भारतीय नौदलाने 29 मार्चच्या पहाटे सागरी पायरसीविरोधी मोहिमेत “तीव्र दंडात्मक सामरिक उपाययोजनांचा” वापर करून, एडनच्या आखातात सशस्त्र दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या इराणी मासेमारी जहाजाची, त्यावरील 23 पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची यशस्वीरित्या सुटका केली.
“SOPs (Standard Operating Procedure) नुसार 12 तासांहून अधिक काळ तीव्र सामरिक उपायांनंतर, अपहरण केलेल्या मासेमारी जहाजावरील चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले गेले. 23 पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या क्रूची सुखरूप सुटका करण्यात आली आहे,” असे भारतीय नौदलाने सांगितले. या कामगिरीमध्ये विशेष नौदल पथकांचा समावेश होता. सामान्य मासेमारी पुन्हा सुरू करण्यासाठी जहाजाला सुरक्षित ठिकाणी नेण्यापूर्वी जहाजाची समुद्रसक्षमता आणि सुरक्षितता निश्चित करण्यासाठी कसून तपासणी केली जाते.
नऊ सशस्त्र समुद्री चाच्यांनी ‘अल कंबर’ नावाच्या मासेमारी जहाजाचे अपहरण केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी उशिरा बचाव कार्याला सुरुवात झाली. केवळ एका दिवसाच्या कालावधीत या अपहृत जहाजाला रोखण्यासाठी नौदलाने त्वरेने आपली तयारी केली.
28 मार्च रोजी उशिरा इराणी मासेमारी जहाज ‘अल कमर 786’ चे अपहरण झाल्याच्या माहितीच्या आधारे, दोन भारतीय नौदल जहाजे – जी सागरी सुरक्षाविषयक कामगिरीसाठी अरबी समुद्रात तैनात करण्यात आली होती – अपहरण केलेल्या मासेमारी जहाजाला रोखण्यासाठी वळवण्यात आली. घटनेच्या वेळी, हे मासेमारी जहाज एडनच्या आखाताजवळ वायव्य हिंद महासागरात सोकोट्राच्या अंदाजे 90 नॉटिकल माईल्स नैऋत्येला होते आणि नऊ सशस्त्र समुद्री चाच्यांनी त्याचे अपहरण केल्याची माहिती मिळाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
“आयएनएस सुमेधाने 29 मार्चच्या पहाटे मासेमारी जहाज अल-कंबरला रोखले आणि त्यानंतर गायडेड मिसाईल फ्रिगेट आयएनएस त्रिशूल त्यासोबत सामील झाले,” असे निवेदनात पुढे म्हटले आहे. या प्रदेशातील सागरी सुरक्षा आणि “राष्ट्रीयतेची पर्वा न करता” नाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
रवी शंकर