सन 1947मध्ये अखंड भारताची ब्रिटिशांनी फाळणी केली आणि जगाच्या नकाशावर पाकिस्तान हा देश उदयाला आला. पण वस्तुत: त्याच वेळी आणखी एका देशाच्या निर्मितीची पायाभरणी झाली; तो म्हणजे, बांगलादेश. ब्रिटिशांनी कायमच ‘फोडा आणि राज्य करा’ हे तत्त्व अवलंबले होते. त्यामुळे जातानाही पाकिस्तानची निर्मिती करूनच ते गेले. पण या नव्या पाकिस्तानात भौगोलिक, सामाजिक आणि मानसिक दरी होती. 1947नंतर ही दरी आणखी रुंदावत गेली आणि त्याची परिणती बांगलादेशच्या निर्मितीत झाली.
पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम भागात सर्व प्रकारचा दुरावा होता. भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर, पूर्व आणि पश्चिम भागात 1600 मैलांचे अंतर होते. मधोमध भारत आणि दोन्ही बाजूला पाकिस्तान होता. पाकिस्तानच्या दोन्ही भागात सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक भिन्नता होती. त्यातच पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी 1948 साली ढाका येथे भाषण करताना सांगितले की, पाकिस्तानची अधिकृत भाषा उर्दू असेल. ती पहिली ठिणगी म्हणता येईल. कारण पूर्व पाकिस्तानातील भाषा बंगाली आहे. विशेष म्हणजे, तिथले रहिवासी स्वत:ला आधी बंगाली आणि नंतर पाकिस्तानी समजायचे. बंगाली भाषा, साहित्य, संस्कृती याबद्दल त्यांना अभिमान होता. तर, दुसरीकडे पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी, सिंधी, बलुची, पठाण यांचे खाणे, पिणे, राहणे भिन्न होते. त्यामुळे धर्म हाच पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानला जोडणारा एकमेव दुवा म्हणता येईल.
सन 1961मध्ये जी जनगणना झाली, त्यानुसार पूर्व पाकिस्तानातील लोकसंख्या पाच कोटी तर, पश्चिम पाकिस्तानातील सुमारे चार कोटी होती. पाकिस्तानची एकूण निर्यात होती, त्यातील 70 टक्के वस्तू पूर्व पाकिस्तानात तयार होणाऱ्या होत्या. त्यात तागाच्या वस्तू, चहा अशा अनेक गोष्टी होत्या. म्हणजेच, पाकिस्तानला निर्यातीतून जे परकीय चलन मिळत होते, त्यात मोठा वाटा पूर्व पाकिस्तानचा होता. त्याउलट अमेरिका आणि युरोपकडून जी मदत मिळत होती, त्यातील 34-35 टक्के हिस्सा पूर्व पाकिस्तानला मिळत होता. एवढेच नव्हे तर, सरकारी नोकरी, सैन्यदल, न्यायपालिकांमध्ये बंगाली नागरिकांना डावलले जात होते. पूर्णपणे पक्षपाती वागणूक दिली जायची. एकूणच सरकारी सेवा आणि यंत्रणेतही भाषा आणि सांस्कृतिक विषमता पाहायला मिळत होती. सैन्यदलात पश्चिम पाकिस्तानचा दबदबा होता, तसेच सत्तेची सूत्रे पाकिस्तानी पंजाबींच्या हाती होती. पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी मुसलमान स्वत:ला श्रेष्ठ मानत होते. तर, बंगाली नागरिकांना दुय्यम समजत होते.
भारताबरोबर 1965च्या युद्धानंतर बंगालींमधील अलिप्ततावाद वाढू लागला. त्या युद्धाच्या वेळी बंगाली नागरिकांनी विचारले की, ‘भारताने पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला असता तर, तुम्ही आम्हाला कसे वाचवले असते.’ त्यावेळी सिंधी पाकिस्तानी असलेले झुल्फिकार अली भुत्तो आणि फिल्ड मार्शल आयुब खान यांनी सांगितले की, ‘आमचा मित्र चीन आहे, त्यांनी तुम्हाला वाचवले असते.’ त्यामुळे असंतोष आणखी वाढला.
आम्हाला स्वायत्तता द्या, अशी मागणी करत अवामी लीगचे नेते शेख मुजिबुर रहमान यांनी 1966मध्ये सहा मुद्द्यांचा फॉर्म्युला दिला होता. पूर्व आणि पश्चिम भागात समान असे काही नाही, त्यामुळे स्वतंत्र चलन पाहिजे, दोघांचा अर्थसंकल्प वेगळा-वेगळा असायला हवा, विदेशी गंगाजळी दोघांकरिता स्वतंत्र असायला हवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दोघांचे स्वतंत्र सैन्यदल हवे, याचा त्या सहा मुद्द्यांमध्ये समावेश होता.
नोव्हेंबर 1970मध्ये भोला वादळाने पूर्व पाकिस्तानात थैमान घातले, त्यावेळी पश्चिम पाकिस्तानने मदत देताना उदासीनता दाखविली. त्यामुळे नाराजी आणखी वाढली. त्यानंतर महिन्याभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बंगाली मतदारांनी ही नाराजी मतांद्वारे दाखवली. पूर्व बंगालमधील 169पैकी 167 जागा अवामी लीगने जिंकल्या. तर, पश्चिम पाकिस्तानातील 144 जागांपैकी 83 जागा झुल्फिकार अली भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला मिळाल्या. त्यामुळे शेख मुजिबुर रहमान हे पंतप्रधानपदाचे दावेदार होते. पण याह्या खान यांच्यासारखे जे खानदानी पाकिस्तानी होते, त्यांना हा निकाल मान्य नव्हता. एक बंगाली म्हणजेच शेख मुजिबुर रहमान पाकिस्तानचे पंतप्रधान कसे बनू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. नेमका हाच टर्निंग पॉइंट ठरला.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य, राष्ट्राध्यक्ष याह्या खान आणि भुत्तो यांच्यात हातमिळवणी झाली. त्यांना मुजिबुर रहमान यांंना एक हाती सत्ता द्यायची नव्हती. म्हणून भुत्तो यांच्यासमवेत एकत्रित सत्ता स्थापन करण्यास रहमान यांना सांगण्यात आले. पण, आपला सहा मुद्द्यांचा फॉर्म्युला मान्य करा किंवा पंतप्रधान बनवा, अशी ठाम भूमिका शेख मुजिबुर रहमान यांनी घेतली. तेव्हा याह्या खान यांनी राष्ट्रीय संसदेचे सत्र पुढे ढकलले. त्यामुळे शेख मुजिबुर रहमान यांनी मार्चमध्ये ढाका येथे पत्रकार परिषदेत घेऊन आपली केली जाणारी कोंडी मांडली. त्याचे पडसाद पूर्व पाकिस्तानात लगेच उमटले. तेव्हा सत्तेची सूत्रे हाती ठेवू पाहणाऱ्यांच्या लक्षात आले की, परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पण काहीही झाले तरी, शेख मुजिबुर रहमान यांना पंतप्रधान होऊ द्यायचे नाही, याच मनसुब्याने पाकिस्तानी सैन्याकडून दडपशाही करण्याचा कट रचला गेला.
एकीकडे शेख मुजिबुर रहमान यांच्याशी बोलणी सुरू असताना दुसरीकडे लष्करी कारवाईची तयारी सुरू होती. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये भौगोलिकदृष्ट्या खूप अंतर होते आणि भारताच्या हवाई क्षेत्रातून विमाने घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानातून हवाई दलाची विमाने कोलंबोला जात होती आणि नंतर तेथून ढाक्यात दाखल व्हायची. त्याद्वारे पाकिस्तानी सैनिक तिथे तैनात करण्यात आले.
15 ते 25 मार्च 1971, अशी 10 दिवस बोलणी सुरू होती. चर्चेतून कोंडी फुटत नाही, असे लक्षात आल्यानंतर याह्या खान 25 मार्चला रात्री आठ-सव्वाआठच्या सुमारास ढाक्याहून निघाले आणि रात्री 11.30-12च्या सुमारास ते कराचीला पोहोचणार होते. ते कराचीत पोहोचताच पूर्व पाकिस्तानात ‘ऑपरेशन सर्च लाइट’ सुरू करण्यात येणार होते. मध्यरात्रीपासून तसे झाले देखील. लष्करी गव्हर्नर जनरल टिक्का खान याने तसे आदेश दिले.
या ऑपरेशनचे पहिले लक्ष्य होते, ढाका युनिव्हर्सिटी. जे विद्वानांचे केंद्र समजले जात होते. अवामी लीगचा तो बालेकिल्ला होता. तेथील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थी नेते यांच्यातील काही जणांना जीवे मारण्यात आले तर, काहींना अटक करण्यात आली. जेव्हा शेख मुजिबुर रहमान यांना हे समजले, तेव्हा आपली अटक अटळ आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सहकाऱ्याना भूमीगत व्हायला सांगितले. सहकरी गेल्यावर त्यांना एक संदेश प्रसारित करायचा होता. पण ढाका रेडिओ स्टेशनवर लष्कराने कब्जा केला होता. त्यामुळे त्यांनी 25 मार्चच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे 26च्या पहाटे बांगलादेशच्या निर्मितीची घोषणा केली. त्यानंतर तासाभरातच त्यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले.
यादरम्यान लष्कराने मोठ्या प्रमाणावर नरसंहार, जाळपोळ सुरू केली होता. त्याच रात्री जवळपास तीन हजार लोकांना मारण्यात आले. त्यातील बहुतांश ढाका युनिव्हर्सिटीच्या आसपासचे हिंदू बंगाली होते. पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानचा पूर्णपणे ताबा घेतला होता. पुढे सहा महिने ही जाळपोळ आणि नरसंहार सुरूच होता. मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार झाले. त्यावेळी भारतात 60-70 लाख निर्वासित दाखल झाले होते. त्यामुळे भारतावरील दबाव वाढला. मग भारताने हस्तक्षेप करत केलेली लष्करी कारवाई सर्वश्रुत आहे.
…आणि विदारक चित्र समोर आले
पूर्व पाकिस्तानात आम्ही कशी प्रभावी कारवाई केली हे दाखविण्यासाठी लष्कराने जून 1971मध्ये पश्चिम पाकिस्तानातील 15 ते 20 पत्रकारांना पूर्व पाकिस्तानात आणले. लष्कराने सांगितल्याप्रमाणे या पत्रकारांनी बातम्या दिल्या. त्यांच्यात अँथनी मॅस्करनन्स हे कराचीचे पत्रकार होते. तेथील अत्याचार पाहून ते हादरले होते. त्यांनीही सांगितल्याप्रमाणेच रिपोर्ट दिला; पण त्यांचे अंतर्मन त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यावेळी वर्षातून केवळ एकदाच विदेश दौरा करण्याची परवानगी होती आणि अँथनी हे आधीच विदेशात जाऊन आले होते. त्यामुळे त्यांचा देशाबाहेर जाण्याचा प्रश्न होता.
आपल्याकडे मोठी बातमी असल्याचे त्यांनी लंडन टाइम्सच्या संपादकांना कळविले होते. त्यांनी सर्वात आधी आपल्या कुटुंबाला इंग्लंडमध्ये पाठविले. नंतर ते अफगाणिस्तान, इराण, तुर्कीमार्गे लंडनमध्ये पोहोचले. जुलैमध्ये त्यांचा एक सविस्तर रिपोर्ट लंडन टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला. ‘Genocide’ एवढेच हेडिंग त्या लेखाला देण्यात आले होते. हा लेख खूप गाजला. त्याआधीही काही रिपोर्ट प्रसिद्ध झाले होते. पण एवढे सविस्तर नव्हते. त्यामुळे अँथनी यांच्या रिपोर्टची दखल जगभरात घेतली गेली. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर टीकेची झोड उठविली. लष्करी हस्तक्षेपासाठी भारतालाही ते अनुकूल ठरले.
– नितीन अ. गोखले
(शब्दांकन – मनोज जोशी)
संबंधित मुलाखत पाहा –
https://youtu.be/pq5HeeFeq2E