इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे पॅलेस्टिनी लोकांसमोर सुरक्षिततेचे संकट निर्माण झाले आहे. इस्रायलने दक्षिण गाझाच्या रफाह शहरावर हल्ला करण्याचा केवळ इशाराच दिलेला नाही तर त्यासाठी आवश्यक तयारीही केली आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने गाझाच्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर हा परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले. रफाह हा असा भाग आहे जिथे मोठ्या संख्येने पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. या विषयावर संयुक्त राष्ट्रात (यूएन) एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, इस्रायलच्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेऊन पॅलेस्टिनी लोक सुरक्षित सीमांमध्ये स्वतंत्र देशात मुक्तपणे राहू शकतील अशा द्विराष्ट्र तोडग्याला पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
“…India is committed to supporting a Two-State solution where the Palestinian people are able to live freely in an independent country within secure borders, with due regard to the security needs of Israel…”
– PR at #UNGA Meeting on Gaza today pic.twitter.com/3znI9sn0FF
— India at UN, NY (@IndiaUNNewYork) May 1, 2024
संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यत्वासाठी पॅलेस्टाईनने केलेल्या अर्जाला अजूनही मंजुरी न मिळाल्याचा मुद्दा भारताने या बैठकीत उपस्थित केला. पॅलेस्टाईनच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जाला सुरक्षा परिषदेने त्याच्या नकाराधिकारामुळे मंजुरी दिलेली नाही, हे आमच्या निदर्शनास आले आहे, असे भारताने म्हटले आहे. त्यांच्या याचिकेचा पुनर्विचार केला जाईल, अशी आशाही कंबोज यांनी व्यक्त केली.
गाझामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असणाऱ्या संघर्षामुळे मानवतावादी संकट निर्माण झाले असल्याचे भारताने म्हटले आहे. त्यामुळे इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचे झालेले मृत्यू हे स्वीकारता येण्याजोगे नसल्याचे भारताने म्हटले आहे. या संघर्षात झालेल्या नागरिकांच्या जीवितहानीचा भारत निषेध करतो. आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे प्रत्येकाने कोणत्याही परिस्थितीत आदर केला पाहिजे, असे भारताचे मत आहे.
या आमसभेत भारताने म्हटले की, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक होता. दहशतवाद आणि नागरिकांना ओलीस ठेवणे न्याय्य ठरू शकत नाही. भारत नेहमीच दहशतवादाच्या विरोधात राहिला आहे. सर्व ओलिसांची बिनशर्त सुटका व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे भारताने म्हटले आहे. त्याच वेळी, गाझाला तातडीने मानवतावादी मदत मोठ्या प्रमाणात पोहोचवली गेली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन भारताने केले. त्याचवेळी असे प्रयत्न करणाऱ्या संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायांचे त्यांनी कौतुक केले.
भारताने यापूर्वीच गाझामधील मानवतावादी संकटाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गाझामधील प्रदीर्घ संघर्षामुळे भारत अस्वस्थ असल्याचे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सांगितले होते. इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः महिला आणि मुले मृत्युमुखी पडल्याने भारताची चिंता वाढली आहे. हे मानवतेवरील मोठे संकट आहे असे सांगत कंबोज यांनी गाझाच्या लोकांसाठी मानवतावादी मदत वाढवण्यावरही भर दिला होता.
आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)