जगातील सर्वात मोठ्या चीप उत्पादक असलेल्या तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या मुख्य पुरवठादार असलेल्या कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी लवकरच तैवानचे नवे अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या चो जंग-ताई यांनी जाहीर केले की जे. डब्ल्यू. कुओ, जे सध्या टोपको सायन्टिफिकचे अध्यक्ष आहेत ते 20 मेपासून नवीन भूमिका स्वीकारतील.
तैवानच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या सेमीकंडक्टर उद्योगाला कुओ यांच्या सखोल संबंधांचा आणि व्यापक आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
तैवानच्या आर्थिक विकासाचे, परकीय गुंतवणुकीच्या मंजुरीचे आणि ऊर्जा पुरवठ्याचे पर्यवेक्षक म्हणून, अर्थव्यवस्था मंत्रालय विशेषतः राज्य-संचालित उपयोगिता, टायपॉवरच्या भागीदारीत वीज निर्मितीचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अलिकडच्या वर्षांत मोठ्या प्रमाणात वारंवार वीज खंडित झाल्यामुळे अत्यावश्यक सेमीकंडक्टर क्षेत्रासह औद्योगिक उपक्रम विस्कळीत झाले आहेत. त्यामुळे स्थिर आणि विश्वासार्ह वीज पुरवठ्याचे महत्त्व परत एकदा अधोरेखित झाले आहे.
चो यांनी ऊर्जा समस्यांचे व्यवस्थापन करण्याच्या कुओच्या कौशल्यावर जास्त भर दिला आहे. सेमीकंडक्टर आणि ऊर्जा क्षेत्रातील त्यांचा अनुभव तैवानच्या वीज स्थिरतेबरोबरच इतर आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे यावेळी चो यांनी नमूद केले. “विविध हरित ऊर्जा स्त्रोतांच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योगात व्यापक ऊर्जा संवर्धनास प्रोत्साहन देण्यासाठी कुओ यांच्या कौशल्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे”, असे चो यांनी घोषणेदरम्यान स्पष्ट केले.
वीजपुरवठा सुरळीत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच, पवन ऊर्जेसारख्या अक्षय उर्जेमध्ये तैवान आपली गुंतवणूक वाढवत आहे तसेच द्रवरूप नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी त्याच्या पायाभूत सुविधांमध्येही वाढ करत आहे.
अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या धोरणात्मक योजनांचा तपशील देण्याचा विचार असल्याचे कुओ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, टोपकोने कुओ यांच्या नियुक्तीबाबत तसेच ते कंपनीतील सध्याच्या पदाचा राजीनामा देणार की नाही याबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
आकांक्षा एस
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)