भारत–ईयू व्यापार करार पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर; स्पॅनिश मंत्र्यांची माहिती

0
भारत–ईयू
21 जानेवारी रोजी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या चर्चेपूर्वी, स्पेनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री, युरोपियन संघ आणि सहकार्य मंत्री जोसे मॅन्युएल अल्बारेस, परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यासोबत.

पुढील आठवड्यात होणारी भारत–ईयू (युरोपियन युनियन) शिखर परिषद आणि पुढील महिन्यात नियोजित असलेली आर्टिफीशिअल इंटेलिजन्स (AI) शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, स्पेनचे परराष्ट्र मंत्री होसे मॅन्युएल अल्बारेस बुधवारी नवी दिल्लीत दाखल झाले असून; यांच्या मते, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला मुक्त व्यापार करार (FTA) पूर्णत्वाच्या जवळ पोहचला असून, येत्या काही दिवसांत यासंबंधी वाटाघाटी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत स्वतंत्र बैठका झाल्यानंतर अल्बारेस यांनी सांगितले की, “करारासंबंधी वाटाघाटी सुरळीतपणे प्रगती करत आहेत. सर्व काही उत्तम प्रकारे पुढे जात आहे. आम्हाला कोणताही अडथळा अपेक्षित नाही,” असे ते म्हणाले.

हा करार पूर्ण झाल्यास, तो जगातील सर्वात मोठ्या मुक्त व्यापार क्षेत्रांपैकी एक निर्माण करेल, ज्यामध्ये सुमारे दोन अब्ज लोकांच्या बाजारपेठेचा समावेश असेल. अल्बारेस यांनी या कराराला आर्थिक आणि धोरणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले. “आम्हाला संपूर्ण जगाला हे स्पष्टपणे सांगायचे आहे की, आमचा मुक्त व्यापारावर पूर्ण विश्वास आहे आणि कोणत्याही आर्थिक दबावापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आमच्याकडे प्रतिबंधात्मक साधने देखील आहेत,” असे ते म्हणाले.

27 जानेवारी रोजी होणाऱ्या भारत–ईयू शिखर परिषदेपूर्वी, कार्बन बॉर्डर उपायोजना, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि स्टील क्षेत्रातील आयात शुल्कासह प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन रविवारी संध्याकाळी भारतात दाखल होणार आहेत.

यापूर्वी, दावोस येथील जागतिक आर्थिक मंचावर बोलताना वॉन डेर लेन यांनी म्हटले होते की, युरोपियन युनियन भारतासोबतचा मुक्त व्यापार करार अंतिम करण्याच्या जवळ आहे. त्यांनी याला “सर्व करारांची जननी” (the mother of all deals) असे संबोधले असून, व्यापार संबंध आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या युनियनच्या हेतूवर भर दिला आहे. त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे की, हा करार दोन अब्ज लोकांची बाजारपेठ तयार करेल, जी जागतिक जीडीपीच्या जवळपास एक चतुर्थांश असेल.

EU च्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात भारत आणि ईयू मधील वस्तूंचा व्यापार जवळपास 90% नी वाढला असून, 2024 मध्ये तो सुमारे 120 अब्ज युरोपर्यंत पोहोचला आहे.

व्यापाराच्या पलीकडे, अल्बारेस यांच्या दौऱ्याने संरक्षण आणि औद्योगिक सहकार्याच्या विस्तारावरही प्रकाश टाकला.

स्पॅनिश शिष्टमंडळाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, त्यांना आर्थिक आणि औद्योगिक भागीदारी मजबूत करण्यासाठी, विशेषतः लवचिक संरक्षण उत्पादन क्षमता निर्माण करण्यासाठी “मोठी संधी” दिसते आहे. अल्बारेस यांनी भारतात ‘C-295’ मालवाहू विमाने तयार करण्यासाठी, एअरबस-टाटा संयुक्त उपक्रमाचा भविष्यातील सहकार्यासाठी एक नमुना म्हणून उल्लेख केला आणि नोंदवले की, गुजरातमधील प्रकल्पातून तयार होणारे पहिले भारतनिर्मित एअरबस विमान सप्टेंबर 2026 पूर्वी, ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे आधीच तयार होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.

द्विपक्षीय संबंधांबाबत अल्बारेस म्हणाले की, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ लवकरच भारताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्पेनचा दौरा करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. “पंतप्रधान सांचेझ लवकरच अधिकृत भेटीसाठी भारतात येतील आणि पंतप्रधान मोदींनीही स्पेनला भेट देतील, अशी मला आशा आहे,” असे ते म्हणाले.

जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान, अल्बारेस यांनी ‘इंडो-पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह’मध्ये सामील होण्याचा स्पेनचा मानस अधिकृतपणे कळवला आणि भारतासोबतचे संबंध ‘धोरणात्मक भागीदारी’पर्यंत वाढवण्याची माद्रिदची इच्छा पुन्हा अधोरेखित केली. “आम्ही आमचे संबंध ‘धोरणात्मक असोसिएशन’मध्ये श्रेणीसुधारित करण्याची इच्छा व्यक्त करू, जे भारतासारख्या मित्रांसोबत असलेल्या संबंधांचे सर्वोच्च स्तर आहे,” असे ते म्हणाले.

राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, दोन्ही मंत्र्यांनी संयुक्तपणे 2026 मधील ‘भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि आर्टिफीशिअल इंटेलिजन्स द्विवार्षिक वर्षाच्या’ बोधचिन्हाचे अनावरण केले. अल्बारेस यांनी जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारताचे वर्णन एक ‘विश्वसनीय भागीदार’ म्हणून केले. “जगातील या अत्यंत गुंतागुंतीच्या काळात, भारतासारख्या विश्वासार्ह देशाशी आमचे संबंध जोपासणे स्पेनसाठी खूप महत्वाचे आहे. भारत असा देश आहे जो आंतरराष्ट्रीय कायद्यावर विश्वास ठेवतो, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या तत्त्वांचे समर्थन करतो आणि बहुपक्षीयतेवर विश्वास ठेवतो,” असे ते म्हणाले.

दोन्ही बाजूंनी यावेळी युरोप आणि इंडो-पॅसिफिकमधील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध केला आणि सामायिक सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleट्रम्प यांची ‘दावोस’ नीती: ग्रीनलँडचा करार करा, अन्यथा शिक्षेला सामोरे जा!
Next articleदक्षिण कोरियाने लागू केला जगातील पहिला व्यापक AI कायदा; वाचा सविस्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here