संरक्षण मंत्रालयाची ‘एचएएल’कडे मागणी
दि. १७ मे: भारताच्या हवाईदलातील लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रनची घटती संख्या लक्षात घेता १८ ‘तेजस एमके-१ए’ विमानांची पहिली खेप मार्च-२०२५ पर्यंत हवाईदलाकडे सोपवा, अशी मागणी संरक्षण मंत्रालयाने ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडे (एचएएल) केली आहे.
हवाईदलाच्या ताफ्यातील जुनी विमाने आता वापरण्यायोग्य राहिली नसल्यामुळे ती निवृत्त करण्यात येत आहेत. उपलब्ध विमानसंख्या आणि आवश्यक विमानसंख्या यातील दरी सातत्याने वाढत असल्यामुळे हवाईदलाने ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडे (एचएएल) एकूण १८० ‘तेजस एमके-१ए’ या लढाऊ विमानांची मागणी नोंदविली आहे. ही विमाने येत्या दहा वर्षांत दोन टप्प्यांमध्ये हवाईदलाला द्यायची आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील ८३ ‘तेजस एमके-१ए’ विमानांची मागणी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’कडे (एचएएल) फेब्रुवारी-२०२१ मध्ये नोंदविण्यात आली होती. हे कंत्राट सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे आहे. हवाईदलाला याचा पुरवठा यावर्षीच्या मार्च महिन्यापासून होणे अपेक्षित होते. मात्र, यातील एकही विमान ‘एचएएल’ने आत्तापर्यंत हवाईदलाकडे सुपूर्द केलेले नाही. पूर्वी मागणी नोंदविलेल्या ८३ विमानांव्यतिरिक्त ९७ अधिक विमानांसाठी गेल्या एप्रिल महिन्यात हवाईदलाने मागणी नोंदविली होती. अशी दोन्ही मिळून १८०‘तेजस एमके-१ए’ विमाने ‘एचएएल’ हवाईदलासाठी उत्पादित करणार आहे. मार्च महिन्यात ‘एचएएल’ने पहिल्या ‘तेजस एमके-१ए’ या विमानाची उड्डाणचाचणी घेतली होती. सुमार १८ मिनिटांची ही चाचणी यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले होते. या सर्व प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर १८ ‘तेजस एमके-१ए’ विमाने मार्च-२०२५ पर्यंत सोपविण्याची मागणी संरक्षण मंत्रालयाने केली आहे. दरम्यान, ‘एचएएल’चा दुसरा प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहत असून, तो नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी ‘एचएएल’ नाशिकमधील प्रकल्पावर अवलंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘एचएएल’ला ही मोठी मागणी पूर्ण करण्यास काही अडचणी येत होत्या. प्रामुख्याने या अडचणी पुरवठा साखळी संबंधातील होत्या. त्या अडचणी सोडविण्यात यश आले आहे. विमानाचे काही सुटे भाग आणि जोडणी पुरवठादरांनी ‘आउटसोर्स’ केल्या असल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे संरक्षण मंत्रालय आणि ‘एचएएल’ दोघेही मार्च-२०२५च्या ‘डेडलाईन’बाबत गंभीर असल्याची माहितीही या वेळी अधिकाऱ्यांनी दिली. चीन आणि पाकिस्तानकडून असणारा धोका लक्ष घेता हवाईदलाचे काम पूर्ण क्षमतेने होण्यासाठी एकूण ४२ स्क्वाड्रनची गरज आहे. मात्र, भारताच्या हवाईदलाकडे सध्या ३१ स्क्वाड्रनच (प्रत्येकी १६-१८ विमानांची एक स्क्वाड्रन) आहेत. त्यामुळे ही घटती संख्या काळजीचा विषय आहे, म्हणूनच ही अतिरिक्त विमान उत्पादनाची मागणी ‘एचएएल’कडे नोंदविण्यात आली होती. येत्या वर्षभरात सोव्हिएतकाळातील मिग-२१ या विमानांच्या सर्व (दोन) स्क्वाड्रन निवृत्त होणार आहेत. सध्या हवाईदलाकडे असलेली जग्वार, मिराज-२००० आणि मिग-२९ ही सर्व लढाऊ विमाने १९८० मध्ये हवाईदलात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यांचा कार्यकाळही २०२९-३० मध्ये संपणार आहे. या चारही प्रकारच्या विमानाची संख्या २५० असून, ती सध्या दुरुस्त करून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे हवाईदलाने केलेल्या नियोजनानुसार आजपासून पुढची १४ ते १५ वर्षांत हवाईदलाला देशांतर्गत उत्पादन केलेल्या ३९० लढाऊ विमानांची गरज भासणार आहे. हवाईदलाकडे सध्या ‘तेजस एमके-१’ या ४० लढाऊ विमानांचा ताफा आहे. ‘तेजस एमके-१ए’ ही त्याची सुधारीत आवृत्ती आहे.
विनय चाटी
(वृत्तसंस्थांच्या ‘इनपुट्स’सह)