भारत-इंडोनेशिया संयुक्त संरक्षण सहकार्य समिती बैठकीत निर्णय
दि. ०४ मे: संरक्षण उद्योग, सागरी सुरक्षा आणि सर्वंकष संरक्षण सहकार्य वृद्धिगत करण्यावर भारत आणि इंडोनेशिया दरम्यान एकमत झाले. उभय देशांदरम्यानच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची सातवी बैठक शुक्रवारी नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत असे सहकार्य करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो यांनी संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. उभय देशांमधील संरक्षण सहकार्याची व्याप्ती वाढल्याबद्दल, या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. संरक्षण सहकार्य आणि संरक्षण उद्योग सहकार्याशी संबंधित कार्यकारी गटांच्या बैठकांमध्ये विविध द्विपक्षीय संरक्षण सहकार्य उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर परस्पर भागीदारीच्या क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याविषयी विशेषत: संरक्षण उद्योग भागीदारी, सागरी सुरक्षा आणि बहुपक्षीय सहकार्य क्षेत्रातील सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
या भेटीदरम्यान इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सरचिटणीस एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो यांनी नवी दिल्लीतील ‘डीआरडीओ’ मुख्यालय, तसेच पुण्यातील टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि एल अँड टी डिफेन्स सुविधा केंद्राला भेट दिली. भारत फोर्ज, महिंद्रा डिफेन्स आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांसारख्या भारतातील इतर संरक्षण उद्योग भागीदारांचीही त्यांनी भेट घेतली. संशोधन तसेच संयुक्त उत्पादनासाठीच्या परस्पर सहकार्याच्या माध्यमातून संरक्षण उद्योगविषयक क्षमतावृद्धी करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली. आपल्या या भेटीदरम्यान एअर मार्शल डॉनी एर्मावन तौफांटो यांनी भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांचीही भेट घेतली.
इंडोनेशियाचे शिष्टमंडळ शुक्रवारपासून भारताच्या दौऱ्यावर आहे. भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात व्यापक धोरणात्मक भागीदारी आहे. परस्पर संवादातून दोन्ही देशांमध्ये भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी सामाईक दृष्टीकोन, मते आणि विचारही विकसित झाले आहेत. सध्याच्या काळात, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय पातळीवर दोन्ही देशांचे संबंध दृढ भागीदारीचे असल्याचे म्हणता येईल. त्यामुळेच या दोन्ही देशांमध्ये ठराविक काळाने नियमितपणे उच्च-स्तरीय संवाद देखील होत आले आहेत. भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात आणि भारत प्रशांत क्षेत्रासंबंधी मुद्यावर इंडोनेशिया हा भारताचा महत्त्वाचा भागीदार देश राहिला आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी