‘आयएनएस जटायू’ची मिनीकॉय बेटावर स्थापना होणार
दि. ०६ मार्च : लक्षद्वीप येथील मिनीकॉय बेटांवर उभारण्यात येणाऱ्या ‘आयएनएस जटायू’ या नौदलतळामुळे भारताच्या सुरक्षाविषयक पायाभूत सुविधांच्या निर्मितीला व नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. मालदीवमधील नव्याने सत्तेवर आलेल्या महंमद मोईझू यांच्या सरकारने भारतीय लष्कराच्या त्यांच्या देशातील उपस्थितीला आक्षेप घेतल्यानंतर भारताने लक्षद्वीप येथे लष्करीतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता.
नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांच्या उपस्थितीत या लष्करी दलाचे उद्घाटन होणार आहे. लक्षद्वीप येथील भारताचा हा दुसरा नौदलतळ आहे. येथील करावत्ती बेटांवर पूर्वीपासूनच ‘आयएनएस द्वीपरक्षक’ हा भारतीय नौदलाचा तळ कार्यरत आहे. ‘आयएनएस जटायू’ हा दुसरा नौदलतळ लक्षद्वीपच्या दक्षिणेला असलेल्या मिनीकॉय बेटांवर उभारण्यात येणार आहे. मिनीकॉय बेटे मालदीवपासून २५८ किमी.अंतरावर आहेत. मिनीकॉय बेटे सागरी संपर्क मार्गावर अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या सागरी क्षेत्रातील भारताची टेहळणी क्षमता अधिक वाढणार आहे. त्याचबरोबर हा तळ भारताला चाचेगिरी विरोधातील कारवाईसाठी व अमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
अरबी समुद्रात असलेल्या या सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या बेटांवर नौदल तळाची उभारणी केल्यामुळे या क्षेत्रात भारताला सामरिक आघाडी मिळणार आहे. त्याचबरोबर येथे दुहेरी वापरासाठी उपयुक्त धावपट्टी उभारण्यात येणार आहे. त्याचा खोल समुद्रातील टेहळणी व कारवाईसाठी उपयोग करता येणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारताच्या प्रभावात अधिक वाढ होणार आहे. मालदीवमधून सैन्य माघारीच्या काही दिवस आधीच या तळाचे काम सुरू होणार आहे. त्याचा मोठा लाभ भारताला होणार आहे. मालदीवमध्ये भारताचे सुमारे 89 लष्करी जवान व अधिकारी तैनात आहेत. भारतीय लष्कराला मालदीवमधून माघारी बोलवावे, अशी मागणी मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष महंमद मोईझू यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यामुळे या सागरी संपर्क मार्गावरील सामरिक खोली गमावण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ‘आयएनएस जटायू’च्या उभारणीमुळे हे नुकसान टाळता येणार आहे.
मिनीकॉय बेटांवर १९८० पासूनच नौदलाची एक तुकडी तैनात होती. मात्र, आता पूर्ण क्षमतेचा नौदल तळ उभारण्यात येत असल्यामुळे नौदलाच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. या सागरी क्षेत्रात घडणाऱ्या घटनांना प्रथम प्रतिसाद देणारे नौदल म्हणून भारतीय नौदलाचा दबदबा कायम होणार आहे. भविष्यात ‘आयएनएस जटायू’ची क्षमता वाढवून तेथे विमानवाहू नौका तैनात करण्यात येणार आहे. “आयएनएस जटायू’च्या उद्घाटनाला ‘आयएनएस विक्रमादित्य’ व ‘आयएनएस विक्रांत’ या भारताच्या दोन्ही विमानवाहू नौका उपस्थित राहणार आहेत.
विनय चाटी