डीआरडीओने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) 26 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात मध्यम पल्ल्याचे -मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट (एमआर-एमओसीआर) भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ (एमओसी) हे डीआरडीओच्या जोधपूरमधील संरक्षण प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले एक सूक्ष्मलहरी प्रतिगामी खास तंत्रज्ञान आहे. याद्वारे रडार सिग्नल धूसर होऊन प्लॅटफॉर्म आणि मालमत्तेभोवती सूक्ष्मलहरींचे कवच तयार होते आणि शत्रूच्या रडारच्या कक्षेत येण्याचा धोका कमी होतो, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मध्यम पल्ल्याच्या चॅफ रॉकेटमध्ये काही मायक्रॉन व्यासाचे आणि अनोखे सूक्ष्मलहरी प्रतिगामी गुणधर्म असलेले विशेष प्रकारचे तंतू एकत्र केले गेले आहेत. शत्रूकडून गोळीबार झाल्यावर हे रॉकेट निर्धारित काळासाठी आकाशात पुरेशा क्षेत्रावर सूक्ष्मलहरींचे धूसर ढग तयार करतो ज्याद्वारे ध्वनिलहरींचा शोध घेणाऱ्या प्रतिकूल धोक्यांपासून एक प्रभावी कवच तयार होते. या तंतूंच्या अद्वितीय गुणधर्मांमुळे स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील ते एक प्रभावी आणि शक्तिशाली साधन बनले आहे.
एमआर-एमओसीआरच्या टप्पा -1 चाचण्या भारतीय नौदलाच्या जहाजांवरून यशस्वीपणे पार पडल्या, ज्यामध्ये एमओसी द्वारे निर्धारित काळासाठी आकाशात ढग तयार करण्यात आले. टप्पा -II चाचण्यांमध्ये, शत्रूच्या रडारच्या कक्षेत येऊन (आरसीएस) हवाई लक्ष्याच्या घटना 90 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे भारतीय नौदलाने दाखवून चाचणी यशस्वी केली आहे. सर्व पात्र आवश्यकता पूर्ण करून अनेक मध्यम पल्ल्याची – मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट यशस्वीरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
एमआर- एमओसीआर यशस्वीरित्या विकसित केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे. एमओसी तंत्रज्ञान हे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी भारतीय नौदल शस्त्रास्त्र तपासणी महासंचालक रिअर ॲडमिरल ब्रिजेश वशिष्ठ यांच्याकडे एमआर- एमओसीआर सुपूर्द केले. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल डीआरडीओ अध्यक्षांनी जोधपूरच्या संरक्षण प्रयोगशाळेच्या चमूचे अभिनंदन केले. अल्पावधीत हे स्वदेशी धोरणात्मक-महत्वाचे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल भारतीय नौदलाच्या नौदल शस्त्रास्त्र तपासणी महासंचालकांनी देखील डीआरडीओच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
टीम भारतशक्ती