गाझाच्या रफाहमध्ये संभाव्य इस्रायली हल्ल्याबाबत अमेरिका आणि इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी काल दोन तास आभासी (virtual) चर्चा केली. बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेला वाटत असणारी चिंता आम्ही विचारात घेऊ असे आश्वासन इस्रायलने दिले असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे.
रफाहमध्ये हमासचा पराभव करणे या एकमेव उद्देशाशी दोन्ही देश सहमत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अमेरिका-इस्रायलकडून जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार दोन तास चाललेली ही बैठक “रचनात्मक” होती.
“अमेरिकेने रफाहमध्ये सुरू असणाऱ्या विविध कारवायांबाबत आपली चिंता व्यक्त केली. इस्रायलने त्या विचारात घेण्यावर सहमती दर्शविली असल्याचे,” निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यापूर्वी इस्रायलला गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांची होणारी जीवितहानी टाळण्यासाठी रफाहमध्ये जमिनीवर कारवाई करू नका असे सांगितले होते. गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 32हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत, ज्यात बहुतांश मुले आणि महिला यांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की अमेरिकेला वाटणारी चिंता इस्रायला कळवत आली आहे.
“जर त्यांना लष्करी कारवाईसाठी पुढे जायचे असेल तर आम्हाला हे संभाषण करावे लागेल. ते कसे पुढे जाणार आहेत (त्यांच्या पुढील योजना काय आहेत) हे आपल्याला समजून घ्यावे लागेल “, जीन-पियरे म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गाझा युद्धबंदी ठरावावरील मतदानापासून अमेरिका दूर राहिल्यामुळे गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द केला.
दोन आठवडे उत्तर गाझामधील अल-शिफा रुग्णालयाला वेढा घातल्यानंतर इस्रायली सैन्याने तिथून आपले सैन्य मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच ही बैठक पार पडली. गाझाच्या नागरी संरक्षण विभागाने सांगितले की, अल-शिफा रुग्णालयात आतापर्यंत 300 मृतदेह सापडले आहेत.
दरम्यान, इजिप्त, कतार आणि अमेरिकेकडून वाटाघाटी करणारे सहा आठवड्यांच्या युद्धबंदीसाठी दबाव आणत आहेत. इस्रायली सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याची आणि विस्थापित पॅलेस्टिनींना उत्तर गाझामध्ये परत पाठवण्याची हमासची मागणी हा चर्चेतील अद्याप तोडगा न निघालेल्या मुद्द्यांपैकी एक आहे.
पिनाकी चक्रवर्ती