तैवानच्या कामगार मंत्र्यांनी मंगळवारी भारतीय त्वचेचा रंग, आहार आणि धर्म याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल माफी मागितली. यामागे आपला कोणताही भेदभाव करणारा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात, सू मिंग-चुन यांनी याहू न्यूजशी बोलताना वक्तव्य केले होते की, भारताच्या ईशान्येकडील भागातून स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची तैवान भरती करू शकतो कारण याही लोकांच्या त्वचेचा रंग आणि आमचा रंग सारखाच असून आहारातही साधर्म्य आहे. ईशान्य भागातील बहुतेक लोक ख्रिश्चन आहेत. शिवाय उत्पादन, शेती आणि बांधकाम यासारख्या क्षेत्रांमधील कामांसाठी ते खरोखर चांगले आहेत “.
तैवानची बहुतांश लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकणारी असल्याने यिथे दीर्घकालीन कामगारांची कमतरता भासत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय कामगारांना परवानगी देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये करण्यात आलेल्या करारासंदर्भातील प्रश्नाला त्या उत्तर देत होत्या.
या वक्तव्यावर तैवानमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी टीकेची झोड उठवली होती. यासंदर्भात सोमवारी तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून “या वक्तव्याबद्दल माफी” व्यक्त केली आणि स्पष्ट केले की “जे भारतीय कामगार भरतीसाठी असणाऱ्या अटींमध्ये बसणारे आहेत आणि उद्योगाची मागणी पूर्ण करणारे आहेत अशा सर्वांचे तैवानमध्ये स्वागत आहे. मग त्यांची वांशिक पार्श्वभूमी काहीही असो”.
तैवानच्या कामगार मंत्रालयानेही स्वतंत्रपणे स्पष्ट केले की सू यांनी “मुलाखतीत ‘समान त्वचेच्या रंगाचा’ उल्लेख केला त्यामागे कोणताही भेदभावयुक्त अर्थ नव्हता.” “तैवान भारताच्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध संस्कृतीचा आदर करतो आणि भविष्यात दोन्ही बाजूंकडील कामगार सहकार्याला चालना देण्यासाठी याचा आधारच होईल.”
या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशात, सू यांनी आपल्या वक्तव्यांमुळे झालेल्या गैरसमजाबद्दल माफी मागताना म्हटले की, उत्तर देताना शब्दांची निवड कदाचित जितकी अचूक असायला हवी होती तितकी ती नव्हती, मात्र त्यामागे कोणताही भेदभाव निर्माण करण्याचा हेतू नव्हता.
सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेला तैवानचा समाज 2025 पर्यंत “अतिवृद्ध” बनण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या 20 टक्क्यांहून अधिक वृद्ध जनता असेल,” असा अंदाज देशाच्या आर्थिक नियोजन संस्थेच्या अहवालाचा आधार घेऊन सीएनएनने व्यक्त आहे. 2028 पर्यंत कामकाजाच्या वयाची लोकसंख्या (15 ते 64 वयोगटातील) एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांशपेक्षा कमी असेल, असेही एजन्सीने नमूद केले आहे.
तैवानमधील “कारखाने, शेते आणि रुग्णालयांमध्ये काम करण्यासाठी सुमारे 1लाख भारतीयांना कामावर ठेवू शकते” असा दावा करणाऱ्या एका वृत्तामुळे नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन वादविवाद आणि काही वर्णद्वेषी टिप्पण्या सुरू झाल्या होत्या. त्या वेळी स्थलांतरित कामगारांच्या संख्येबाबतच्या वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि भेदभावपूर्ण वृत्तीमुळे तैवानच्या राजनैतिक स्थितीवर आणि राष्ट्रीय प्रतिमेवर विपरित परिणाम होऊ शकतो असा इशारा सू यांनी दिला होता. तैवानमध्ये सध्या अंदाजे 2000 भारतीयांचे वास्तव असावे.
रामानंद सेनगुप्ता