डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती किती आहे? फोर्ब्स नियतकालिकाच्या सर्वेक्षणानुसार, रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार आणि अध्यक्षपदाचे प्रबळ उमेदवार असलेल्या ट्रम्प यांच्या संपत्तीत 2016 पासून 46 टक्के घसरण झाली आहे. त्यांची सध्याची संपत्ती सुमारे 2.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याने त्यांना फोर्ब्स 400च्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून वगळण्यात आले आहे. या यादीत स्थान मिळवण्यासाठी त्यांना 30 कोटी डॉलर्सची संपत्ती कमी पडली.
ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत न्यूयॉर्कमधील त्यांच्या स्थावर मालमत्तेपासून जगभरातील गोल्फ कोर्स आणि रिसॉर्ट्स यांचा समावेश होतो. मॅनहॅटनमधील एव्हेन्यू ऑफ द अमेरिकाज् या इमारतीतील 50 कोटी डॉलर्सचा हिस्सा हा त्यांच्या सर्वात मोठ्या मालमत्तांपैकी एक आहे. त्यांच्याकडे 60 कोटी डॉलर्सची तरल मालमत्ता (लिक्विड ॲसेट्स) देखील आहे, तर ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, त्यांच्या मालकीच्या मियामी गोल्फ रिसॉर्टची किंमत सुमारे 30 कोटी डॉलर्स आहे.
करोना साथीचा त्यांच्या कार्यालयीन इमारती भाड्याने देण्याच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यातच साथीनंतर रिमोट वर्क (घरून काम करणे) वाढल्यामुळे तर या व्यवसायमूल्यात 170 दशलक्ष डॉलर्सची तीव्र घसरण झाली आहे.
मुख्य प्रवाहातील सोशल मीडियाला एक नवा पर्याय म्हणून ओळख बनलेल्या ‘ट्रुथ सोशल’ मधील (सोशल मीडिया प्लॅटफॉर्म) त्यांची गुंतवणूक अपेक्षेपेक्षा कमी यशस्वी ठरली, परिणामी फोर्ब्सने त्यांच्या मूळ कंपनीचे मूल्य 2022 मध्ये 730 दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत कमी केले. मात्र यातील जमेची एक बाजू म्हणजे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप आणि याला वित्तपुरवठा करणारा भागीदार यांच्यातील विलीनीकरणाला नुकताच हिरवा कंदील मिळाला आहे, ज्यातून ट्रम्प यांना 4 अब्ज डॉलर्स किमतीचे 79 दशलक्ष समभाग मिळणार आहेत.
सध्या ट्रम्प यांना विविध गुन्ह्यांसाठी न्यायालयीन खटल्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या महिन्यात मॅनहॅटनच्या न्यायाधीशांनी त्यांना 35 कोटी डॉलर्सचा दंड भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात 83 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम अदा करण्याचे त्यांना आदेश देण्यात आले.
मात्र या सगळ्याच गौण बाबी ठरण्याची शक्यता आहे. 2020च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे निकाल बदलून टाकण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांच्यावर सुरू असणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यातून मुक्तता करण्याबाबतचा युक्तिवाद अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय 22 एप्रिल रोजी ऐकणार आहे. मात्र खटला चालवण्यापासून त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही, असा निर्णय डी. सी. सर्किटसाठी असलेल्या जिल्हा अपील न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे.
सूर्या गंगाधर
(अनुवाद : आराधना जोशी)