जम्मू आणि काश्मीर सीमेवरील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु राजौरी-पूंछ आणि जम्मूमधील पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागात परत एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. घुसखोरीचे सतत होणारे हे प्रयत्न सीमेपलीकडे दहशतवादी तळ असल्याचेच द्योतक आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले. सोमवारी 78 व्या लष्कर दिनानिमित्त लखनऊ येथे आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बोलत होते.
जनरल पांडे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांत दहशतवादी कारवाया वाढल्या असल्या तरी आपल्या लष्कराच्या प्रयत्नांमुळे जम्मू-काश्मीरच्या मध्यवर्ती भागातील हिंसाचार आणि घुसखोरीमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
गेल्या आठवड्यात ‘भारतशक्ती’चे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत लष्करप्रमुखांनी खुलासा केला होता की, राजौरी-पूंछ भागात गेल्या अठरा महिन्यांत मोठ्या प्रमाणात झालेल्या दहशतवादी कारवायांचा संबंध आपल्या शेजारील शत्रूराष्ट्राच्या छुप्या हेतूंशी निगडीत आहे. हे शत्रूराष्ट्र दहशतवादाला प्रोत्साहन देतात तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LOC) ओलांडून आपल्या भूप्रदेशात नियोजित पद्धतीने छुप्या संघटना कार्यरत करतात. गेल्या तीन वर्षांत आम्ही त्या भागात कार्यरत असलेल्या 45 विदेशी दहशतवाद्यांचा यशस्वीपणे खात्मा केला आहे. 2019 नंतर आतापर्यंतचा काळ हा सामान्य आणि शांततापूर्ण होता, आता मात्र विकासाच्या दिशेने वेगाने प्रगती करणाऱ्या या भूप्रदेशात विरोधक पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या भूप्रदेशात अद्ययावत रणनीती कशी राबवली जात आहे, याच तपशीलही लष्करप्रमुखांनी या मुलाखतीत उघड केला. ते म्हणाले की, लष्कराने या भागातील घुसखोरी आणि दहशतवादविरोधी ग्रिडची पुनर्रचना केली आहे. अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे, आणि ह्युमन इंटेलिजन्स ओळखण्यासाठी आणि त्यांच्याशी निगडीत माहिती गोळा करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचे जाळे वाढवण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. असे ह्युमन इंटेलिजन्स ओळखून त्यांना एकत्र आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे सशस्त्र दलांना अधिक प्रभावीपणे बळकट करणे. याशिवाय, अशा क्षेत्रातील इतर सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांसोबत एकत्रितपणे योग्य समन्वयाने केलेल्या ऑपरेशन्सचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
ऑपरेशनमध्ये अलीकडे दिसून आलेल्या विसंगत प्रकारांची सखोल चौकशी केली जाईल. दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल. लष्कर पूर्णतः व्यावसायिक आणि त्यांच्या नीतिमूल्यांशी सुसंगत असेच वर्तन करेल, असेही आश्वासन लष्करप्रमुखांनी दिले. स्थानिकांबरोबर लष्कराचा सुसंवाद असेल. जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारे काम करणे, हा एक नवा प्रयोग आहे. दहशतवाद्यांशी लढा देणाऱ्या इतर एजन्सींसोबत म्हणजेच पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या दोघांशीही समन्वयाने काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पूंछ सेक्टरमध्ये नुकत्याच झालेल्या सामान्य नागरिकांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या वादावर जनरल पांडे यांनी उत्तर देताना सांगितले की, कोठडीतील कथित छळ आणि तीन नागरिकांच्या मृत्यूची चौकशी “नि:ष्पक्ष, पारदर्शक आणि योग्य कालावधीत” पूर्ण केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला. गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाले. त्यासंदर्भात लष्कराने या नागरिकांना ताब्यात घेतल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. अयोग्य वर्तन असेल किंवा नीतिमूल्यांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्याचे आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन लष्करप्रमुखांनी दिले.
“या आरोपांची आम्ही अत्यंत नि:ष्पक्ष, पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने चौकशी करत आहोत. मी आश्वस्त करतो की, मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांचे पालन न केल्याचे कोणीही आढळले किंवा त्यांचे वर्तन नियमबाह्य असेल, तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू,” असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले.
चीन आणि पाकिस्तान अशा दुहेरी धोक्याबाबत बोलताना जनरल पांडे म्हणाले की, पश्चिम आणि उत्तर सीमेवर उच्च पातळीवरील कामगिरीची तयारी करणे आणि त्यात तत्परता राखणे हे एक आव्हान आहे. या क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या कामगिऱ्यांबाबत आम्ही वचनबद्ध तर आहोतच, पण त्याचबरोबर अतिरिक्त तयारी कायम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
(अनुवाद : आराधना जोशी)
सविस्तर मुलाखत बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा