दि. ०२ मार्च: भारतीय लष्कराच्या पूर्व विभाग मुख्यालयाच्यावतीने नुकतेच रणगाडाविरोधी युद्धसरावाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्व विभागातील ‘त्रिशक्ती कोअर’च्या आधिपत्याखालील क्षेत्रात पश्चिम बंगालमधील ‘तिस्ता फायरिंग रेंज’वर २० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हा सराव आयोजित करण्यात आला होता. पूर्व मुख्यालयाच्यावतीने दरवर्षी या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र (एटीजीएम) सरावाचे आयोजन करण्यात येते. या सरावात लष्कराच्या पायदळ व यांत्रिकी तुकडीतील (मेकनाइस्ड इन्फंट्री) १५०० जवान व अधिकारी सहभागी झाले होते. लष्कर युद्धसज्ज राहण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वाचा मानला जातो.
लष्कराने आयोजित केलेल्या या सरावात एकूण २६० क्षेपणास्त्रे डागली गेली. मुख्यतः मेकनाइस्ड इन्फंट्री रणक्षेत्रात असताना क्षेपणास्त्रांचा कसा वापर करायचा, याचा या सरावात समावेश होता. स्वदेशांतर्गत निर्मित ‘लाईट स्ट्राईक व्हेईकल’ व ‘ग्राउंड डिटॅचमेंट’चाही या सरावात समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर ‘हेलिकॉप्टर सिम्युलेशन’च्या माध्यमातून हवाईमार्गे झालेले हल्ले कसे निःष्प्रभ ठरवता येतील, याचाही सराव करण्यात आला. युद्धजन्य क्षेत्रात वेगवेगळ्या परिस्थितीत कसा प्रतिसाद देता येईल, याचीही चाचणी या वेळी घेण्यात आली.
‘त्रिशक्ती कोअर’चे प्रमुख या सरावाच्या प्रसंगी उपस्थित होते. सरावात सहभागी झालेल्या अधिकारी आणि जवानांनी दाखविलेली व्यावसायिक कुशलता आणि त्यांची युद्धजन्य परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेची त्यांनी प्रशंसा केली. ‘ही अत्याधुनिक शस्त्रप्रणाली वापरण्याची क्षमता तुम्ही अधिक वृद्धींगत करा,’ असा सल्लाही त्यांनी जवान व अधिकाऱ्यांना दिला. या सरावामुळे आधुनिक युद्धाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली तयारी व क्षमता, याचे उच्च व्यावसायिक प्रदर्शन पूर्व विभागाने केले आहे, असेही ते म्हणाले.
विनय चाटी