‘आयएनएस शक्ती’वर तैनात ‘ध्रुव’च्या कर्मचाऱ्यांशी चर्चा
दि. २१ मे: भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस शक्ती’ या युद्धनौकेवर तैनात असलेल्या आणि भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सहायाने देशांतर्गत विकसित आणि उत्पादित केलेल्या अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर ध्रुवच्या (एएलएच ध्रुव) खरेदीत फिलिपिन्सला स्वारस्य असल्याचे मंगळवारी निदर्शनास आले. दक्षिण चीन समुद्रातील सामरिक तैनातीचा भाग म्हणून सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर असलेल्या ‘आयएनएस शक्ती’ला भेट देऊन फिलिपिन्सच्या संरक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी ‘ध्रुव’च्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि या अत्याधुनिक हलक्या हेलिकॉप्टरची माहिती घेतली.
A delegation from @Philippine_Navy, @coastguardph & @dndphl had an interaction with crew of the indigenous Advanced Light Helicopter onboard #INSShakti to understand the capabilities of the Indian helicopter.
🇮🇳-🇵🇭 #BridgesofFriendship#AatmaNirbharBharat@indembmanila @HALHQBLR https://t.co/YFdno8oPYo pic.twitter.com/ykpzvIDnYZ— SpokespersonNavy (@indiannavy) May 21, 2024
संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने सरकारने आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ या धोरणांना चालना देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील संरक्षण सामग्री उत्पादन करणाऱ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात पाठींबा देऊन त्यांना स्वदेशी संरक्षण साहित्याच्या उत्पादनासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. त्याचा परिणाम २०२३-२४ आर्थिक वर्षांत निदर्शनास आला होता. या वर्षी प्रथमच भारताच्या संरक्षण साहित्याच्या निर्यातीने २१ हजार कोटींचा विक्रमी टप्पा पार केला होता. भारतीय उत्पादनांची गुणवत्ता आणि किफायतशीर किंमत यामुळे जगभरातील संरक्षणदलांना त्यांची भुरळ पडली आहे. सध्या भारत बुलेटप्रुफ जकेटपासून रायफलपर्यंत आणि तोफांपासून क्षेपणास्त्रांपर्यंत अशा विविध संरक्षण उत्पादनांची निर्यात जगभरात करीत आहे. त्याच मालिकेत भारताने नुकतीच ब्रह्मोस या स्वनातीत क्षेपणास्त्राची निर्यात फिलिपिन्सला केली होती. त्याचबरोबर हलके लढाऊ विमान तेजस आणि अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर ध्रुवच्या विक्रीबाबतही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरु होती. त्यामुळे ‘ध्रुव’ची क्षमता आणि त्याची कामगिरीबाबत जाणून घेण्यासाठी फिलिपिन्सच्या नौदल, तटरक्षकदल आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘आयएनएस शक्ती’ला भेट देऊन ‘ध्रुव’च्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील ‘आयएनएस शक्ती,’ ‘आयएनएस दिल्ली’ आणि ‘आयएनएस किल्तन’ या युद्धनौका दक्षिण चीन समुद्राच्या सामरिक तैनातीवर आहेत. या तैनातीचा भाग म्हणून भारतीय नौदलच्या या नौकांनी सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम आदी देशांना भेट देऊन त्यांच्या नौदलाबरोबर द्विपक्षीय सागरी सुरक्षा सरावात सहभाग घेतला होता. याच तैनातीचा भाग म्हणून या युद्धनौका सोमवारी फिलिपिन्समध्ये पोहोचल्या होत्या. फिलिपिन्समधील आपल्या वास्तव्यात भारतीय नौदलाकडून विशेष पुढाकाराने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि फिलिपिन्समध्ये दीर्घकालीन मित्रत्वाचे संबंध आणि सागरी संरक्षण सहकार्य आहे. त्यामुळे ‘आयएनएस किल्तन,’ ‘आयएनएस शक्ती’ आणि ‘आयएनएस दिल्ली’ या युद्धनौका फिलिपिन्सला पोहोचताच फिलिपिनो नौदलाकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी फिलिपिनो नौदलातील वरिष्ठ अधिकारी आणि फिलिपिन्सच्या भारतीय दूतावासातील अधिकारी उपस्थित होते.
विनय चाटी