तैवानला एफ-16 लढाऊ विमानांचे सुटे आणि दुरुस्तीचे भाग अंदाजे 8 कोटी डॉलरला विकण्यास अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने मान्यता दिल्याचे पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने बुधवारी जाहीर केले. यामुळे तैवानी हवाई दलाचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे.
पेंटागॉनच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने (डीएससीए) एका निवेदनात म्हटले आहे की, या विक्रीमुळे “तैवानची सुरक्षा सुधारण्यास आणि प्रदेशातील राजकीय स्थिरता, लष्करी संतुलन आणि आर्थिक प्रगती राखण्यास मदत होईल.”
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने या निर्णयासाठी अमेरिकेचे आभार मानताना सांगितले आहे की या विक्रीमुळे त्यांच्या हवाई दलाच्या लढाऊ आणि संरक्षण गरजांना चालना मिळेल. जुलैमध्ये या विक्री कराराला अंतिम रूप दिले जाईल, असे मंत्रालयाने सांगितले.
एका निवेदनात म्हटले आहे की, “सामान्य ग्रे-झोनमधील तणावामुळे चिनी कम्युनिस्ट पक्षाने आमचे नौदल तसेच हवाई प्रशिक्षणाची जागा आणि प्रतिसाद यांसाठी लागणारा वेळ कमी करण्याचा प्रयत्न केला, तसेच आमचे स्वसंरक्षण करण्याचा अधिकार मर्यादित करण्याचा प्रयत्न केला.”
ज्या बेटावर तैपेईच्या तीव्र आक्षेपानंतरही बीजिंग स्वतःचा प्रदेश असल्याचा दावा करतो त्या तैवानला अमेरिकेने शस्त्रास्त्रांची विक्री करणे थांबवावे, अशी मागणी चीनने वारंवार केली आहे. अमेरिका हा तैवानचा सर्वात महत्त्वाचा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे.
अमेरिकेच्या या नव्या निर्णयावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गुरुवारी संसदेत पत्रकारांशी बोलताना तैवानचे संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू म्हणाले की, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणातील “प्रभावी प्रतिबंध”चा एक भाग होण्यासाठी तैवानने आपली स्वसंरक्षण क्षमता वाढवली पाहिजे.
“पण तैवान – अमेरिका लष्करी सहकार्यासाठी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण फक्त करू शकतो, सांगू शकत नाही,” असेही ते म्हणाले.
तैवान अमेरिकेच्या लष्करी मदतीवर खूपच अवलंबून आहे. त्याच्या हवाईदलाच्या यादीतील F 16s ही सर्वोत्तम विमाने मानली जातात. चीनने J20 चा समावेश केल्यामुळे, तैवानसाठी त्याच्या गरजांचे नव्याने मूल्यांकन करणे अधिक शहाणपणाचे ठरणार आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपु्ट्सह)