पंतप्रधानांची उपस्थिती: स्वदेशी शस्त्रांची क्षमता जगाला दिसणार
दि. १० मार्च: राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात मंगळवारी, १२ मार्च रोजी ‘भारतशक्ती’ या तीनही दलाचा सहभाग असलेल्या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन करण्यात आले आहे. देशांतर्गत निर्मित ‘मेड इन इंडिया’ शस्त्रे व उपकरणांची ताकद या निमित्ताने जगाला दिसणार असून, ती पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथसिंह व सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या सरावादरम्यान प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात देशांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित शस्त्रे व इतर प्रणालीचीचा वापर लष्कर, हवाई दल व नौदलाकडून कश्या पद्धतीने करण्यात येतो, याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. या शस्त्रांची क्षमता व त्यांची रणक्षेत्रात हालचाल करण्याची क्षमता दर्शविणारी ही कवायत सुमारे ५० मिनिटांची असेल, त्यानंतर ती उपस्थितांना पाहण्यासाठी प्रदर्शित (स्टॅटिक डिस्प्ले) करण्यात येतील. ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेंतर्गत हे प्रदर्शन होणार आहे,’ असे ‘आर्मी डिझाईन ब्युरो’चे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल सी. एस. मान यांनी सांगितले. देशांतर्गत निर्मित या शस्त्रांची व प्रणालीची क्षमता कळण्यासाठी प्रत्यक्ष युद्धसदृश परिस्थितीत व समन्वयी पद्धतीने त्यांचा वापर झाला पाहिजे. तीनही सैन्यदलांकडून अशा पद्धतीने आयोजित सरावात स्वदेशी शस्त्रे, दारुगोळा, शस्त्रास्त्रप्रणाली, वाहने वापरली गेल्यास सैन्यदलांना त्यांच्याशी योग्यप्रकारे जुळवून घेता येईल,’ असेही जनरल मान यांनी सांगितले. व्यूहात्मक हालचाल आणि शस्त्रांच्या ताकदीच्या माध्यमातून शत्रूला धक्का देण्याचे तंत्र या वेळी दाखविण्यात येईल. त्यासाठी हवाई मार्गे मारा करणारी शस्त्रे, हेरगिरी व टेहेळणी उपकरण आदींचाही वापर करण्यात येईल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
‘भारतशक्ती’ या प्रदर्शनात देशांतर्गत निर्मित लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, पाणतीर, मानव विरहीत विमाने, मानव विरहीत विमानविरोधी यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रमानव, संपर्क यंत्रणा, शस्त्रे, दारुगोळा आदींचा समावेश असणार आहे. तेजस हे हलके लढाऊ विमान, हलके लढाऊ हेलिकॉप्टर एमके-४, हलके बहुपयोगी हेलिकॉप्टर, वजनाला अतिशय हलका असणारा पाणतीर, सामान वाहून नेणारी स्वयंचलित हवाई यंत्रणा, ड्रोन विरोधी यंत्रणा, ती-९० रणगाडे, क्षेपणास्त्रे, रडार आधीचा समावेश असणार आहे.
स्वदेशीकरणाच्या माध्यामतून सशक्तीकरण
आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दोन योजना देशाच्या संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाच्या योजना ठरल्या आहेत. त्यातही २०२० हे वर्ष यासाठी महत्त्वाचे ठरले. देशांतर्गत संशोधन व विकास, विशिष्ट तंत्रद्यानाचा वापर करून स्वदेशी शस्त्रनिर्मितीची विकसित क्षमता हे सर्व या आत्मनिर्भर योजनेचे फलित आहे. त्यामुळे या प्रदर्शनाचे घोषवाक्य ‘स्वदेशीकरणाच्या माध्यामतून सशक्तीकरण’ असे ठेवण्यात आल्याचे मेजर जनरल मान यांनी सांगितले.
रविशंकर