आदित्य एल. 1 या अंतराळातील भारताच्या सौर वेधशाळेने अलिकडेच सौर पृष्ठभागावरील भू-चुंबकीय वादळाचे तपशीलवार निरीक्षण केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दावा केला आहे की, या अंतराळ यानातील दोन संवेदकांनी सोलर लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एसओएलईएक्सएस) आणि हाय एनर्जी एल-1 ऑर्बिटिंग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एचईएल1ओए) वापरून या सौर घटनेचे निरीक्षण केले. आदित्य सोलर विंड पार्टिकल एक्सपेरिमेंट (एएसपीईएक्स) आणि हाय रिझोल्यूशन डिजिटल मॅग्नेटोमीटर यासारख्या इतर उपकरणांनी दोन दिवसांनी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून या घटनेचा शोध लावला.
कोरोनल मास इजेक्शनशी (सीएमई) संबंधित अनेक एक्स-क्लास आणि एम-क्लास फ्लेअर्समुळे भू-चुंबकीय वादळे निर्माण झाली जी अंतराळातील या एकमेव वेधशाळेने नोंदवली. ही निरीक्षणे सूर्याच्या एआर 13664 भागात करण्यात आली. सोलर अल्ट्रा व्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप (एसयूआयटी) आणि व्हिजिबल एमिशन लाइन कोरोनग्राफ (व्हीईएलसी) डिटेक्टर हे संवेदक अचानक घडलेल्या घटनांचा शोध लावू शकले नाहीत कारण त्या बेकिंग आणि कॅलिब्रेशन मोडमध्ये होत्या. परंतु या दोन संवेदकांनी नंतर अतिरिक्त माहिती पुरवली.
अशी भूचुंबकीय वादळे उपग्रहांना त्यांच्या कक्षेतून फेकून देऊ शकतात. यामुळे दळणवळण विस्कळीत होऊ शकते आणि काही भागात इंटरनेट बंद होऊ शकते. तीव्र सौर वादळे पृथ्वीवरील मार्गदर्शक प्रणालींवरही परिणाम करू शकतात, ब्लॅकआउट्सला चालना देऊ शकतात आणि हाय फ्रिक्वेन्सी असलेले रेडिओ जाम करू शकतात. हे तेच वादळ होते ज्यामुळे नॉर्दर्न लाईट्स किंवा ध्रुवीय प्रकाश नेहमीपेक्षा जास्त विस्तीर्ण भागात दिसून आला. अगदी नासाच्या मार्स क्युरियोसिटी रोव्हरला देखील नंतरच्या सौर वादळाने चार्ज केलेल्या कणांचे पांढरे ठिपके दिसू शकले, जे रोव्हरच्या मंगळावरील 12 वर्षातील कण शोधण्यातील मोहिमेतील आकाराने सर्वात मोठे होते. पृथ्वीचे दाट वातावरण एक्स-क्लास फ्लेअर्सच्या अशा किरणोत्सर्गापासून आपले संरक्षण करते.
आदित्य एल 1 हे इस्रोचे अंतराळ यान आहे जे लॅगरेज पॉईंट 1 येथे आहे. भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पाठवले होते आणि ते पृथ्वीपासून अंदाजे 15 लाख किमी अंतरावर आहे. लॅगरेज पॉईंट (ज्याला लिबरेशन पॉईंट असेही म्हणतात) हे असे क्षेत्र आहे जेथे दोन विशाल खगोलीय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला रद्द करतात. याचा अर्थ असा की आदित्य एल 1 अशा बिंदूवर आहे जिथे पृथ्वी आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना रद्द करून यानाला स्थिर कक्षा उपलब्ध होते. आदित्य एल 1 चे 2 सप्टेंबर 2023 रोजी प्रक्षेपण करण्यात आले. 6 जानेवारी 2024 रोजी ते कक्षेत पोहोचले. दीड हजार किलो वजनाच्या या यानात प्लाझ्मा ॲनालायझर पॅकेज फॉर आदित्य (पीएपीए) आणि वर नमूद केलेल्या पेलोडच्या सोबत एकंदर सात वेगवेगळी पेलोड आहेत.
ध्रुव यादव