हल्ला एका आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणल्याचे निवेदनात म्हटले आहे.

झद्रान यांनी सांगितले की, हे चिनी रेस्टॉरंट एका चिनी मुस्लिम व्यक्ती, अब्दुल मजीद, त्यांची पत्नी आणि एक अफगाण भागीदार, अब्दुल जब्बार महमूद, यांच्यातील भागीदारीतून चालवले जात होते आणि ते चिनी मुस्लिम समुदायाला सेवा देत होते.

अमाक वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटच्या स्थानिक शाखेने ‘उइघुर लोकांविरुद्ध चिनी सरकारकडून वाढत्या गुन्हेगारी’चे कारण देत, चिनी नागरिकांना आपले लक्ष्य करण्याच्या यादीत समाविष्ट केले आहे.

मानवाधिकार गट बीजिंगवर उइघुर लोकांवर व्यापक अत्याचार केल्याचा आरोप करतात. उइघुर हा सुमारे 1 कोटी लोकांचा एक वांशिक अल्पसंख्याक गट आहे, ज्यात प्रामुख्याने मुस्लिम लोक आहेत आणि ते चीनच्या सुदूर पश्चिमेकडील शिनजियांग प्रदेशात राहतात. बीजिंगने कोणत्याही अत्याचाराचे खंडन केले असून पाश्चात्य देशांवर हस्तक्षेप करण्याचा व आपल्याबद्दल खोटे वृत्त पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

जीवितहानी आणि आपत्कालीन प्रतिसाद

जाद्रान यांनी सांगितले की, स्वयंपाकघराच्या जवळ झालेल्या या स्फोटात अयुब नावाचा एक चिनी नागरिक आणि सहा अफगाण नागरिक ठार झाले, तर इतर अनेक जण जखमी झाले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये रस्त्यावर  विखुरलेला ढिगारा आणि रेस्टॉरंटच्या इमारती पुढील भागाला पडलेल्या मोठ्या भगदाडातून धूर बाहेर पडताना दिसत होता.

“आतापर्यंत आमच्या रुग्णालयात 20 जणांना दाखल करण्यात आले आहे,” असे ‘इमर्जन्सी’ या मानवतावादी गटाचे अफगाणिस्तानमधील देश संचालक देजान पॅनिक यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

“जखमींमध्ये चार महिला आणि एका मुलाचा समावेश आहे… दुर्दैवाने, सात जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.” स्फोटाच्या कारणाबद्दल तात्काळ कोणतीही माहिती मिळाली नसून अधिकारी तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तालिबानने 2021 मध्ये युद्धग्रस्त अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले आणि देशात सुरक्षा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले, परंतु बॉम्ब हल्ले सुरूच आहेत, ज्यापैकी अनेकांची जबाबदारी दहशतवादी इस्लामिक स्टेट गटाच्या स्थानिक शाखेने स्वीकारली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleपाकिस्तानची JF-17 विषयक घाई: खरोखरची की भू-राजकीय मार्केटिंगचा भाग?
Next articleभारत-UAE संरक्षण करार होण्यासाठी इतकी वर्षे का लागली ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here