भारतीय खासगी क्षेत्रातील संरक्षण साहित्य निर्मिती करणाऱ्या भारत फोर्ज या कंपनीला संघर्ष नसलेल्या (शांतता) क्षेत्रातून प्रथमच 155.5 दशलक्ष डॉलर्स किमतीच्या 155 मिमी आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म निर्यातीची ऑर्डर मिळाली आहे. पुणेस्थित भारत फोर्ज लिमिटेडकडून 9 नोव्हेंबर रोजी याची घोषणा करण्यात आली. ही निर्यात ऑर्डर 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी असेल.
कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, भारत फोर्ज या कंपनीची उपकंपनी असणाऱ्या कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला 155 मिमी आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मची निर्यात ऑर्डर मिळाली असून 3 वर्षांच्या कालावधीत ही ऑर्डर पूर्ण करायची आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 155.50 दशलक्ष डॉलर्स आहे.”
गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केलेल्या भारत फोर्जने विविध संरक्षण उत्पादने निर्माण केली आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या तोफांचाही समावेश आहे. भारत फोर्जने कल्याणी – एम 4 ही चिलखती वाहने भारतीय लष्कराला विकली असली तरी कंपनीच्या तोफांसाठी देशांतर्गत ऑर्डर अद्याप मिळणे बाकी आहे.
शांतता क्षेत्रासाठी मिळालेली ही ऑर्डर म्हणजे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत हा अजेंडा तसेच देशात बनलेल्या संरक्षणविषयक विविध सामग्रींच्या निर्यातीसाठी सातत्याने दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहानाचा एक उत्तम पुरावा आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संरक्षण क्षेत्रातील निर्यात संधी मिळवण्याच्या उद्देशाने भारत फोर्ज, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सअंतर्गत आपला संरक्षण आणि एरोस्पेस व्यवसाय मजबूत करत आहे. भारत फोर्ज लिमिटेड (BFL) ही कल्याणी समूहाची प्रमुख कंपनी आहे, ज्यामध्ये एरोस्पेस, व्यावसायिक आणि प्रवासी अशा दोन्हींसाठी वाहननिर्मिती, तेल आणि वायू, लोकोमोटिव्ह, सागरी, ऊर्जा, बांधकाम, खाणकाम आणि सामान्य अभियांत्रिकी यासह विविध क्षेत्रांसाठी गंभीर आणि सुरक्षा घटकांची विस्तृत श्रेणी तयार केली जाते.
(अनुवाद : आराधना जोशी)