जगातील सर्वात कठीण अशा सर्वोच्च उंचीवर तुमच्यातल्या धैर्याची परीक्षा पाहणाऱ्या पहिल्या ‘सोल ऑफ स्टील चॅलेंज’च्या उपांत्य फेरीसाठी 14 राज्यांतील 23 स्पर्धक पात्र ठरले आहेत. विशेष दलातील दिग्गज अधिकारी आणि पर्वतारोहण तसेच सर्वोच्च उंचीवरही कसा तग ठेवायचा या विषयात तरबेज अशा सेना अधिकाऱ्यांकडून उत्तराखंडातील नैनिताल आणि गमशाली येथील शिबिरांमध्ये अत्यंत कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर, 400हून अधिक इच्छुकांच्या प्रारंभिक यादीतून या 23 तरुण पुरुष आणि महिलांची निवड करण्यात आली आहे.
जूनच्या मध्यावर होणाऱ्या उपांत्य फेरीत, सुमारे 12 ते 14 स्पर्धक साधारणपणे तीन किंवा चार संघांमध्ये विभागले जातील आणि अंतिम स्पर्धेत उतरतील. उत्तराखंडच्या पर्वतांमध्ये होणाऱ्या या अंतिम फेरीत त्यांना लष्करी पद्धतीने सर्वोच्च उंचीवर होणारी ऑपरेशन्स आणि पर्वतीय साहसी खेळ अशा संमिश्र आव्हानांचा सामना करावा लागेल.
जोशीमठ येथील आयबेक्स ब्रिगेड – भारतीय लष्कराची सर्वात जुनी माऊंटन ब्रिगेड आणि ‘कॉन्कर लँड एअर वॉटर’ने (सीएलएडब्ल्यू) – भारतीय विशेष दलातील ज्येष्ठ दिग्गजांचा गट – संयुक्तपणे आयोजित केलेल्या या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन 14 जानेवारी रोजी देहरादून येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते औपचारिकपणे झेंडा दाखवून करण्यात आले होते.
परंतु असंख्य सुरक्षाविषयक मंजुऱ्या तसेच लॉजिस्टिक आणि सुरक्षिततेच्या कारणामुळे याचे नियोजन आणि तयारी सहा महिने आधीच सुरू झाली. भारतीय सैन्याची एकमेव स्वतंत्र माऊंटन ब्रिगेड म्हणजे Ibex ब्रिगेड ही हिमालयातील गढवालच्या बाजूने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे 250 किमीचे रक्षण करते. मे 2020पासून एलएसीवर तणाव निर्माण झाला आहे. भारताने दावा केलेल्या भागात चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथे हिंसक संघर्ष सुरू झाला. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण तर झालाच, पण संभाव्य युद्धाच्या भीतीने परिसरातील अनेक गावे रिकामी झाली.
याच पार्श्वभूमीवर ग्रेटर हिमालयातील साहसी खेळ आणि पर्यटनाच्या मोठ्या क्षमतेचे प्रदर्शन करण्याबरोबरच सीमेबाबत भारताकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांची पुष्टी आणि त्याचे प्रमाणीकरण करणे ही या कार्यक्रमामागील कल्पना आहे. या भागातील स्थानिकांसाठी तसेच विशेष फोर्समधील ज्येष्ठांसाठी आवश्यक रोजगाराच्या संधी देखील प्रदान करेल. या ज्येष्ठांकडे विविध भूप्रदेशात जगण्यासाठी लागणारी कौशल्ये, पर्वतारोहण, स्कायडायव्हिंग, वेळप्रसंगी निःशस्त्र लढणे आणि प्रतिकूल भूप्रदेश तसेच हवामानात आपत्कालीन वैद्यकीय मदत देणे यासारखी अनेक कौशल्ये आणि त्यात निष्णात असूनही, कॉर्पोरेट जगतात त्यांना नोकरीचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत.
भारतीय सैन्य आणि CLAWला आशा आहे की, परदेशी नागरिक देखील या स्पर्धेसाठी नोंदणी करतील, ज्यामुळे जिथे मानवी सहनशक्ती आणि धैर्याची मर्यादा याचा कस लागले, अशा या स्पर्धेला एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे स्वरूप येईल. ही स्पर्धा (आणि त्यापूर्वीची खडतर प्रशिक्षण सत्रे) आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी चित्रित केली जात आहेत.
दक्षिण भारतातील विमानतळावर सुरक्षा प्रमुख असलेल्या माजी मरीन कमांडोच्या मते, “सोल ऑफ स्टील’ने स्पर्धेसाठी असलेल्या सगळ्या उद्दीष्टांची पूर्तता केली आहे आणि मला खात्री आहे की, ती लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमुख साहसी पर्यटन कार्यक्रमांमध्ये विकसित होईल. सुरक्षा क्षेत्रातील दिग्गज आणि भारतीय सैन्याद्वारे हा उपक्रम चालवला जात असल्यामुळे तो शाश्वत स्वरुपात असेल, याची मला खात्री आहे. आयोजकांना माझा सलाम आणि शुभेच्छा.”
अनुवाद : आराधना जोशी