संरक्षण सचिव गिरीधर अरमाने भूषवणार सहअध्यक्षपद
दि. ०२ मे: भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सातव्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे (जेडीसीसी) आज,३ मे रोजी नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले आहे. भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअरमार्शल डॉनी एरमावान तौफंटो (निवृत्त) हे या बैठकीचे संयुक्त अध्यक्ष असतील. दोन्ही बाजूने सामायिक हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला जाणार आहे.
सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर भारत-इंडोनेशियादरम्यान २०१८मध्ये मैत्री प्रस्थापित झाली होती. त्यामुळे संरक्षण उद्योग, विज्ञान आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रात नवीन सहकार्याबरोबरच द्विपक्षीय संबंधांची व्याप्तीही वाढली आहे. या वाढत्या भागीदारीसाठी संरक्षण संबंध महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. सैन्यदलांमधील विस्तृत संपर्क, लष्करी देवाणघेवाण, उच्च-स्तरीय भेटी, क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र शांतता रक्षणातील सहकार्य, जहाजांच्या भेटी आणि द्विपक्षीय सराव यांचा समावेश केल्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील संरक्षण प्रतिबद्धता वैविध्यपूर्ण झाली आहे.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात २००१मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या संरक्षण सहकार्य करारामध्ये ‘जेडीसीसी’ची स्थापना करून सहकार्याची संभाव्य क्षेत्रे, समान हिताच्या बाबी, मान्यताप्राप्त सहकारी उपक्रम सुरू करणे, समन्वय करणे, देखरेख करणे आणि नियंत्रित करणे या गोष्टींचा समावेश आहे. एअरमार्शल डॉनी एरमावान तौफंटो (निवृत्त) हे दोन ते चार मे दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते नवी दिल्ली आणि पुणे येथील भारतीय संरक्षण उद्योगांतील संबंधितांबरोबर चर्चा करणार आहेत.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी