नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
दि. ०६ मार्च : ‘भूराजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर लष्कर, नौदल व हवाईदलातील समन्वय अतिशय महत्त्वाचा आहे. हिंदी महासागर क्षेत्रात सातत्याने नवी आव्हाने समोर येत आहेत त्याला तोंड देण्यासाठी तिन्ही सैन्य दलांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले. अरबी समुद्रात आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर सुरु असलेल्या नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (नेव्हल कमांडर्स कॉन्फरन्स) द्वैवार्षिक परिषदेत ते बोलत होते.
हिंदी महासागरात भारतीय नौदल अतिशय प्रबळ आहे. चाचेगिरी विरोधी कारवाई असो अथवा समुद्री तस्करी असो, विविध संकटकाळात नौदलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे सांगून भारतीय नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील भूमिकेची त्यांनी प्रसंसा केली. तसेच, भारताच्या सागरी सुरक्षा व सार्वोभौमत्त्वाच्या रक्षणात नौदलाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. आपल्या बहुआयामी क्षमतेच्या आधारे या क्षेत्रातील नेतृत्त्व नौदलाने सिद्ध केले आहे, अशा शब्दात त्यांनी नौदलाच्या कार्याची प्रसंसा केली. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहा, असे आव्हान नौदल अधिकाऱ्यांना करतानाच, सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
भारतीय नौदल भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात (इंडो-पॅसिफिक) विश्वासार्हतेचा पर्यायवाचक शब्द बनले आहे. हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिकमध्ये भारताचे वजन नौदलाच्या सतर्कतेमुळे, त्वरित प्रतिसाद देण्याच्या क्षमतेमुळे आणि नौसैनिकांच्या शौर्यामुळे वाढले आहे. जागतिक मंचावर भारताच्या स्थानाचे व वाढत्या महत्त्वाचे नौदल महत्त्वाचे कारण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या, अत्याधुनिक युद्धाशैलीत व नौदल कारवाईत ड्रोनच्या वाढत्या महत्त्वाबाबतही त्यांनी चर्चा केली.
वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांची ही तीन दिवसीय द्वैवार्षिक परिषद यावेळी ‘हायब्रीड’ स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. सैन्यदलप्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर.चौधरी, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार हे या परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, हिंदी महासागरातील चीनचा वाढता वावर, हौती बंडखोरांकडून लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर होत असणारे हल्ले व एडनच्या आखातात सुरू असणारी चाचेगिरी, या विषयावरही या परिषदेत चर्चा होणार आहे.
संरक्षणमंत्र्यांनी या वेळी आयएनएस विक्रांत व आयएनएस विक्रमादित्य या दोन विमानवाहू नौकांनी केलेल्या कवायतीचेही निरीक्षण केले.
(अनुवाद : विनय चाटी)