रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्लादिमीर पुतीन यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले आणि मित्र असलेल्या रशियन लोकांच्या शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.
रशियात झालेल्या एकतर्फी निवडणुकीत पुतीन पाचव्यांदा निवडून आले आहेत. पाश्चिमात्य देश या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना मोदी यांनी पुतीन यांच्यासोबत असणाऱ्या आपल्या घनिष्ठ संबंधांना उजाळा दिला.
येत्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी ठोस प्रयत्न व्हावेत यासाठी दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून दिसून आले असे मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर म्हटले आहे.
याशिवाय उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्यांवरील प्रगतीचा आढावा घेतला. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाणही या चर्चेत झाली.
यादरम्यान युद्धावर मुत्सद्देगिरी आणि चर्चा यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन मोदी यांनी पुतीन यांना केले. तर आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पुतीन यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा झाल्यानंतर आपण युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचे पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावर जाहीर केले.
यावेळी विविध क्षेत्रात, भारत-युक्रेन यांच्यातील भागीदारी अधिक दृढ कशी केली जाऊ शकते यावर उभय देशांच्या नेत्यांनी चर्चा केली. रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असणाऱ्या संघर्षावर चर्चा करतांना, पंतप्रधानांनी भारताच्या लोककेंद्री धोरणाचा पुनरुच्चार केला आणि या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा वापर करण्याचा सल्ला झेलेन्स्की यांना दिला. युद्धावर लवकरात लवकर शांततामय तोडगा काढण्यासाठी भारताला जे जे करणे शक्य असेल ते सगळे आम्ही करत राहू असेही पंतप्रधान पुढे म्हणाले. युक्रेन करत असलेल्या प्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला गेल्याच महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली.
युक्रेनच्या नागरिकांना भारताकडून सातत्याने मिळत असलेल्या मानवतावादी सहाय्याबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताची प्रशंसा केली.