परस्पर नौदल सहकार्य, प्रशिक्षणाबाबत चर्चा
दि. ०२ एप्रिल: परस्पर नौदल सहकार्य, प्रशिक्षण आणि परस्पर माहितीची देवाणघेवाण करण्याच्या संभावनेबाबत चर्चा करण्यासाठी थायलंडच्या ‘रॉयल थाई नेव्ही’चे प्रमुख ॲडमिरल अडूंग पान-इआम यांनी मंगळवारी भारताचे संरक्षणदल प्रमुख जनरल अनिल चौहान यांची साउथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. ॲडमिरल अडूंग पान-इआम हे तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून काळ, सोमवारी त्यांनी नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्याशी चर्चा केली होती.
ॲडमिरल अडूंग पान-इआम यांचे एक एप्रिल रोजी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आगमन झाले. त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन वीर जवान व अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांना साउथ ब्लॉक येथे नौदलाच्या पथकाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्याशी द्विपक्षीय संबंध, थायलंड व भारतीय नौदलातील परस्पर सहकार्य, थाई नौदलासाठीचे प्रशिक्षण, माहितीची देवाणघेवाण आदी बाबींविषयी चर्चा केली. मंगळवारी संरक्षणदल प्रमुखांशी झालेल्या चर्चेनंतर ॲडमिरल अडूंग पान-इआम भारताचे हवाईदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्यासह संरक्षण सचिव गिरीधर अरमाने व राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयकाचीही भेट घेणार आहेत.
उभय देशातील सहकार्य अधिक पुढच्या टप्प्यावर नेण्याच्या उद्देशाने भारतातील संरक्षण उत्पादन क्षेत्रांतील कंपन्यांचे अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील संरक्षण उत्पादन विभागातील अधिकारी व या क्षेत्रातील इतर मान्यवरांची ॲडमिरल अडूंग पान-इआम दिल्लीत भेट घेणार आहेत. नौदल अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ॲडमिरल अडूंग पान-इआम नौदलाच्या जहाजबांधणी व आरेखन विभागाला भेट देऊन जहाजबांधणी व आरेखानातील नवकल्पना समजून घेणार आहेत.
उभय देशांदरम्यान गेल्या काही वर्षांपासून द्विपक्षीय सहकार्य वाढीस लागले असून दोन्ही देश द्वैवार्षिक सागरी टेहेळणी मोहिमाही राबवीत असतात. त्याचबरोबर आयुथ्या या नावाने दोन्ही देशांमध्ये नौदल सरावाचेही आयोजन करण्यात येते. थाई नौदलाच्या एका जहाजाने मिलन-२०२४ या बहुपक्षीय नौदल सरावातही सहभाग नोंदविला होता.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी