ओमानमधील शिया मुस्लिम मशिदीवर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक भारतीय ठार आणि दुसरा जखमी झाल्याची माहिती कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी दिली. या हल्ल्यात तीन हल्लेखोरांसह एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24हून अधिक लोक जखमी झाले.
पाकिस्तानी, भारतीय आणि ओमानी अधिकाऱ्यांनी असा हल्ला झाल्याची दखल घेतली आहे. यात चार पाकिस्तानी, एक भारतीय आणि एक पोलिस अधिकारी ठार झाले आहेत. ओमान पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह विविध देशांचे 28 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा हेतू पोलिसांनी ओळखला आहे की त्यांनी यासंदर्भात काही अटक केली आहे का याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अधिकाऱ्यांनी अद्याप हल्लेखोरांची ओळखही उघड केलेली नाही.
पश्चिम आशियातील सर्वात स्थिर आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या ओमानमध्ये हा हल्ला झाला असून या देशात घडलेली ही दुर्मिळ घटना आहे.
मस्कतमधील भारतीय दूतावासाने याबाबत एक्स माध्यमावर पोस्ट टाकली आहे
Following the shooting incident reported in Muscat city on 15 July, Foreign Ministry of Sultanate of Oman has informed that one Indian national has lost his life & another is injured. Embassy offers its sincere condolences & stands ready to offer all assistance to the families.
— India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) July 16, 2024
हल्लेखोरांनी आशियातील शियांच्या एका गटाला लक्ष्य केले असावे, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. ओमानच्या दहशतवादविरोधी दलांनी हल्लेखोरांशी संघर्ष केला.
हल्ल्यानंतर पळून जात असताना काही पाकिस्तानी लोकांना कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्यांची सुटका करण्यात आली. इतर अजूनही नजरकैदेत आहेत.
शिया लोक आशुरा हा वार्षिक शोकदिन साजरा करतात. 7व्या शतकात उमय्यद खलिफा याझिदविरुद्ध कर्बलाच्या लढाईत प्रेषित मोहम्मद यांचा नातू हुसेन इब्न अली याला आलेल्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून हा शोकदिन पाळला जातो. हुसेन हा पैगंबर मोहम्मद यांचा नातू होता.
रॉयल ओमान पोलिसांनी सांगितले की त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली आहे. ते सक्रियपणे पुरावे गोळा करत आहेत. घटनेमागील तपशील उघड करण्यासाठी आवश्यक तपासही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रॉयल ओमान पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “वाडी अल कबीर प्रदेशातील मशिदीच्या परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा आम्ही प्रतिकार केला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून इतर अनेक जण जखमी झाले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा ‘दहशतवादी हल्ला’ असल्याचे मान्य केले. हल्लेखोरांना निष्प्रभ केल्याबद्दल त्यांनी ओमान सरकारची प्रशंसा करणारे निवेदन जारी केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ओमानला या तपासात पूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
Deeply saddened by the terrorist attack on Imam Bargah Ali bin Abu Talib in Muscat, Oman, resulting in the loss of precious lives, including 4 Pakistani nationals. My heart goes out to the families of the victims. I have instructed the Pakistan Embassy in Muscat to extend all…
— Shehbaz Sharif (@CMShehbaz) July 16, 2024
याव्यतिरिक्त, मस्कतमधील अमेरिकी दूतावासाने सांगितले की ते गोळीबाराच्या घटनेच्या बातम्यांचा पाठपुरावा करत आहेत.
“अमेरिकन नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे, स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवले पाहिजे आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे,” असे एका निवेदनात म्हटले आहे.
या अत्यंत अशांत प्रदेशात ओमानने आपली तटस्थता कायम ठेवली आहे. याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यातील विवादांमध्ये मध्यस्थीही केली आहे.
सूर्या गंगाधरन
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)