निज्जर हत्या प्रकरणी तीन भारतीयांना अटक

0
निज्जर
3 मे 2024 रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील सरे येथे शीख फुटीरतावादी नेते मनदीप सिंग निज्जर याची 2023 साली करण्यात आलेले हत्येचे ठिकाण गुरु नानक शीख गुरुद्वारा. सौजन्य रॉयटर्स/जेनिफर गौथियर

ओटावाः जून 2023 मध्ये ब्रिटीश कोलंबिया प्रांतात शीख फुटीरतावादी नेते मनदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी शुक्रवारी तीन जणांवर गुन्हा दाखल केला असे कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी न्यायालयीन कागदपत्रांचा हवाला देत सांगितले.

शुक्रवारी झालेल्या या अटकेची बातमी सर्वप्रथम सीटीव्ही आणि ग्लोबल न्यूजने प्रसारित केली. सीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हे तिघेही भारतीय नागरिक आहेत.
सहाय्यक आयुक्त डेव्हिड टेबौल म्हणाले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून इतरही गोष्टीं तपासल्या जात आहेत. यामध्ये “भारत सरकारशी असलेल्या संबंधांची चौकशी करणे याचाही समावेश असल्याचे,” त्यांनी दूरचित्रवाणीवरील पत्रकार परिषदेत सांगितले.

शीख समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या व्हँकुव्हर उपनगरातील सरे येथील एका गुरुद्वाराबाहेर 45 वर्षीय निज्जरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भारतीय गुप्तचर खात्याचा कॅनडा आणि अमेरिकेत काही हत्यांच्या कटात कथित सहभाग असल्याचा व्हाईट हाऊसने खुलासा करत त्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर काही दिवसांनी निज्जारच्या हत्येची बातमी पसरली.

कॅनडातील शीख फुटीरतावादी गटांच्या उपस्थितीमुळे नवी दिल्ली बऱ्याच काळापासून निराश झाली आहे. निज्जरला भारताने ‘दहशतवादी’ म्हणून घोषित केले होते.
कॅनडाचे अधिकारी निज्जर या कॅनेडियन नागरिकाच्या हत्येशी भारतीय सरकारी एजंट्सचा संबंध असल्याच्या आरोपांचा पाठपुरावा करत असल्याचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केले होते. भारताने मात्र ट्रुडो यांचा हा दावा “बिनबुडाचा” असल्याचे सांगत फेटाळला. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस स्थानिक वेळेनुसार दुपारी 3ः30 वाजता (1930 जीएमटी) या प्रकरणाबद्दल माध्यमांना माहिती देणार आहेत.

आरसीएमपी किंवा ओटावा येथील भारतीय दूतावासाकडून या अटकेबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.

या प्रकरणी तपासात सहकार्य करण्यासाठी कॅनडा भारतावर दबाव आणत होता. भारत सरकारच्या एका अधिकाऱ्याने शीख फुटीरतावादी तसेच अमेरिका आणि कॅनडाचा दुहेरी नागरिक असलेल्या गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या प्रयत्नाचा कट रचला होता असा आरोप गेल्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला होता.
कॅनेडियन कायदा अंमलबजावणी संस्थेचे प्रभारी आणि कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लांक यांनी थेटपणे या अटकेची पुष्टी केली नसली तरी निज्जरच्या हत्येचा तपास “अजूनही सुरू असून आवश्यक ती पोलिस कारवाई करण्यात येत आहे,” असे सांगितले.

कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने यापूर्वी एका स्त्रोताचा हवाला देत सांगितले की तपासकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये असणाऱ्या संशयितांची ओळख पटवली होती आणि त्यांच्यावर कडक पाळत ठेवण्यात आली होती.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here