पासष्ट वर्षांपूर्वीचा मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा तिबेटी लोकांच्या मनात विशेष घर करून बसला आहे. 31 मार्च 1959 रोजी, आताचे परमपूज्य 14 वे दलाई लामा, तेनझिन ग्याट्सो यांनी आश्रय घेण्यासाठी भारतात प्रवेश केला. त्यावेळी चिनी सैन्याने तिबेटमध्ये प्रवेश करून त्यावर ताबा मिळवला होता.त्यामुळे तिबेटी प्रशासनासाठी हा अत्यंत आव्हानात्मक महिना होता. दलाई लामा तेव्हा केवळ 23 वर्षांचे होते आणि पीएलएचे सैन्य त्यांना कधीही अटक करू शकते अशी भीती तेव्हा व्यक्त केली जात होती.
17 मार्च 1959 रोजी दलाई लामा, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे काही सहकारी ल्हासा येथील पोटला राजवाड्यातून बाहेर पडले. दक्षिणेकडे मॅकमोहन रेषेच्या (जी तिबेटला भारतापासून वेगळे करते) दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आणि त्यांच्या प्रवासाचे अंतिम ठिकाण भारत, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी किंवा नेफा (जी आता अरुणाचल प्रदेश आहे) होते.
दलाई लामा यांनी सामान्य चिनी सैनिकाचा पोशाख परिधान करून आपली ओळख लपविली होती. दुर्गम भूप्रदेश आणि डोंगराळ खिंडीतून सुमारे पंधरा दिवस हा प्रवास सुरू होता. चिनी सैनिक आपल्या मागावर आहेत की नाही याकडेही त्यांना लक्ष ठेवावे लागत होते.
प्रसिद्ध तिबेटीशास्त्रज्ञ आणि लेखक क्लॉड अर्पी यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये त्यानंतर नेमके काय घडले याचे स्पष्ट वर्णन केले आहे.
26 मार्च रोजी हा सगळा ताफा नेफाच्या उत्तरेकडील लुंत्से झोंग येथे पोहोचला, जिथून दलाई लामा यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना संदेश पाठवला. “तिबेट लाल चीनच्या नियंत्रणाखाली गेले आणि 1951 मध्ये तिबेटी सरकारने आपले अधिकार गमावले तेव्हापासून मी, माझे सरकारी अधिकारी आणि नागरिक तिबेटमध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु चीन सरकार हळूहळू तिबेटी सरकारला वश करत आहे. या गंभीर परिस्थितीत आम्ही त्सोना (तिबेटमधील मॅकमोहन रेषेच्या उत्तरेकडील शेवटचे शहर) मार्गे भारतात प्रवेश करत आहोत. मला आशा आहे की तुम्ही कृपया भारतीय प्रदेशात आमच्यासाठी आवश्यक व्यवस्था कराल.”
दुसऱ्याच दिवशी तवांगचे सहाय्यक राजकीय अधिकारी टी. एस. मूर्ती यांना सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. ते 31 मार्च रोजी तेथे पोहोचले. त्याच दिवशी दलाई लामा आणि त्यांच्या चमूने तवांगच्या उत्तरेस असलेल्या कामेंग सेक्टरमधील खेनझीमाने येथे सीमारेषा ओलांडली. काही किलोमीटर अंतरावर चुथांगमू येथून, 5 आसाम रायफल्सच्या एका तुकडीने या चमूला वांगमधील प्रसिद्ध बौद्ध मठापर्यंत नेले.
दलाई लामा यांच्या संदेशाला दिलेल्या उत्तरात नेहरू म्हणाले: “माझे सहकारी आणि मी तुमचे स्वागत करतो आणि भारतात तुमचे सुरक्षित आगमन झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही, तुमचे कुटुंबीय आणि सहकारी यांना भारतात राहण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आम्हाला आनंदच होईल. भारतातील लोक जे तुम्हाला अत्यंत आदराने मानतात ते निःसंशयपणे तुमच्याबद्दलचा त्यांचा पारंपरिक आदर व्यक्त करतील.”
ते भारतात आणि जगासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व राहिले आहेत. जानेवारी 2020 मध्ये पहिल्यांदा स्ट्रॅटन्यूज ग्लोबलवरून प्रसारित झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी स्वतःला भारत सरकारचे सर्वात प्रदीर्घ अतिथी म्हणून संबोधले आणि विविध विषयांवर भाष्य केले. त्यातील बहुतांश भाष्य चीनच्या पचनी पडणारे नाही.
नितीन अ. गोखले