इस्लामिक स्टेट गटाने मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे . या गटाने टेलिग्राम मेसेजिंग ॲपवरील निवेदनात म्हटले आहे की, आयएसच्या लढाऊ सैनिकांनी “रशियाची राजधानी मॉस्कोच्या सीमावर्ती भागात मोठ्या समुदायावर हल्ला केला…”
आयएसच्या निवेदनात म्हटले आहे की हल्लेखोर “सुरक्षितपणे त्यांच्या तळांवर परतले आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे मॉस्कोवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे –
“मॉस्कोतील भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे विचार आणि प्रार्थना पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या दुःखाच्या क्षणी भारत रशियन फेडरेशनचे सरकार आणि लोकांसोबत एकजुटीने उभा आहे.”
दरम्यान, हल्लेखोरांनी शुक्रवारी मॉस्कोतील एका मोठ्या कॉन्सर्ट हॉलमध्ये स्फोट घडवून आणला आणि तिथे असणाऱ्या गर्दीवर गोळीबार केला. यामध्ये 60हून अधिक लोक ठार झाले तर 100 हून अधिक जखमी झाले. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन परत एकदा सत्तेवर आल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये हा निर्घृण हल्ला करण्यात आला.
कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीत छप्पर कोसळले असून साधारणपणे 40 टक्के हॉल आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. हा हल्ला गेल्या काही वर्षांमधील रशियातील सर्वात प्राणघातक हल्ला असून युक्रेनबरोबरच्या युद्धाला आता दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हल्ला झाला. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी या हल्ल्याला ‘मोठी शोकांतिका’ म्हटले आहे.
हल्लेखोरांनी मॉस्कोच्या पश्चिमेच्या सीमावर्ती भागात 6,200 लोकांना सामावून घेऊ शकणाऱ्या एका मोठ्या कॉन्सर्ट सुरू असलेल्या क्रोकस सिटी हॉलमध्ये स्फोट केल्यानंतर काही मिनिटांतच पुतीन यांना कळवण्यात आल्याचे क्रेमलिनने स्पष्ट केले.
रशियन रॉक बँड ‘पिकनिक’च्या कार्यक्रमाला गर्दी जमलेली असताना हा हल्ला झाला. तपास समितीने शनिवारी पहाटे 60 हून अधिक लोक मारले गेल्याची माहिती दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी 145 जखमींची यादी जाहीर केली – त्यापैकी पाच मुलांसह 115 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रशियन माध्यमे आणि टेलिग्राम वाहिन्यांवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये गोळींच्या अनेक फैरी झाडल्याचे ऐकू येत आहे. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये हातात रायफल घेऊन हॉलमधून फिरणारे दोन हल्लेखोर दिसत आहेत तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये सतत सुरू असणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांनी हॉलला आग लावल्याचे तिथे उपस्थित असलेला एकजण सांगत आहे. आणखी काही व्हिडिओंमध्ये असॉल्ट रायफल्ससह टोप्या घातलेले चार हल्लेखोर दिसले , जे आरडाओरड करणाऱ्या लोकांवर पॉइंट – ब्लँक रेंजने गोळीबार करत होते.
कॉन्सर्ट हॉलमधील सुरक्षा रक्षकांकडे बंदुका नव्हत्या आणि हल्ल्याच्या सुरुवातीला त्यांच्यावरच गोळीबार करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे रशियन माध्यमांनी सांगितले. काही रशियन वृत्तवाहिन्यांच्या मते, विशेष दल आणि दंगल हाताळणारी पोलिस पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर पळून गेले. हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या वाहनांचा पोलीस गस्त पथक शोध घेत असल्याचे वृत्त आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(एपी यांच्या इनपुट्सह)