‘स्पीअर कोअर’ला भेट: लष्करी सज्जतेची केली पाहणी
दि. १२ एप्रिल: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रंगापहाड येथील लष्करी तळाला भेट देऊन स्पीअर कोअर’च्या लष्करी सज्जतेची पाहणी केली. या वेळी लष्करप्रमुखांनी येथील जवान व अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक कौशल्याची आणि त्यांच्या प्रखर मनोबलाचीही प्रशंसा केली, असे लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या (एडीजी-पीआय) ‘एक्स अकाऊंट’वर म्हटले आहे.
ईशान्य भारताच्या लष्करी सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी ‘स्पीअर कोअर’कडे आहे. त्यामुळे लष्करप्रमुखांनी या भेटीत या तळावरील लष्करी सज्जता व इतर बाबींची अतिशय बारकाईने पाहणी केली. या भागात लष्करी मोहीम राबविताना अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीमुळे येणाऱ्या आव्हानांचीही त्यांनी या भेटीत माहिती घेतली. तसेच, येथे तैनात असलेल्या जवान व अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, असे ‘एडीजी-पीआय’ने म्हटले आहे.
‘स्पीअर कोअर’मधील सैनिक ईशान्य भारतातील अतिशय लहरी हवामान आणि खडतर भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागात तैनात आहेत. तरीही त्यांची देशाच्या संरक्षणाबाबतची वचनबद्धता कायम आहे. त्यांच्या प्रखर मनोबालामुळे या भागाचे संरक्षण होऊ शकते. लष्करप्रमुखांशी झालेल्या चर्चेमुळे या सैनिकांना देशाच्या सीमा व सार्वोभौमत्त्वाच्या रक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
विनय चाटी