दुसऱ्या आफ्रिका-भारत संयुक्त सराव ‘AFINDEX’च्या निमित्ताने पहिल्या ‘भारत-आफ्रिका आर्मी चीफ्स कॉन्क्लेव्ह’चे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. आफ्रिकेच्या सुरक्षाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी, भारतीय संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान यांची चाचपणी करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी आफ्रिकन देशांना निमंत्रित केले. भारताचे आफ्रिकेबरोबर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने, भारतीय लष्कराकडून आयोजित केलेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि 31 आफ्रिकन राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
लष्करप्रमुखांच्या कॉन्क्लेव्हला संबोधित करताना संरक्षणमंत्री म्हणाले, “अलिकडच्या वर्षांत भारत एक प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. येथे संरक्षण उत्पादनाची इकोसिस्टम निर्माण करण्यात आली असल्याने तांत्रिकदृष्ट्या मनुष्यबळाचा मोठा फायदा मिळू शकतो. तुमच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय संरक्षण उद्योग तुमच्यासोबत काम करू शकतो. आमच्या आफ्रिकन मित्रांना त्यांच्या संरक्षण गरजा स्वदेशातच पूर्ण करण्याच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी, संरक्षण उत्पादन, संशोधन आणि विकासामध्ये आमचे असलेले कौशल्य आणि ज्ञान त्यांना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांमधील या 10 दिवसीय संयुक्त सरावामुळे सशस्त्र दलांना एकमेकांकडून शिकणे आणि आंतरकार्यक्षमतेला (लष्करी उपकरणे किंवा गट एकमेकांच्या सहकार्याने ऑपरेट करण्याचे कौशल्य) प्रोत्साहन देण्याची उत्कृष्ट संधी मिळेल. आपल्या अंतर्गत क्षमता विकसित करण्याबरोबरच परस्पर क्षमता वाढविण्यासाठी आफ्रिकन राष्ट्रांवर भारताचे सातत्याने लक्ष केंद्रित असल्याचे ‘AFINDEX’च्या माध्यमातून दिसते, असेही त्यांनी सांगितले.
आफ्रिका-इंडिया मिलिटरीज फॉर रीजनल युनिटी (AMRUT) या कल्पनेला चालना देण्यासाठी आफ्रिकन राष्ट्रांच्या लष्करप्रमुखांना कॉन्क्लेव्हमध्ये आमंत्रित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आफ्रिकन देशांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चीनचा वाढता दबदबा आणि दूरदृष्टीने या देशांमध्ये केलेला प्रवेश लक्षात घेता, या कॉन्क्लेव्हचे धोरणात्मक महत्त्व लक्षात येते. याशिवाय, संयुक्त राष्ट्रांच्या सूचनेनुसार शांतता अभियानासाठी भारताने आफ्रिकन देशांमध्ये आपले सैन्य तैनात केले आहे.
“आफ्रिकन राष्ट्रांच्या संरक्षण उद्योगांची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय संरक्षण उद्योग योगदान देईल, कारण यामुळे भारतीय कंपन्यांना या प्रदेशांत त्यांचा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील निर्माण होईल”, असे प्रतिपादन भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.
“संरक्षण उत्पादनातील सहयोगी दृष्टिकोन भारत-आफ्रिका सहकार्यासाठी एक ‘विन – विन सिच्युएशन’ असेल. आज आपण भारत-आफ्रिका संरक्षण भागीदारीचे प्रमुख आधारस्तंभ असून प्रादेशिक सुरक्षेत योगदान देण्याच्या भारतीय संरक्षण उद्योगाच्या क्षमतेवर विचार करू,” असेही ते म्हणाले.
या सरावात तब्बल 31 आफ्रिकन देशांच्या लष्कराचे प्रतिनिधित्व त्यांच्या तुकडी किंवा निरीक्षकांच्या पथकांद्वारे केले जात आहे. 10 आफ्रिकन लष्कर प्रमुख आणि संबंधित देशांच्या प्रमुखांचे 21 प्रतिनिधी या कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. व्यावहारिक आणि व्यापक चर्चा तसेच सामरिक सरावाचा अंतर्भाव केल्याने हा कार्यक्रम, यूएन पीसकीपिंग फोर्सेसच्या (UNPKF) सध्याच्या सृजनशील उपक्रमानुरूप बनला आहे.
कॉन्क्लेव्हमध्ये भारत-आफ्रिका संरक्षण भागीदारी, भारतीय संरक्षण उद्योगाची क्षमता आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी योगदान यावर लष्करी आणि भारतीय संरक्षण उद्योग तज्ञांच्या चर्चेचा समावेश आहे.
“भारत-आफ्रिका लष्करप्रमुख संवादांमुळे अशा एका नव्या युगाची सुरूवात होईल जिथे आम्हाला तंत्रज्ञान आणि उपकरणे पुरवण्यासाठी नेहमी उत्तरेकडील देशांवर अवलंबून न राहता ‘दक्षिण ते दक्षिण’ असे सहकार्य मिळेल. दक्षिण ते दक्षिण सहकार्य अधिक उपयुक्त आणि अधिक फलदायी असेल. या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की, आम्ही भारतीय उद्योगाकडून तुम्हाला हवे ते पाठबळ देऊ शकतो. आम्ही सेवा देण्यासाठीच येथे आहोत”, असा विश्वास सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सचे (SIDM) अध्यक्ष एस. पी. शुक्ला यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.
FICCIचे प्रतिनिधित्व करणारे L&Tच्या संरक्षण विभागाचे प्रमुख अरुण रामचंदानी म्हणाले, “आम्ही लष्करी प्लॅटफॉर्म, ग्राहकानुरुप संरक्षण उपकरणे तसेच अतिशय किफायतशीर सोल्युशन्स पुरवू शकतो, आम्ही ग्राहकांना संरक्षण तंत्रज्ञानदृष्टीने सक्षम करू शकतो आणि खास अभियांत्रिक उपायांद्वारे त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. आम्ही एकत्र काम करण्याच्या सह-विकास आणि सह-उत्पादन मॉडेलसाठी तयार आहोत, तसेच आम्ही विविध परंपरागत उपकरणांचे आधुनिकीकरण करू शकतो.”
भेट देणाऱ्या प्रतिनिधींना, देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेची ओळख करून देण्यासाठी आणि भारतीय संरक्षण उद्योगांशी संवाद साधण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या लष्करी प्लॅटफॉर्मचे प्रदर्शन आज, 29 मार्च रोजी आयोजित केले आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)