“मला किंवा माझ्या पत्नीला काही झाले तर ते त्यासाठी कोण जबाबदार असेल हे कळू द्या,”
रावळपिंडीतील अदियाला येथील तुरुंगातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकारांशी बोलताना लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याकडे बोट दाखवले.
“लष्करप्रमुख हे निवडणुकीद्वारे त्या पदावर बसलेले नाहीत. मला जनरल मुनीर यांना एवढेच सांगायचे आहे की, माणूस एक योजना बनवतो आणि एक योजना अल्लाहने तयार केलेली असते. शेवटी केवळ अल्लाहच्या योजनांचाच विजय होतो,” अशा शब्दांमध्ये पदच्युत केलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्टमध्ये इशारा दिला आहे.
50 वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन मुख्य मार्शल लॉ प्रशासक जनरल याह्या खान यांनी शेख मुजीबुर रहमान यांनी पूर्व पाकिस्तानात (नंतर बांगलादेश) जिंकलेल्या निवडणुकीचा जनादेश जसा डावलला होता, त्याच पद्धतीने आता झालेल्या निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळालेला जनादेश चोरला गेला, याचा इम्रान खान यांनी पुनरुच्चार केला.
“आता राजा (मुनीर) गुप्तपणे राज्यकारभार हाताळत आहे तर मोहसिन नक्वी (अंतर्गत मंत्री) व्हाईसरॉय म्हणून काम करत आहे. शहबाज शरीफ यांची कशावरही कोणतीही सत्ता नाही. आर्थिक आपत्ती जवळ येत आहे.”
परंतु माजी पंतप्रधानांनी हे देखील मान्य केले की त्यांच्या पक्षाचे काही नेते अजूनही सरकारच्या संपर्कात असून आपण संवाद साधण्यासाठी नेहमीच तयार आहोत.
‘डॉन’ वृत्तपत्राने इम्रान खान यांचे वक्तव्य उद्धृत केले आहे की, जर इम्रान खान माजी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा – जे एप्रिल 2022 मध्ये त्यांच्या अध:पतनासाठी जबाबदार होते – यांच्याशी बोलू शकले, तर ते कोणाशीही संवाद साधू शकतात, कारण देश सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे.
जनरल मुनीर यांनीच “मला कमीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात मला आणि माझ्या पत्नीला, तोशा खान प्रकरणात अडकवले आहे. जनरल मुनीर यांच्याच हातात देशाच्या सत्तेची सूत्रे एकवटली आहेत, याची संपूर्ण देशाला जाणीव असल्याचे, इम्रान खान यांनी म्हटले आहे.
‘लंडन प्लॅन’ म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला पंतप्रधानपदावरून हटवण्याचा कट होता ज्यात लष्करप्रमुख आणि पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांचा समावेश होता. यांचाच भाऊ आता पंतप्रधान आहे. त्यात आयएसआय पुरस्कृत न्यायाधीशांचाही समावेश होता.
सध्याच्या परिस्थितीत न्याययंत्रणा अजिबात स्वतंत्र नाही, असे ते म्हणाले.
गेल्या महिन्यात न्यायालयाच्या आवारात आपल्या हत्येचा कट रचला गेला होता, जो पार पाडण्यासाठी साध्या वेशातल्या लोकांचा सहभाग होता असा दावा त्यांनी केला आहे. त्या दिवसाचे त्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सूर्या गंगाधरन