संरक्षणसचिव गिरीधर अरमाने करणार नेतृत्त्व
दि. २५ एप्रिल: ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’च्या (एससीओ) संरक्षणमंत्रांच्या वार्षिक बैठकीसाठी जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्त्व संरक्षण सचिव गिरिधर अरमाने करणार आहेत. कझाकस्तानची राजधानी अस्ताना येथे आजपासून ही बैठक सुरु होणार असून, ‘एससीओ’ अंतर्गत असणाऱ्या विविध सुरक्षा विषयक बाबींचा आढावा व संरक्षण सहकार्यासारख्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
‘एससीओ’च्या या वार्षिक बैठकीसाठी जाणाऱ्या भारतीय चमूचे नेतृत्त्व संरक्षण सचिव करणार आहेत. या बैठकीत ते भारताची भूमिका मांडणार आहेत, तसेच ‘एससीओ’मधील मित्रदेशांच्या संरक्षणमंत्र्यांशी द्विपक्षीय सुरक्षा विषयक सहकार्याबाबत चर्चाही करणार आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ ही एक बहुपक्षीय आंतरसरकारी संस्था असून चीनमधील शांघाय येथे १५ जून २००१मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. चीन, कझाकस्तान, रशिया, किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांनी एकत्र येऊन राजकीय, आर्थिक, औद्योगिक, शिक्षण आदी क्षेत्रातील सहकार्यासाठी या संघटनेची स्थापना केली होती. वर उल्लेखित संस्थापक सदस्यांसह भारत, इराण आणि पाकिस्तान असे नऊ देश या संघटनेचे सदस्य आहेत.
विनय चाटी