द्विपक्षीय सागरी संरक्षण सहकार्य व फिलिपिन्स नौदलाबरोबर सरावाचे आयोजन
दि. २० मे: भारतीय नौदलाच्या दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग म्हणून नौदलाच्या पूर्व ताफ्यातील ‘आयएनएस किल्तन,’ ‘आयएनएस शक्ती’ आणि ‘आयएनएस दिल्ली’ या युद्धनौकांनी रविवारी फिलिपिन्सला भेट दिली. या नौका येत्या काही दिवसांत फिलिपिन्सच्या नौदलाबरोबर द्विपक्षीय सागरी संरक्षण सहकार्यान्तर्गत सागरी सराव व विविध कवायती करणार आहेत. फिलिपिन्सला पोहोचण्यापूर्वी या ताफ्याने सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम या देशांना भेट दिली होती.
भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील युद्धनौका सध्या दक्षिण चीन समुद्राच्या सामरिक तैनातीवर आहेत. नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुख (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग) रिअर ॲडमिरल राजेश धनकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहीम सुरू आहे. फिलिपिन्समधील आपल्या वास्तव्यात भारतीय नौदलाकडून विशेष पुढाकाराने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि फिलिपिन्समध्ये दीर्घकालीन मित्रत्वाचे संबंध आणि सागरी संरक्षण सहकार्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने फिलिपिन्सला आपली ब्राह्मोस ही स्वनातीत क्षेपणास्त्रेही दिली आहेत. त्यामुळे ‘आयएनएस किल्तन,’ ‘आयएनएस शक्ती’ आणि ‘आयएनएस दिल्ली’ या युद्धनौका फिलिपिन्सला पोहोचताच फिलिपिनो नौदलाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी फिलिपिनो नौदलातील वरिष्ठ अधिकारी आणि फिलिपिन्सच्या भारतीय दूतावासातील अधिकारी उपस्थित होते.
Towards further strengthening the longstanding friendship & maritime cooperation, #IndianNavy ships #INSDelhi, #INSShakti & #INSKiltan arrived at Manila, Philippines, #19May 24. The ships were accorded a warm welcome by the @Philippine_Navy.
The visit is part of Op Deployment of… pic.twitter.com/hV14DzryEh— SpokespersonNavy (@indiannavy) May 20, 2024
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या फिलिपिन्समधील थांब्यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय आणि फिलिपिन्सच्या नौदलाचे कर्मचारी, विषय व सामग्रीसंबंधित माहितीचे आदानप्रदान आणि संबंधीत तज्ज्ञांची सत्रे, योग, क्रीडा स्पर्धा आणि परस्परांच्या जहाजांना भेटी (क्रॉस-डेक) यासह विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये सहभागी होतील. उभय देशांच्या नौदलांमध्ये परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा या भेटींचा उद्देश आहे. भारतीय युद्धनौका बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, फिलिपिन्सच्या नौदलासह समुद्रात सागरी भागीदारी सरावामध्ये (एमपीएक्स) सहभागी होतील. या सरावाचा उद्देश दोन्ही नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता (इंटर ऑपरेटीबिलीटी) वाढवणे हा आहे. ‘आयएनएस दिल्ली’ ही पहिली स्वदेशी बांधणीची ‘प्रोजेक्ट-१५’ श्रेणीतील ‘पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका’ आहे. तर, ‘आयएनएस शक्ती’ ही नौदल ताफ्याला रसद पुरविणारी नौका आहे. तर, ‘आयएनएस किल्तन’ ही स्वदेशी पाणबुडीविरोधी संरक्षक युद्धनौका असून, याची रचना भारतीय नौदलाच्या नौदल संचालनालयाने केली आहे. तर, बांधणी कोलकात्याच्या ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स’ यांनी केली आहे. ‘आयएनएस किल्तन’ ही चार पी-२८ पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या श्रेणीतले तिसरे जहाज आहे.
भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या या भेटीमुळे भारताचे या सागरी देशाशी असेलेले दीर्घकालीन सहकार्य आणि मैत्री आणखी दृढ होईल. या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची उपस्थिती भारतीय नौदलाच्या ‘ॲक्ट ईस्ट’ आणि ‘सागर’ या धोरणांबाबत वचनबद्धता अधोरेखित करते.
विनय चाटी