द्वीपक्षीय व बहुपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त
दि. १० मे: ‘हायर डिफेन्स ओरिएंटेशन कोर्स’ (एचडीओसी) अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या ४७ लष्करी अधिकाऱ्यांनी महू येथील ‘इन्फंट्री स्कूल’ला भेट देऊन लष्करी नेतृत्वाचे धडे घेतले. या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांमध्ये मित्रदेशातील २२ परदेशी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ‘इन्फंट्री स्कूल’चे समादेशक (कमांडंट) लेफ्टनंट जनरल गजेंद्र जोशी यांनी या अधिकाऱ्यांना ‘इन्फंट्री स्कूल’च्या इतिहास आणि नेतृत्वनिर्मिती परंपरेबद्दल माहिती दिली. द्वीपक्षीय व बहुपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी या भेटीचा उपयोग होईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय लष्करातील २५ अधिकाऱ्यांसह बांगलादेश, बोस्तवाना, मादागास्कर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि टांझानिया या भारताच्या मित्रदेशांतील २२ अधिकारी सध्या ‘हायर डिफेन्स ओरिएंटेशन कोर्स’ (एचडीओसी) अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या प्रशिक्षणाचा भाग म्हणून या अधिकाऱ्यांची महू येथील ‘इन्फंट्री स्कूल’ला भेट आयोजित करण्यात आली होती. ‘इन्फंट्री स्कूल’चे समादेशक (कमांडंट) लेफ्टनंट जनरल गजेंद्र जोशी यांच्यासह स्कूलमधील अधिकारी आणि प्रशिक्षकांनी या अधिकाऱ्यांना इन्फंट्री स्कूलमध्ये चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमाची तपशीलवार माहिती दिली. यात बदलत्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय लष्कराचे नेतृत्त्व करण्यासठी अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची पद्धत, अभ्यासक्रम, ‘की फोकस एरिया’ आदी बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर या प्रसंगी लष्करी प्रशिक्षण, लष्करी नेतृत्त्व विकास आणि कार्यसज्जतेबाबतही चर्चा करण्यात आली.
“𝐇𝐃𝐎𝐂 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞𝐫𝐬 𝐯𝐢𝐬𝐢𝐭 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐟𝐚𝐧𝐭𝐫𝐲 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥, 𝐌𝐡𝐨𝐰”
47 Tri-Services Officers including 20 Officers from the Friendly Foreign Countries #FFC of #Bangladesh, #Botswana, #Madagascar, #Nepal, #SouthAfrica, #SriLanka and #Tanzania, attending Higher… pic.twitter.com/T4Xlu6adIB
— Army Training Command, Indian Army (@artrac_ia) May 9, 2024
या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी इन्फंट्री स्कूलमधील संग्रहालयालाही भेट दिली. भारतीय लष्कर आणि इन्फंट्री स्कूलच्या इतिहासाचे, परंपरांचे आणि वारश्याचे परिणामकारक दर्शन या संग्रहालयात होते. या संग्रहालयात विविध स्मृतिचिन्हे, कलात्मक वस्तू आदींच्या माध्यमातून इन्फंट्री स्कूलचा इतिहास सांगण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांनी संग्रहालयाबरोबरच ‘इन्फंट्री स्कूल’च्या परिसरात असणाऱ्या ‘आर्मी मार्क्समनशिप युनिट’लाही भेट दिली. या युनिटमध्ये लष्करातील पिस्टलसारखी छोटी शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण व नेमबाजीचे प्रशिक्षण दिले जाते. या युनिटला दिलेल्या भेटीत या अधिकाऱ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण पाहता आले. तसेच, येथील शिक्षकांशीही चर्चा करता आली. इन्फंट्री स्कूलला दिलेल्या भेटीत भारतीय आणि मित्रदेशांतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना भारताच्या पायदळ तुकड्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्यात येणारी प्रशिक्षण पद्धती, त्यांची कार्यक्षमता आणि त्यांच्या मूल्यांबद्दल माहिती मिळाली.
‘हायर डिफेन्स ओरिएंटेशन कोर्स’ (एचडीओसी) अंतर्गत भारत आपल्या अधिकाऱ्यांसह मित्रदेशातील अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण देत आहे. भारत आणि त्याचे आंतरराष्ट्रीय समुदायातील भागीदार देश यांच्यातील वाढत्या संरक्षण विषयक सहकार्याची साक्षच यातून मिळते. अश्या उपक्रमामुळे द्विपक्षीय व बहुपक्षीय सहकार्य, विविध लष्करी दलांमधील अंतरपरिचालन वाढीस लागते. त्याचा स्वाभाविकपणे जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी उपयोग होईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटले आहे.
विनय चाटी