रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम यांनी हर्मिट साम्राज्याच्या (जो देश संपूर्ण जगापासून संबंध तोडत स्वतःला एकटा पाडतो त्याला हर्मिट ही संकल्पना वापरली जाते) म्हणजेच उत्तर कोरियाच्या भेटीदरम्यान जाहीर पाठिंबा दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष 24 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन्ही देश धोरणात्मक सहकार्य सुधारण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने दोन्ही देशांच्या नेत्यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी उत्तर कोरिया रशियाला शस्त्रे हस्तांतरित करत असल्याचा संशय आहे. तर रशिया अंतराळ कार्यक्रमासाठी उत्तर कोरियाच्या लोकांना तांत्रिक कौशल्य पुरवत आहे.
या आठवड्यातच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी इराण आणि उत्तर कोरिया रशियाला शस्त्रे पुरवत असल्याचा आरोप केला. युक्रेन युद्धासाठी पुतीन यांना भौतिकदृष्ट्या पाठिंबा दिल्याबद्दल चीन, इराण आणि उत्तर कोरियाला ब्लिंकन यांनी ‘चिंता वाढवणारे देश’ असे संबोधले आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना रशियाला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविल्याबद्दल उत्तर कोरियाचा निषेध केला.
अलिकडच्या काळात कोरियन द्वीपकल्पावरील तणाव वाढला आहे. विशेषतः डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाचा (डीपीआरके./उत्तर कोरिया) दुसरा गुप्तहेर उपग्रह कक्षेत स्थिरावण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर या तणावात वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते हे प्रक्षेपण इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासाठी (आयसीबीएम) एक सुरक्षा कवच होते. खरेतर प्रक्षेपणानंतर लगेचच रॉकेटचा स्फोट झाला. मात्र त्यामुळे स्पष्टपणे दिसणाऱ्या तणावामुळे अमेरिकेच्या हवाई दलाने (यूएसएएफ) सात वर्षांपेक्षाही अधिक काळानंतर द्वीपकल्पावर आपला पहिला बॉम्बहल्ला सराव केला.
उत्तर कोरियाचा दौरा संपल्यानंतर पुतीन व्हिएतनामला रवाना होतील, जो त्यांचा या देशाचा पाचवा दौरा असेल. या भेटीबद्दलही अमेरिकेने आग्नेय आशियाई देशाला (व्हिएतनामला) फटकारले आहे. मात्र आपण संतुलित परराष्ट्र धोरणाचे पालन करतो आणि कोणत्याही मोठ्या शक्तीला झुकते माप देत नाही हेच या भेटीतून दिसून येते असे सांगत व्हिएतनामने या भेटीचे समर्थन केले आहे. पाश्चिमात्यांच्या निर्बंधांपासून दूर राहण्यासाठी हे दोन्ही देश तंत्रज्ञान, गुंतवणूक, शिक्षण, शस्त्रास्त्रे आणि व्यापारावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
टीम भारतशक्ती