पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील बैसाखी येथे १३ हजार फूट उंचीवर बांधलेल्या सेला टनेलचे उद्घाटन केले. इतक्या उंचीवर बांधलेला हा जगातील सर्वात लांब द्विपदरी टनेल आहे. चीन सीमेजवळ असलेल्या या टनेलची लांबी 1.5 किलोमीटर असून धोरणात्मकदृष्ट्या हा टनेल भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
या टनेलचा फायदा लष्कराबरोबरच सर्वसामान्यांनाही होणार आहे. हा टनेलमुळे चीनच्या सीमेजवळ असलेल्या तवांगपर्यंत सगळ्या ऋतूंमध्ये रोड कनेक्टिव्हिटी मिळेल. याआधी पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे, हा भाग अनेक महिने देशाच्या इतर भागांपासून तुटलेला असायचा. एलएसी जवळ असल्याने या टनेलमुळेमुळे खराब हवामानातही लष्कराच्या हालचाल अधिक चांगल्या आणि जलद होतील.
अरुणाचल प्रदेशातील सेला खिंडीजवळील हा टनेल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) बांधला आहे. टनेलच्या उभारणीमुळे चीन सीमेपर्यंतचे अंतर १० किलोमीटरने कमी झाले आहे. आसाममधील तेजपूर आणि अरुणाचलमधील तवांग यांना थेट जोडणाऱ्या हा टनेल आहे. दोन्ही ठिकाणी लष्कराची चार मुख्यालये असून त्यातील अंतरही एक तासाने कमी होणार आहे.
पाऊस, बर्फवृष्टी आणि भूस्खलनामुळे बालीपारा – हरिद्वार – तवांग रस्ता वर्षातले 8 ते 10 महिने बंद असायचा. टनेलच्या बांधकामामुळे आता थेट चीनच्या सीमेपर्यंत लष्कराला आपल्या हालचाली आणि इतर सामुग्रीचे दळणवळण करणे सहजशक्य होईल. 1962 मध्ये , याच प्रदेशातचिनी सैन्याचा भारतीय सैन्याबरोबर संघर्ष झाला होता. त्यावेळी तवांगवर चीनने कब्जा केला होता.
2019 मध्ये पंतप्रधानांनी या टनेलची पायाभरणी केली तेव्हा त्याची किंमत अंदाजे 697 कोटी रुपये होती. आता त्याची किंमत 825 कोटी रुपये आहे. हा बोगदा एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना आणि लहरी हवामानामुळे त्याचे बांधकाम लांबले.