“2024 हे रशिया-युक्रेन संघर्षाचे शेवटचे वर्ष असेल याबद्दल मी साशंक आहे,” असा अंदाज मॉस्कोस्थित थिंक-टँक, वालदाई डिस्कशन क्लबच्या फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट अँड सपोर्टचे संशोधन संचालक, रशियन शैक्षणिक तज्ज्ञ फ्योडोर लुकियानोव्ह यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे, आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत रशिया संघर्ष सुरूच ठेवणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
स्ट्रॅटन्यूज ग्लोबलला दिलेल्या ऑन-कॅमेरा मुलाखतीदरम्यान लुकियानोव्ह म्हणाले की, “रशियालाही हा संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात यावा असे वाटते, मात्र त्यासाठी ‘तात्पुरते उपाय’ अवलंबता येणार नाहीत. युक्रेन हा देश आपल्याविरोधात असू नये अशीच रशियाची इच्छा आहे, मात्र, त्यासाठी युक्रेनचे शासन बदलणे आणि नवीन शासनाकडे ‘मर्यादित लष्करी आणि भौगोलिक राजकीय क्षमता असणे’ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना कोणत्याही प्रकारे ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत.”
त्यांच्या मते भारत-रशिया संबंध अत्यंत आदर्श होते. इतिहासात डोकावून बघितले तर रशियाचे दुसऱ्या कोणत्याही देशाशी इतके घनिष्ठ संबंध नव्हते आणि आता जरी चीनशी जवळीक झाली असली तरी, भूतकाळात त्यांच्यातही संघर्ष झाला होता. भारताच्या बाबतीत असे कधीच घडले नाही.
”रशिया आणि भारत यांच्यातील संबंध घनिष्ठ आहेतच; पण आता हे संबंध नव्या पातळीवर घेऊन जाण्याची गरज आहे. धोरणात्मकदृष्ट्या आपल्यात आधीपासून बरेच साम्य आहे, त्यामुळे आता आपण अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. रशियाप्रमाणेच आता भारतही आधुनिक उच्च तंत्रज्ञानात अग्रेसर बनला आहे. त्यामुळे या क्षेत्रांमध्ये आपण एकत्र काम करू शकतो का, हे तपासण्याची गरज आहे,” असे लुकियानोव्ह यांनी स्पष्ट केले.
योगायोगाने, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (VIF) या भारतीय थिंक-टँकसोबत वालदाई डिस्कशन क्लब एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करण्यासाठी एकत्र काम करत आहे. उभय देशांमधील सहकार्य वाढवण्यासाठी कोणते व्यवहार्य उपाय असू शकतात, याचा तपशील त्यात असेल.
भारत आणि चीन यांच्यातील ताणलेल्या परिस्थितीमुळे, रशिया आणि चीनच्या वाढत्या संबंधांबाबत भारताला वाटणारी चिंता आम्ही समजू शकतो. पण त्याच वेळी, आम्ही आमच्या भारतीय मित्रांना हे समजावून सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की, चीनशी संबंध रशियासाठी अपरिहार्य आहे. यामागे केवळ पाश्चिमात्य देशांसोबत उद्भवलेला संघर्ष हेच कारण नाही, मात्र तुमचा शेजारी जर इतका मजबूत आणि आश्वासक असेल तर त्याच्याशी संबंध प्रस्थापित न करणे मूर्खपणाचे ठरेल.”
भारत आणि अमेरिका संबंधांबद्दल रशियन राज्यकर्त्यांना काही आक्षेप आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की “रशियामध्ये याबद्दल चर्चा होत आहेत आणि काही लोकांना हे नवे संबंध फारसे आवडलेले नाहीत. पण ती गंभीर स्थिती असल्याबद्दल रशिया चिंताग्रस्त होता, पण ती चिंता देखील आता संपली आहेत. नव्या जागतिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या संधींचा वापर करून घेण्यासाठी कोणताही देश आता इतर देशांबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, ही वस्तुस्थिती आता आम्ही स्वीकारली आहे.’
त्यांनी आजच्या भूराजकीय परिस्थितीचे वर्णन “अराजकतेचे जग” असे केले, जेथे विद्यमान देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि त्यांचे वर्चस्व नाहीसे होत चालले आहेत. नाटो, काही प्रमाणात, आपला दबदबा टिकवून आहे. मात्र तो आणखी किती काळ राहतो ते बघावे लागेल. आणखी एक लक्षात येण्याजोगा ट्रेंड म्हणजे अमेरिकेची शक्ती आणि विश्वासार्हता हळूहळू संपुष्टात येत आहे, त्यामुळे एकेकाळी अमेरिकेशी एकनिष्ठ असलेले तुर्कीसारखे देश हळूहळू त्याच्यापासून दूर होताना दिसत आहेत. युक्रेन युद्धावर आपला प्रभाव पाडण्याच्या आणि आर्थिक निर्बंधांद्वारे रशियाच्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवण्याच्या अमेरिकेच्या मर्यादा लक्षात आल्याने आज, तुर्की, आखाती देशांमधील राजे, आफ्रिकन आणि आग्नेय आशियाई राष्ट्रे यासारखे अमेरिकेचे प्रमुख अनुयायी आता लवचिक धोरणाचा अवलंब करत असल्याचे बघायला मिळते.
फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट अँड सपोर्ट ऑफ द वालदाई डिस्कशन क्लबचे अध्यक्ष अँड्री बायस्ट्रिटस्की यांच्या मते, “योगायोगाने, यंदा रशियाचा जीडीपी 3.1% ने वाढण्याची अपेक्षा आहे. रशियाची सध्याची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली आहे. अर्थव्यवस्थेची उत्तम प्रगती असून रशियन समाज सकारात्मक आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(अनुवाद : आराधना जोशी)