रशिया आणि युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध सुरूच आहे. यादरम्यान बुधवारी अमेरिकेने रशियावर युक्रेनविरुद्ध आंतरराष्ट्रीय रासायनिक शस्त्रास्त्र बंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने युक्रेनच्या सैन्याच्या विरोधात क्लोरोपिक्रिन या श्वास घुसमटवणाऱ्या घटकाचा वापर केला आहे. याशिवाय रशियाने युक्रेनमध्ये दंगल नियंत्रक घटकांचा वापर केल्याचा आरोपही अमेरिकेने केला आहे. ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सने (ओपीसीडब्ल्यू) क्लोरोपिक्रिनला श्वासविरोधी घटक म्हणून सूचीबद्ध केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की रशियन सैन्य युक्रेनच्या सैन्याला त्यांच्या बालेकिल्ल्यांमधून हटवण्यासाठी अशा रसायनांचा वापर करत आहे. खरेतर, युक्रेनियन लष्कराच्या हवाल्याने अलिकडेच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रशियाने बंदी घातलेल्या रासायनिक घटकांचा बेकायदेशीर वापर वाढवला आहे. युक्रेनियन लष्कराचे म्हणणे आहे की क्लोरोप्रिनव्यतिरिक्त रशिया सीएस आणि सीएन या वायूंनी भरलेले ग्रेनेड यांचादेखील वापर करत आहे. त्याशिवाय विषारी पदार्थांच्या संपर्कात आलेल्या किमान 500 युक्रेनियन सैनिकांवर उपचार करण्यात आले आहेत तर एकाचा अश्रूधुराच्या नळकांड्याने गुदमरून मृत्यू झाला आहे.
जर्मन सैन्याने पहिल्या महायुद्धादरम्यान रासायनिक शस्त्रास्त्रांचा पहिल्यांदा वापर करत मित्र राष्ट्रांच्या सैन्यावर हल्ला केला होता.
अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, 2020 मध्ये दिवंगत विरोधी पक्षनेते अलेक्सी नवलनी आणि 2018 मध्ये सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलिया यांच्यावर नोविचोक नर्व्ह घटकाचा वापर करून विषबाधा करण्याच्या उद्देशाने मॉस्कोने याच वायूचा वापर केला होता.
रशियाने मात्र दोन्ही प्रकरणांमागे आपला हात असल्याचे नाकारले होते.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मॉस्कोच्या रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्र कार्यक्रमांशी संबंधित तीन रशियन संस्थांवर बंदी घालण्यात आली आहे. युक्रेनच्या सैनिकांविरुद्ध क्लोरोप्रिनचा वापर सोपा करणाऱ्या विशेष लष्करी तुकडीचाही यात समावेश आहे.
याव्यतिरिक्त या तीन संस्थांना पाठिंबा देणाऱ्या चार रशियन कंपन्यांवरही बंदी घालण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आराधना जोशी
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)