
इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढत असून इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्र हल्ला चढवला आहे. इराणमधून १०० हून अधिक ड्रोन सोडण्यात आले, असं इस्रायलच्या सैन्यांनी सांगितलं असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. यावेळी स्थानिकांना सायरन आणि मोठमोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. इस्रायच्या लढाऊ विमानांनी दमासस येथील इराणच्या दूतावासावर केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर दोन आठवड्यांनी इराणने हा हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात 7 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनिअल हगरी यांनी सांगितलं की, इराणने इस्रायलवर जमिनीवरून मारा करणारे डझनभर क्षेपणास्रे डागली होती. त्यापैकी बहुतांश क्षेपणास्रे सीमेबाहेरच रोखण्यात आली. यामध्ये १० हून अधिक क्रुझ क्षेपणास्रांचा समावेश आहे.
इराणी सॅल्व्होने आतापर्यंत २०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली आहेत. तसंच, इस्रायली लष्करी सुविधेचेही नुकसान झाले आहे, असंही हगरी म्हणाले.
काही क्षेपणास्त्रांमुळे इस्राइलच्या लष्करी तळांचेही नुकसान झाले आहे. इस्रायली लष्कर IDF च्या प्रवक्त्याने सांगितले की, इराणच्या हल्ल्यात दक्षिण इस्राइलमधील लष्करी तळाचे किरकोळ नुकसान झाले आहे. इस्रायली सैन्याने नंतर सांगितले की ते आपल्या रहिवाशांना आश्रय घेण्यास तयार रहा असा सल्ला देणार नाहीत.इस्रायलच्या चॅनल 12 टीव्हीने एका अज्ञात इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की या हल्ल्याला “जशास तसे प्रत्युत्तर” दिले जाईल.
काही दिवसांपूर्वीच, म्हणजे एक एप्रिल 2024 रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर झालेला हल्ला इस्रायलनं केला होता, असा दावा इराणनं केला. सीरियातील दूतावासावरील हल्ल्याचे परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असा इशाराही इराणने दिला होता. त्यामुळे इराण इस्रायलवर अशा प्रकारचा हल्ला करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. इस्रायलने मात्र या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही की त्याची जबाबदारीही स्वीकारली नाही.
इराणने आता सांगितलं आहे की, आम्ही आणखी हल्ले करणार नाही, पण इस्रायलने प्रत्युत्तरादाखल काही कारवाई केली किंवा अमेरिकेने हस्तक्षेप केला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, “या हल्ल्यामुळे हा प्रादेशिक संघर्ष अधिक विध्वंसक आणि मोठा होण्याची भीती आहे.”
इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद रविवारी तातडीची बैठक घेणार आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराणी सशस्त्र दलाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची मागणी इस्रायलने सुरक्षा परिषदेकडे केली आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी शनिवारी संपर्क केला. दोघांमध्ये फोनवरून चर्चा सुरू झाली. इराणच्या हल्ल्यावर व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन रविवारी ‘जी-7’ राष्ट्रांची एक बैठक घेणार आहेत. इराणच्या हल्ल्याला संयुक्तपणे प्रत्युत्तर देण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे.
बायडेन यांनी शुक्रवारीच इराणला हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता. आठवड्याच्या शेवटी आपल्या मूळ राज्याचा म्हणजे डेलावेरचा दौरा त्यांनी रद्द केला आणि व्हाईट हाऊस सिच्युएशन रूममध्ये संरक्षण तसेच राज्य सचिवांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना भेटण्यासाठी ते तातडीने वॉशिंग्टनला परतले. त्यांनी इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचे वचन दिले आहे.
“इराण आणि त्याच्या मित्र देशांकडून येणाऱ्या धमक्यांविरुद्ध इस्रायलच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत”, असे बायडेन यांनी बैठकीनंतर एक्सवर सांगितले.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या सात महिन्यांपासून सुरू असणाऱ्या युद्धामुळे गाझा प्रदेशात तणाव वाढवला आहे. याचा परिणाम लेबनॉन आणि सीरियाबरोबरच्या सीमा भागांवरही पसरला असून आता येमेन आणि इराकसारखे दूरचे देशही यात भरडले जात आहेत.
ब्रिटीश सागरी सुरक्षा कंपनी एम्ब्रेने एका निवेदनात म्हटले आहे की येमेनमधील इराणी समर्थक हौतींनीही इस्रायलच्या दिशेने ड्रोन सोडल्याचे वृत्त आहे.
या सगळ्या छुप्या संघर्षांचे आता खुल्या संघर्षात रुपांतर होण्याचा धोका आहे. यात इराण आणि त्याचे प्रादेशिक सहकारी इस्रायल आणि त्याचा मुख्य समर्थक असलेल्या अमेरिकेविरुद्ध उभे राहतील. या प्रदेशातील तुल्यबळ असणाऱ्या इजिप्तने “पराकोटीचा संयम” राखण्याचे आवाहन केले आहे.
इराक-सीरिया सीमेवर इस्रायलला जाणारी काही ड्रोन पाडण्यात अमेरिका आणि ब्रिटिश लढाऊ विमानांचा सहभाग होता, असे वृत्त चॅनल 12 ने दिले आहे. दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इस्रायलकडे जाणारी डझनभर ड्रोन्स पाडली आहेत.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने त्यांच्या युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायल, लेबनॉन आणि इराकने आपापली हवाई क्षेत्रे बंद केली असून, सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण दलाल सतर्क केलं आहे.
जॉर्डनच्या अनेक शहरांतील रहिवाशांनी सांगितले की त्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हवाई हालचाली ऐकल्या.
युरोपियन युनियन, ब्रिटन, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, फ्रान्स, मेक्सिको, नेदरलँड्स आणि नॉर्वे यांनी इराणच्या हल्ल्याचा निषेध केला.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर टीका करत पेनसिल्व्हेनियातील एका सभेत झालेल्या हवाई हल्ल्यांचा थोडक्यात उल्लेख केला.
“त्यांच्यावर सध्या हल्ले होत आहेत”, असे ट्रम्प म्हणाले. “ते घेण्यामागे असणारे कारण आपण दाखवत असलेला कमकुवतपणा. खरेतर हे घडायला नको. आम्ही जो कमकुवतपणा दाखवला आहे तो अविश्वसनीय आहे आणि मी पदावर असतो तर असे घडले नसते.”
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड कॉर्प्स (IRGC) ने सांगितलं आहे की, “दमास्कसमधील इराणी दूतावासाच्या हल्ल्यासह झिओनिस्ट राजवटी (इस्रायल) ने वारंवार केलेल्या गुन्ह्यांचा बदला म्हणून हा हल्ला केला आहे.” या हल्ल्यात दोन लष्करी अधिकाऱ्यांसह ‘रिव्हॉल्यूशनरी गाडर्स्’चे सात कर्मचारी मारले गेले होते. या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनीही दिली होती.
इराणचा या प्रदेशातील मुख्य सहयोगी, लेबनीज शिया गट हिजबुल्लाह यानेही रविवारी पहाटे इस्रायली तळावर रॉकेट डागल्याचे सांगितले.
सुव्रत नंदा
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)