‘शक्ती-२०२४’: सोमवारपासून सुरुवात, उभय लष्करांतील क्षमतावृद्धीवर भर
दि. ११ मे: लष्करी सहकार्य, लष्करी क्षमता आणि आंतरपरिचालन वृद्धिंगत करण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या लष्करांत मेघालयातील उमरोई येथे ‘शक्ती-२०२४’ या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी (एडीजी-पीआय) ‘एक्स’ या ‘मायक्रोब्लॉगिंग’ संकेतस्थळावर दिली आहे. उभय देशांदरम्यानचा हा संयुक्त लष्करी सराव १३ ते २६ मे दरम्यान होणार आहे.
उभय देशांच्या लष्कराची लष्करी मोहिमांचे कार्यान्वहन करण्याची क्षमता वाढविणे, आंतरपरिचालन (इंटर-ऑपेरेटेबिलिटी) वृद्धिंगत करणे, बहुक्षेत्रीय मोहिमा (मल्टी डोमेन ऑपरेशन) राबविण्याची क्षमता वाढविणे, उप-पारंपरिक युद्धाला सामोरे जाण्याची तयारी करणे आदी उद्देश या संयुक्त सरावामागे असल्याचे ‘एडीजी-पीआय’ने स्पष्ट केले आहे. उभय देशांदरम्यानच्या संयुक्त लष्करी सरावाची ही सातवी आवृत्ती असल्याचेही त्यांनी सांगितले. या संयुक्त सरावामुळे भारत आणि फ्रान्सच्या लष्करांतील परस्पर सौहार्द वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
Exercise #Shakti 2024
The 7th Edition of Joint Military Exercise between #India🇮🇳 & #France🇫🇷 will be conducted from 13 to 26 May 2024 in #Umroi, #Meghalaya. The aim of the exercise is to enhance joint military capability of both sides to undertake Multi Domain Operations in a… pic.twitter.com/NTK9n7XIo4
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 11, 2024
दोन्ही देशांतील ‘शक्ती’ या संयुक्त लष्करी सरावाची सहावी आवृत्ती २०२१मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. या सरावात भारतीय लष्कराच्या ‘गोरखा रायफल्स’चे तीन अधिकारी, तीन जेसीओ आणि ३७ जवान अशी ४३ जणांची तुकडी सहभागी झाली होती. या सरावात संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार दहशतवादविरोधी मोहिमा राबविण्यासाठी संयुक्त नियोजन, मोहिमांची अंमलबजावणी, परस्पर सामंजस्य, समन्वय आदी बाबींचा सराव करण्यात आला होता. या सरावात आभासी युद्ध परिस्थिती निर्माण करून युद्धसराव करण्यात आला होता. त्याचबरोबर गोळीबाराचा सरावही घेण्यात आला होता. सलग ३६ तास तणावग्रस्त व युद्धसदृश परिस्थितीत कार्यरत राहण्याची जवानांची क्षमताही पाहण्यात आली होती.
भारत आणि फ्रान्सदरम्यान गेल्या काही वर्षांपासून संरक्षण सहकार्य वृद्धिंगत होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात फ्रान्सला भेट देऊन तेथील संरक्षणदलप्रमुख आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. या भेटीत दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यावर एकमत झाले होते. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन या वर्षीच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या दौऱ्यातही संरक्षण सहकार्याबाबत चर्चा झाली होती. फ्रान्सच्या लष्कराचे पथकही प्रजासत्ताकदिन संचलनात सहभागी झाले होते. फ्रान्सच्या राष्ट्रीयदिन सोहळ्यात भारतीय लष्कराचे पथक सहभागी झाले होते. उभय देशांतील वाढत्या लष्करी संबंधातील हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
विनय चाटी