ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी मंगळवारी भारताचे 26 वे नौदल प्रमुख (सीएनएस) म्हणून पदभार स्वीकारला. 41 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेल्या ॲडमिरल आर. हरी कुमार यांच्याकडून भारतीय नौदलाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्रिपाठी यांनी स्वीकारली.
दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतज्ज्ञ असलेले ॲडमिरल त्रिपाठी 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलात रुजू झाले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी विविध शैक्षणिक, परिचालन आणि प्रशासकीय विभागांमध्ये काम केले.सर्वोच्च पदावर विराजमान होताना अनुभवाचा मोठा खजिना त्यांच्याकडे असणार आहे. नौदल प्रमुख म्हणून निवड होण्याआधी, ॲडमिरल त्रिपाठी काही काळ नौदलाचे उपप्रमुख (व्हीसीएनएस) होते. नौदल उपप्रमुख बनण्याआधी ते वेस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.
मध्य प्रदेशातील सैनिक स्कूल रेवाचे माजी विद्यार्थी असलेले ॲड. त्रिपाठी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील महूदार या छोट्या खेड्यातून आले आहेत. सैनिक शाळेतून एनडीएला प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी नौदल सेवेची निवड केली आणि 1985 पासून त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. एडमिरल त्रिपाठी हे वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत, जिथे त्यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अधिकारी म्हणून थिम्मैया पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ॲडमिरल त्रिपाठी यांनी यू. एस. नेव्हल वॉर कॉलेज, न्यूपोर्ट, र्होड आयलंड येथील नेव्हल हायर कमांड कोर्स आणि नेव्हल कमांड कॉलेजमध्ये 2007-08 मध्ये पुढील शिक्षण घेतले, इथे ते प्रतिष्ठित रॉबर्ट ई. बेटमन आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले.
आजपर्यंतच्या कमांड जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी आयएनएस विनाश (क्षेपणास्त्र जहाज), आयएनएस किर्च (क्षेपणास्त्र कार्वेट) आणि आयएनएस त्रिशूल (मार्गदर्शित क्षेपणास्त्र युद्धनौका) या नौकांवर आपली सेवा बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आयएनएस विनाश हे जहाज पाकिस्तानला लागून असलेल्या सागरी सीमेवरील वायव्य किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले होते. याशिवाय आयएनएस किर्च त्यांच्या अधिपत्याखाली असताना, ‘मैत्रीचे पूल’ तयार करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याच्या भारतीय नौदलाच्या ‘लुक ईस्ट पॉलिसी’च्या समर्थनार्थ त्यांनी आपले जहाज परदेशी बंदरांवर पाठवले.
याव्यतिरिक्त, विशाखापट्टणमच्या किनारपट्टी भागात आणि त्यानंतर डिसेंबर 2004 च्या त्सुनामीनंतर श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे देखील मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये आयएनएस किर्चने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यासाठी त्यांना श्रीलंकेच्या तत्कालीन राष्ट्रपतींकडून ‘लेटर ऑफ ॲप्रिसिएशन’ मिळाले. या मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांना नौ सेना पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वाच्या काळात, आयएनएस त्रिशूल हे जहाज भारतीय नौदलाच्या समुद्री चाच्यांविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून एडनच्या आखातात तैनात करण्यात आले होते. त्यानंतर, दक्षिण इंडियन ओशन रीजनमध्ये मैत्रीसंबंध असलेल्या सेशेल्स आणि मॉरिशसच्या ईईझेड भागातील गस्तीसाठी तैनात करण्यात आले होते. त्यांच्या लष्करी कार्यकाळात त्यांना भारतीय नौदलाच्या लष्करी, राजनैतिक, शांती अधिकारी आणि सौम्य अशा चारही भूमिका पार पाडण्याची संधी मिळाली. त्यांच्या इतर सागरी नियुक्त्यांमध्ये मार्गदर्शित क्षेपणास्त्र विध्वंसक आयएनएस मुंबईचे कार्यकारी अधिकारी आणि प्रधान युद्ध अधिकारी आणि फ्लीट ई. डब्ल्यू. अधिकारी आणि फ्लीट कम्युनिकेशन ऑफिसर (जेथे त्यांनी ऑपरेशन पराक्रममध्ये भाग घेतला होता) यांचा समावेश आहे.
ते वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर (फ्लीट कमांडरच्या चीफ ऑफ स्टाफसारखे) देखील होते. त्यांनी हे सर्व ‘फ्लीट स्टाफ’ कार्यकाळ कमांड असाइनमेंटसह पूर्ण केले, ज्यामुळे त्यांना हिंद महासागर प्रदेशातील पर्यावरणाची सखोल माहिती मिळाली. नेव्हल ऑपरेशन्सचे संचालक (डीएनओ), नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन्सचे प्रधान संचालक (पीडीएनसीओ) आणि नेव्हल प्लान्सचे प्रधान संचालक (पीडीएनपी) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
नवे भारतीय नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये आमचे नौदल युद्धासाठी सज्ज, एकसंध, विश्वासार्ह दल म्हणून विकसित झाले आहे.
ते पुढे म्हणाले, भारतीय नौदलाने समुद्रातील संभाव्य शत्रूंना रोखण्यासाठी आणि युद्धे जिंकण्यासाठी नेहमीच तयार असले पाहिजे आणि हे माझे एकमेव लक्ष्य असून त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील.
नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून आणि विकसित भारताच्या आमच्या सामूहिक प्रयत्नात राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनून मी भारतीय नौदलाच्या ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकट करीन, अशी ग्वाही यावेळी त्रिपाठी यांनी दिली.
नितीन अ. गोखले